त्रिएस्ते नाट्य – भाग २ – सुरुवात
दुसरे महायुद्ध १ सप्टेंबर १९३९ ला सुरू झाले असले तरी जर्मनीची युगोस्लावियातली चढाई ६ एप्रिल १९४१ ला सुरू झाली. युगोस्लावियाचा राजा लंडनला पळून गेला व तिथे त्याने परागंदा सरकार स्थापन केले. जर्मन विजेत्यांनी लगोलग १० एप्रिलला युगोस्लावियातून क्रोशियाला वगळून त्याचे स्वतंत्र राजेशाही राष्ट्र बनवून १९१८ साली घडवलेल्या युगोस्लाविया देशाची फाळणी केली. १७ एप्रिलला (म्हणजे केवळ ८ दिवसात) उर्वरित युगोस्लावियाचा पाडावही झाला. बल्गेरिया, हंगेरी, अल्बानिया यांना संलग्न असलेला युगोस्लाव टापू त्यात्या देशांना जोडला गेला. तर स्लोवेनिया जर्मनी व इटालीने वाटून घेतला. इटालियन सैन्य त्यानंतर लगेचच युगोस्लावियात घुसले व त्यांनी नवनिर्मित क्रोशिया देशाचा डाल्माशिया हा किनारी प्रांत किनार्यावरील बेटांसकट बळकावला. हा सारा प्रदेश त्यांना १९१८ साली व्हर्सायच्या तहाअंतर्गत सोडावा लागला होता. (खालील नकाशा पाहा) अक्ष-राष्ट्रांनी (जर्मनी, इटाली, जपान यांनी) १९ मे १९४१ रोजी क्रोशिया या नवनिर्मित राष्ट्राला इटालीच्या आधिपत्याखाली ठेवल्याने हे आक्रमणही अधिकृत झाले.
त्यात फाशिस्ट इटालियन, नाझी जर्मन, व त्यांचे युगोस्लावियातील हस्तक या सर्वांनी युगोस्लावियाच्या भूमीवर विविध ठिकाणी छळछावण्याही चालवल्या. हे आक्रमण व वंशविच्छेद यांनी युगोस्लाविया इटाली संबंधातली खदखद मात्र वाढली. या आक्रमणाला विरोध करणारी चळवळ लवकरच उभी राहिली. १९४१ ते १९४३ या काळात ही विरोधी चळवळ नाझी, फाशिस्ट व कम्युनिस्ट या तीन्हीच्या विरोधी होती. पण साम्यवादी जोसिप टिटो यांचा उदय झाल्यावर ही चळवळ केवळ जर्मनी व इटालीविरोधी राहिली. यथावकाश ब्रिटीश व अमेरिकन मदतीमुळे टिटो यांच्या संघटनेचे रूपांतर सेनादलात झाले. टिटो यांच्या नेतृत्वाखालील युगोस्लाव सैन्याने जर्मन व इटालियन सैन्याविरुद्ध दिलेल्या लढ्याचे वैशिष्ठ्य असे की त्यांनी वेळोवेळी ब्रिटिश, अमेरिकन, वा रशियन सैन्याची वा सरकारची जरी मदत घेतली असली तरी सैनिकी कारवाईत पुढाकार युगोस्लावियन सेनेचाच असे. चढाईतील पुढाकार अमेरिकन, ब्रिटीश वा रशियनांचा, व स्थानिक चळवळींकडे केवळ साहाय्यक भूमिका असे नव्हते. थोडक्यात युगोस्लाव भूमीवर कुठलीच दोस्त राष्ट्रांची सेना स्थिरावली नाही, तर टिटो यांच्या नेतृत्वाखाली युगोस्लाव सेना प्रत्यक्ष युद्धाच्या अनुभवाने समर्थ बनत गेली.
