अप्पा जुवेकर – एक श्रद्धांजली
नारायण अच्युत जुवेकर यांची जुवेकर कुटुंबीयांतली ओळख नाना जुवेकर अशी होती. पण आईने आम्हाला त्यांची ओळख करून दिली ती मात्र अप्पा जुवेकर अशीच. १८ जानेवारी २०२२ रोजी वयाच्या ९२व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचे आकस्मिक निधन झाले. मरण दुःखद असते, आणि आकस्मिक मरण धक्कादायक. पण “अनायासेन मरणम्” हे अनेकांच्या नशिबी न येणारे भारतीय जनमानसातले एक ईप्सित त्यांना साध्य झाले असेच म्हटले पाहिजे.
अप्पांचे वडील मध्यमवर्गीयच, पण टुकीने राहाणारे. दुर्दैवाने अप्पा १५ वर्षांचे असतानाच वडील गेले. त्यावेळी सर्वात मोठ्या बहिणीचे लग्न झालेले होते. पण मोठा मुलगा म्हणून अप्पांवर तीन लहान बहिणी व एक लहान भाऊ यांची जबाबदारी आली. ती त्यांनी समर्थपणे पेलली. अप्पांनी किरकोळ नोकर्या करत करत अखेर महापालिकेत हिशेब खात्यात (accounts department मध्ये) नोकरी धरली. सकाळी कॉलेज, साडे दहानंतर नोकरी, संध्याकाळी इतर जबाबदार्या हा शिरस्ता पाळून त्यांनी प्रथम शिक्षण पुरे केले. बी.ए. (ऑनर्स) पदवी मिळवली. नेटके काम, मनमिळावू स्वभाव म्हटल्यावर ऑफिसात बढती मिळत गेली. मग तीन बहिणींची लग्ने, भावाचे शिक्षण आणि लग्न, स्वतःचा संसार, दोन्ही मुलांना उच्चशिक्षित करणे, हे सारे क्रमाने आलेच. ३९ वर्षे महापालिकेत नोकरी केली. वडिलांनी फार पूर्वी घेतलेल्या प्लॉटचा आपल्या निवृत्तीनंतर विकासही केला. एवंच “विनादैन्येन जीवनम्” हे दुसरे ईप्सितही त्यांनी साध्य केले. एखाद्याला या सगळ्यात जीवनाचे “साफल्य” वगैरे वाटेल. पण अप्पा हे वेगळेच रसायन होते. अप्पांच्या घराचे नाव आराधना. त्यांनीही कायम विविध प्रकारची आराधनाच केली. त्यातली महत्वाची होती, समाज-आराधना!
सदैव कार्यरत असणारे अप्पा हे हाडाचे समाजसेवक होते. कुठलाही डिंडिम न वाजवता इतरांच्या उपयोगी पडणे हा त्यांचा स्थायीभाव होता. प्रामाणिकपणे पैशाचे व्यवहार संभाळणे व नेटकेपणे त्याचे हिशेब लिहिणे हे त्यांचे बलस्थान होते. त्याचा वापर करीत त्यांनी अनेक संस्थांना मदत केली. कधी पदभार स्वीकारून तर बरेचदा पडद्याआडून. गावाला गणपतीचे मंदिर बांधण्याची मोहीम असो, की आपल्या ज्ञातीतील छोट्यामोठ्या संस्था असोत. सोबती सारखी वरिष्ठ नागरिकांना एकत्र आणणारी संस्था असो की स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्रासारखी संस्था असो, कुठेही गरज लागली तर ते मदत करीत राहात.
अप्पांनी पडद्याआड राहूनही समाजसेवा केली. कानसळ येथे श्री. बापू पंडित यांनी समाजसेवा म्हणून उभारलेल्या “स्नेहबंधन” वृद्धाश्रमाचे आर्थिक व्यवहार सुरळीत करून देण्यासाठी त्यांच्या कित्येक वर्षांचे हिशोब लिहून देण्याचे काम त्यांनीच केले होते. त्यांच्यासाठी आणि “स्नेहज्योती” या निवासी अंधविद्यालयासाठी देणग्या गोळा करणे यासारखी अनेक कामे त्यांनी वर्षानुवर्षे केली.
नेटकेपणे हिशेब सांभाळण्याच्या जोडीला अप्पांकडे माणुसकी होती, एक विशाल सामाजिक दृष्टिकोन होता, व एका अढळ मूल्यव्यवस्थेच्या बंधनात राहून नव्या जुन्याचा संगम घडवणारी लवचिक विचारसरणीही होती. ज्ञातिसंस्थेतर्फे मूकबधिर संस्थेतील विद्यार्थ्यांना, किंवा सिरूर अनाथ बालकाश्रमातील मुलांना पारितोषिके देण्याची सर्वसमावेशक कल्पना त्यांचीच.