८ सप्टेंबर १९४३ ला इटालीचा पाडाव झाला व पारडे युगोस्लावियाच्या बाजूने फिरले. टिटो यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्रपणे चालणार्या युगोस्लाव सेनेने इटालियन-जर्मन जोखडाखालून आपला देश मुक्त करत करत, शेवटी इटालीवरच आक्रमण केले. ३० एप्रिल १९४५ ला, युरोपातील युद्ध संपता संपता, युगोस्लावियाने मोठा इटालियन सीमावर्ती प्रदेश व्यापला. जवळजवळ संपूर्ण त्रिएस्ते शहर काबीज केले. आता त्रिएस्ते मामल्याची सुरुवात झाली.
त्यानंतर युगोस्लाव सेनेने केवळ नाझी जर्मन व फाशिस्ट इटालियनच नव्हेत तर युगोस्लावियाला वा साम्यवादाला विरोध करणार्या हजारो माणसांना सरळ सरळ गोळ्या घातल्या किंवा त्यांची युगोस्लावियातील छळछावण्यांत रवानगी केली. पण हे हत्यासत्र १२ जून १९४५ पर्यंत, म्हणजेच ब्रिटिश अमेरिकन सेनेचा हस्तक्षेप होईपर्यंत चालले. त्रिएस्तेवासीयांच्या लेखी या काळ्या कालखंडाचे नाव आहे, “त्रिएस्तेतले चाळीस दिवस”. इटाली युगोस्लाविया संबंधाला आता सूडाचा एक नवाच पीळ आला.
खरे तर जर्मनांशी लढायला टिटो यांना ब्रिटिश अमेरिकन फौजांनी भरीव मदत केलेली होती. त्याच बळावर १९४५च्या फेब्रुवारी मध्ये फील्डमार्शल अलेक्झांडर व जोसिप टिटो यांच्यात एक अनाक्रमणाचा अलिखित करार झाला.होता. पण टिटोंनी तो धुडकावून लावला होता. ७ मे १९४५ या दिवशी फील्डमार्शल अलेक्झांडर यांचे चीफ ऑफ स्टाफ जनरल मॉर्गन यांनी टिटो यांची भेट घेतली. पण टिटो ऐकेचनात. तेव्हा टेबलावरील नकाशावर जनरल मॉर्गन यांनी एक रेषा काढून ब्रिटिश अमेरिकन सैन्य युगोस्लाव सेनेला या रेषेच्या पूर्वेला ढकलायला सुरुवात करत आहे अशी तंबी दिली. १२ जून १९४५ ला ब्रिटिश अमेरिकन सेनेने त्रिएस्तेमध्ये सैनिकी हस्तक्षेप केला, व या शहरावर काबू मिळवला.
जनरल मॉर्गन यांनी काढलेल्या या रेषेलाच पुढे मॉर्गन लाइन असे नाव मिळाले. व एक तात्पुरती व्यवस्था म्हणून इटालियन-युगोस्लाव सीमेवरील वादग्रस्त प्रदेशाची दोन भागात विभागणी झाली.इटालियन बहुसंख्येचा “ए” विभाग, ज्यात त्रिएस्ते शहर होते, तो ब्रिटिश अमेरिकन फौजेच्या ताब्यात राहिला. तर स्लोवेनियन (किंवा युगोस्लाव) बहुसंख्येचा “बी” विभाग युगोस्लाव सेनेच्या ताब्यात ठेवण्यात आला. या करारातला गुंता असा की ए विभागाच्या पोटातील एक स्लोवेनियन बहुसंख्येचा प्रदेश युगोस्लाव सेनेच्या ताब्यात होता, तर बी विभागाच्या पोटात इटालियन प्रदेशाशी असंलग्न असे एक बंदर दोस्त फौजांच्या ताब्यात होते.एकंदरीत, सर्वमान्य सीमेअभावी युगोस्लाविया-इटाली संबंध मात्र तसेच भळभळत राहिले.