अप्पा प्रसिद्धिपराङ्मुख होते, आत्मविलोपी होते. सातत्याने माणसे उभी राहिली तरच संस्था चालतात हे त्यांना चांगले ठाऊक होते. मग एखाद्या संस्थेची आणि तिच्यातील व्यवहाराची घडी बसली की अप्पा आपली जागा घ्यायला इतरांना प्रवृत्त करीत. त्यांना आत्मविश्वास येईपर्यंत पडद्याआडून त्यांना सहकार्य करीत, आणि मग हळूच बाजूला होत. याच खाक्यात गेली कित्येक वर्षे त्यांचे बहुविध समाजकार्य अखंडपणे चालू होते. या विविधांगी सेवाकार्याला स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्राने २०१७ सालचा कै. रामभाऊ बर्वे समाजकार्य पुरस्कार देऊन दाद दिली होती.
पण ज्याबद्दल कुठलाही पुरस्कार मिळणार नाही अशीही कामे अप्पांनी केली. त्यांना जमिनीच्या व्यवहाराबद्दल सखोल माहिती होती. त्याचा उपयोग त्यांनी इतरांसाठीही केला. जमीन विकत घेऊन प्लॉटची सोसायटी बनवून आपल्याबरोबर इतरांना या व्यवहाराचा फायदा मिळवून देण्यासाठी अप्पा झटलेले मी पाहिले आहेत. पन्नास-साठ वर्षांपूर्वी, दर रविवारी सकाळी उठून मोजमापाची टेप, नकाशाची भेंडोळी, चुना, खुंट्या व सुंभ घेऊन डोंबिवलीला किंवा निळज्याला जाणारे अप्पा मला आठवतात. कारण सोबत माझे वडीलही असत. प्रकल्पात अप्पांबरोबर किमान वीस अन्य परिचितांचे प्लॉट असत. परिचितांचे काम फक्त अप्पांवर विश्वासून पैसे देणे व ते बोलावतील तेव्हा सह्या करायला हजर राहाणे. पण अप्पा त्या विश्वासाला जागत, सर्व स्नेह्यांची गुंतवणूक सांभाळण्याचे काम निष्ठेने करीत. जमिनीचे मोजमाप करणे, राखणदार नेमणे, वेळोवेळी प्लॉटवर जाणे, शेजारच्या अन्य जमीनधारकांशी चांगले संबंध राखून असणे ही सर्व कामे ते इतरांच्या वतीने करत. प्रकल्प यशस्वी झाला नाही तर जमीन विकून स्नेह्यांची गुंतवणूक परत मिळवण्याचे जिकिरीचे कामही तेच करत.
आम्ही अगदी लहान होतो तेव्हापासूनचा त्यांचा परिचय होता; अनेक कारणांनी. पहिले म्हणजे समाजकार्य म्हणून माझे वडील गिरगावात जी धंदे-शिक्षण शाळा सकाळी व संध्याकाळी चालवत (नवभारत औद्योगिक विद्यालय) तिथे संध्याकाळी अप्पा हिशेब लिहायला असत. दुसरे म्हणजे पार्लेकर असणे. तिसरे म्हणजे त्यांचे मूळ गाव हे माझ्या आईचे आजोळ. नातेच शोधायचे तर अप्पा हे माझे चुलत-मामे-मामा. (हे चुलत किती वेळा लिहावे लागेल ते माहित नाही, म्हणून एकदाच लिहिले आहे.) आम्ही लहान होतो तेव्हा नवभारतच्या कामानिमित्ताने किंवा वर उल्लेखलेल्या जमिनीच्या कामानिमित्ताने त्यांचे बरेचदा येणे होई. अप्पा आले की दिलखुलास गप्पा नि गोष्टी चालत. निर्विष विनोद नि नेमक्या नकला यांची बहार असे. त्यांनी नेहेमी आपल्याकडे यावे असे वाटे. तसे ते आमच्याकडे येतही, अगदी माझे आई-वडील गेल्यानंतरही. गेली पाच सात वर्षे विविध कारणांनी भेटीगाठीत खंड पडला तरी स्नेहसंबंध तसेच राहिले.
अप्पांच्या नवभारतशी असणार्या संबंधांमुळे मला कळले की ते शब्द-पुष्पांनी आणि काव्य-मालांनी देवी शारदेचीही आराधना करतात. ते छंदोबद्ध कविता करणारे चांगले कवीही आहेत. १९५९ साली नवभारतचा रौप्य महोत्सव झाला. त्या निमित्ताने गायलेले “नवभारत विद्यालय धन्य जाहले” या धृवपदाचे गीत त्यांनीच रचले होते. तर संस्थेचे अध्यक्ष प्रा. व्ही. जी. राव यांच्या पंचाहत्तरीच्या सत्कार समयी रचलेल्या गीताचे धृवपद होते “तुम्हा पाहुनी हर्षित होती असंख्य हृदये घरोघरी.” १९६५ला एका कौटुंबिक समारंभात त्यांच्या गावाला जाऊन राहाण्याचा योग आला. तिथे कळले की अप्पा हे नुसतेच कवी नव्हे तर शीघ्रकवीही आहेत. कार्याच्या ठिकाणी पंधरावीस मुले खेळता खेळता एका मुलाच्या हातून फुगा फुटला आणि तो रडू लागला. पुढल्या १० मिनिटात अप्पांनी त्या मुलाचे सांत्वन करणारी कविता लिहून त्याला आणि आम्हा सर्वांना वाचून दाखवली. मुखडा होता “फुगा फुटला, फुगा फुटला, कृष्णाच्या हातून फुगा फुटला”. शेवटी गर्वाचा, श्रीमंतीचा असे अनेक फुगे फुटत असतात, तिथे या रबरी फुग्याचे काय असे सांत्वनही होते. तिथेच अप्पांनी “चहा” या विषयावरही कविता लिहिल्याचे आठवते.
अप्पांच्या या पैलूशी ओळख झाल्यावर काव्य या विषयावरही आमच्या गप्पा चालत. ऑफिसमध्ये एखादी घडामोड घडली, जसे की साहेबांची निवृत्ती, की अप्पांची कविता तयार असे. अप्पांच्या दाणेदार अक्षरात स्टेन्सिलवर कविता लिहून, तिला महिरपी चौकट काढून त्याच्या चक्रीमुद्रित (cyclostyled) प्रती काढून वाटल्या जात. त्यातलीच एक प्रत आमच्या घरीही येई. त्याचे रसग्रहण चाले. पुढे अप्पांनी अनेक कविता लिहिल्या. त्यांचा संग्रह प्रकाशितही केला. आरत्या आणि भक्तिगीतेही लिहिली. त्यातील निवडक आरत्यांचा संग्रहही प्रकाशित केला. त्यांच्या अमेरिका प्रवासातील प्रत्येक फोटोखालीही त्यांनी लिहिलेले वर्णनपर काव्य वाचल्याचे आठवते. गेल्याच वर्षी त्यांच्या कवितांचा दुसरा संग्रहही प्रकाशित झाला, त्याची प्रतही त्यांनी आवर्जून पाठवली होती.
आणखीही एका गोष्टीची नोंद घेतली पाहिजे. वयाच्या ३४व्या वर्षापासून अप्पांना मधुमेह होता. मधुमेहासोबत इतर व्याधीही येतात हे तर सर्वज्ञात आहे. असे असूनही इतके दीर्घ, बहुविध आणि कार्यरत आयुष्य ते जगू शकले याचे कारण त्यांच्या जगण्यातली आणि आहार-विहारातली शिस्त. तीही कुणाला न बोचणारी – उलट मदतीचा हात पुढे करणारी.
अप्पा गेले आणि हा आत्मविलोपी मदतीचा हातही विरून गेला. अप्पांच्या या विविधांगी समाजकार्याला त्यांच्या कुटुंबीयांचाही, विशेषतः पत्नीचा हातभार होता. परमेश्वर अप्पांच्या कुटुबीयांना हा वियोग सहन करण्याचे बळ देवो या प्रार्थनेसह माझी अप्पांना श्रद्धांजली.
- विश्वास द. मुंडले
शब्द
शब्दांना माधुर्य लाभता स्नेह फुले भवती ।
कटुशब्दांनी निवडुंगासम काटे फोफावती ॥१॥
पाचोळ्यासम शब्द कोरडे उडती वार्यावर ।
करुणेमधुनी शब्द जोडती स्नेहाची तार ॥२॥
कलहामध्ये शब्द बोचरे लाह्यांसम फुटती ।
स्नेहामधुनी शब्द रेशमी सुगंध उधळीती ॥३॥
सहानुभूतिने अंकुर फुटती शब्दाशब्दांना ।
मत्सरात परि कटु शब्दांचा चाले धिंगाणा ॥४॥
मायेच्या शब्दांची हिरवळ मनास गोंजारी ।
कठोर शब्दे मनी वेदना होते खोलवरी ॥५॥
कडुनिंबातुन शब्द घोळता तसेच साकारती ।
साखरेत परि विरघळताना अमृतमय बनती ॥६॥
दयार्द्र प्रेमळ शब्दांतुनि ये बहर संस्कृतीला ।
द्वेषाग्नीच्या ज्वाळांमधुनी विनाश ठरलेला ॥७॥
अचुक शब्द ते म्हणुन निवडणे असे तुझ्या हाती ।
जीवन त्याने सोने करणे, वा करणे माती ॥८॥
- ना. अ. जुवेकर
Hits: 75
नाना /आप्पा जुवेकर यांच्या आत्म्यास सद्गती मिळो ही प्रार्थना…
भावपूर्ण श्रद्धांजली..
अप्पा जुवेकर उत्कृष्ट शब्द चित्र. अप्पांना सद् गति मिळो. अश्या लोकांवर लिहिले हेच विशेष, यांचे कार्य उजेडात आले नसते.
अप्पा जुवेकर…एक आदर्श व्यक्तीमत्व.!
त्यांच्या आत्म्यांस सद्गती लाभो.