पुढील दोनच वर्षात, जानेवारी १९४७ ला संयुक्तराष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावाने इटालीने गिळंकृत केलेला डाल्माशियन प्रदेश, तसेच इटालियन व जर्मन फौजांनी बळकावलेला स्लोवेनियाही युगोस्लावियाला परत मिळाला. पण त्याचबरोबर संयुक्तराष्ट्रांनी स्वतंत्र त्रिएस्ते शहर-राज्याची निर्मितीही केली. या राज्यासाठी पश्चिमेकडील इटालीजवळच्या “ए” विभागातून २२२ चौकिमीचा भाग (ज्यात त्रिएस्ते शहर होते) व पूर्वेकडच्या युगोस्लावियाच्या अखत्यारातील “बी” विभागातून ५१६ चौकिमीचा प्रदेश संयुक्त राष्ट्रांनी ताब्यात घेतला. लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की त्रिएस्ते शहराप्रमाणेच, इथेही तथाकथित अल्पसंख्य हे बहुसंख्यांच्या तुलनेत केवळ २% किंवा ५% नव्हते, तर त्यापेक्षा कितीतरी अधिक होते. उदाहरणार्थ स्लोवेनियन बहुसंख्या असलेल्या “बी” विभागातही इटालियनांची संख्या साधारण ३०%-४०% होती.
त्रिएस्ते हे स्वतंत्र शहर-राज्य करण्यातला पाश्चिमात्य राष्ट्रांचा हेतू हा की कम्युनिस्ट युगोस्लावियाचा त्रिएस्तेवरील दावा दुबळा व्हावा, व कम्युनिस्ट विरोधात आपल्या बाजूने अजून एक राष्ट्र उभे राहावे. पण हा डाव ओळखून रशियाने वेळोवेळी आक्षेप घेऊन या नव-स्वतंत्र राज्याला स्वत:ची अशी शासनव्यवस्था मिळूच दिली नाही. स्वाभाविकपणे तो भाग ब्रिटीश-अमेरिकन सेनेच्या आधिपत्याखालीच राहिला. पण त्यामुळे युगोस्लावियाची नाराजी व गुंतागुंत मात्र वाढली. या स्वतंत्र राज्याबाबत काय करावे? तसेच ठेवावे की इटाली किंवा युगोस्लावियात सामील करावे? हंगामी सीमा असलेल्या मॉर्गन रेषेऐवजी इटाली व युगोस्लाविया यांचे दरम्यान कायमस्वरूपी सीमारेषा काय असावी? अल्पसंख्यकांचे काय करावे? ह्या सार्या समस्या म्हणजेच “त्रिएस्ते मामला”.
हा मामला १९४७ ते १९५४ पर्यंत नुसताच धगधगत राहिला. त्याची उकल न होण्याचे मुख्य कारण होते युगोस्लाविया व रशिया यांच्यातील बेबनाव. रशियाने इतर नव-कम्युनिस्ट राष्ट्रांप्रमाणे युगोस्लावियाला आपल्या अंकित ठेवण्याचा प्रयत्न केला. पोलंड, चेकोस्लोवाकिया, हंगेरी, रुमानिया, बल्गेरिया यासारख्या देशांबाबत ते शक्य झाले कारण या सर्व देशांना जर्मन जोखडाखालून स्वतंत्र करण्याच्या निमित्ताने रशियन सैन्य तिथे तळ ठोकून होते. विरोधकांवर सैनिकी कारवाई सहज शक्य होती, नि तशी ती झालीही. पण युगोस्लाविया हा देश त्यांच्या स्वत:च्याच सेनेने स्वतंत्र केला होता. युगोस्लावियात रशियन सैन्याचे तळ नव्हते. तेव्हा युगोस्लावियावर प्रभाव टाकण्यासाठी रशियाला युगोस्लावियाच्या सीमेवर युद्धच छेडावे लागले असते. पण ते झाले नाही, याचे एक कारण म्हणजे जवळच असलेल्या ब्रिटिश अमेरिकन सेनेकडून हस्तक्षेपाची शक्यता. त्यात महायुद्धामुळे रशियाची आर्थिक स्थितीही बिघडलेली होती. याचा परिणाम इतकाच झाला की १९४८ साली रशिया व युगोस्लाविया या दोन कम्यनिस्ट राष्ट्रांचे संबंध दुरावले. रशियाने युगोस्लावियाची कोंडी करण्याचा प्रयत्न करताच टिटो यांनी सरळ ब्रिटन अमेरिकेची मदत मागितली. युगोस्लावियाचे कम्युनिस्ट तत्वज्ञान व त्रिएस्ते मामल्यातील त्यांच्या वर्तनाकडे कानाडोळा करून ती त्यांना मिळालीही.
टिटो यांचे रशियाशी असलेले वैर पचवणे स्टॅलिन यांना फारच जड गेले असे अनेकांनी नोंदवले आहे. रशियापेक्षा युगोस्लाविया हे कितीतरी छोटे राष्ट्र. पण ते रशियन दादागिरीपुढे नमले नाही. याची दोन कारणे वर दिलीच आहेत. मग स्टॅलिन यांनी टिटो यांच्या हत्येचे किमान ५ ते ६ प्रयत्न केले. पण युगोस्लाव गुप्तहेर संघटनेने ते सर्व हाणून पाडले. असे म्हणतात की शेवटी टिटो यांनी स्टॅलिनला असा निरोप पाठवला की “बंद करा हे मारेकरी पाठवणे. ते सर्व पकडले गेले आहेत. नाहीतर मलाही एक पाठवावा लागेल. आणि दुसरा पाठवावा लागणार नाही”. या सर्व धबडग्यात त्रिएस्ते मामल्याचे घोंगडे जे भिजत पडले, ते १९५३ साली स्टॅलिन यांच्या मृत्यूनंतर युगोस्लावियाची रशियाशी तडजोड होईपर्यंत.
ब्रिटिश अमेरिकन सरकारांचे इटालीशी संबंध मधुर होते. युगोस्लावियाशी मात्र त्यांचे संबंध बरेचदा कडूच राहिले. एका वेळी तर युगोस्लाव सेनेने अमेरिकन विमानावर हल्ला करायलाही मागेपुढे पाहिले नव्हते. १९४८ ते १९५३ या काळात त्यात अल्पसा गोडवा आला तो युगोस्लाविया-रशिया बेबनावामुळेच. पण युगोस्लाविया व इटाली या दोहोंत डावे उजवे करताना तत्कालीन कम्युनिस्टविरोधाचे राजकारणाला अनुसरून ब्रिटिश अमेरिकन सरकारे ही इटालीधार्जिणी होती यात काय नवल? त्यात युगोस्लावियाने इटालियन बहुसंख्याक“ए” विभागातील विविध गावांवर व आजूबाजूच्या प्रदेशावर दावा केल्याने गुंता वाढला होता. आणि त्रिएस्ते मामला सुटल्याखेरीज ब्रिटीश अमेरिकन सैन्याला माघार घेता येत नव्हती. त्रिएस्ते मामल्याच्या सोडवणुकीसाठी इटाली, युगोस्लाविया, ब्रिटन, व अमेरिका या चारही पक्षांदरम्यान १९४७ पासूनच लंडन येथे गुप्त वाटाघाटी सुरू होत्या. या लांबलेल्या वाटाघाटींची सांगता झाली ती ५ ऑक्टोबर १९५४ या दिवशी एक गुप्त असा लंडन करार करून. पण ब्रिटिश व अमेरिकन सैन्याची सोडवणूक करणारा हा करार होण्याआधी तुम्हाआम्हा जनतेच्या दृष्टीआड एक नाट्य घडले होते. काय घडले होते?
-विश्वास द. मुंडले
संदर्भ १ – https://en.wikipedia.org/wiki/Trieste
संदर्भ २ – https://en.wikipedia.org/wiki/Italy
संदर्भ ३ – https://en.wikipedia.org/wiki/Free_Territory_of_Trieste
संदर्भ ४ – http://www.encyclopedia.com/history/united-states-and-canada/us-history/relations-yugoslavia
चित्रांच्या मराठीकरणासाठी श्रीराम शिवडेकर यांना धन्यवाद.
पुढील भाग – ३ – कळस आणि प्रतिकळस
Hits: 17
Recent Comments