जिणे गंगौघाचे पाणी – एक रसग्रहण
नाही पुण्याची मोजणी । नाही पापाची टोचणी । जिणे गंगौघाचे पाणी ॥१॥
कशाचा न लागभाग । कशाचा न पाठलाग । आम्ही हो फुलांचे पराग ॥२॥
आम्हा नाही नामरूप । आम्ही आकाश स्वरूप । जसा निळा निळा धूप ॥३॥
पुजेतल्या पानाफुला । मृत्यू सर्वांगसोहळा । धन्य निर्माल्याची कळा ॥४॥
या कवितेत कवी बोरकर स्वतःबद्दल बोलत आहेत हे लगेच कळते. पण कथनाचा विषय मृत्यू आहे हे पार शेवटी शेवटी कळते! बोरकरांनी ही कविता मृत्यूच्या केवळ दोन वा तीन वर्षांपूर्वीच लिहिली होती. असे म्हणतात की अपरिवर्तनीय अशी मृतावस्था येण्यापूर्वी बर्याच आधी मृत्यू आपली जाणीव करून देत असतो. कधी नुसती चाहूल देतो, तर कधी त्या पल्याडच्या विश्वाच्या दरवाज्यापर्यंत नेऊन मागे आणतो. आणि जीवनाची अशी अखेर दिसली की माणसे मृत्यूबाबत विचार करू लागतात. बोरकरांना आपला मृत्यू असा आधीच दिसला होता का? त्या अवस्थेत त्यांना ही कविता सुचली होती का? कळायला मार्ग नाही.
मला असे वाटते की “आपुले मरण पाहिले म्यां डोळा” म्हणणार्या तुकाराम महाराजांप्रमाणेच बोरकरांची ही कविता भविष्यात आपला मृत्यूकडे होणारा प्रवास डोळसपणे पाहाते, त्याच्या विविध पैलूंचे चिंतन करते. आणि जनसामान्य वाचकाला भावतील अशा सामान्य जगातल्या उपमांतून तो प्रवास उलगडते. रसरशीतपणे जीवन जगणार्या बोरकरांना भविष्यातील वास्तवाची कल्पना करण्यात कसली अडचण? जे न देखे रवी, ते देखे कवी. अर्थात्, जिवंतपणीच देहबुद्धी सोडून जगणार्या तुकाराम महाराजांच्या कल्पनेतले अहंभावाचे आणि कामक्रोधमायारूपी देहाचे मरण (उदा. पाहा “जाला प्रेतरूप शरीराचा भाव”, किंवा “बोळविला देह आपुलेनि हाते”) आणि बोरकरांसारख्या रसलंपट गोसाव्याच्या कल्पनेतले मरण यात भेद असणे हे स्वाभाविकच. तेव्हा या कवितेतून उलगडणारी बोरकरांची मरण-कल्पना समजून घ्यायची तर जगणे, आणि त्यातही सामान्य मानवाचे जगणे, समजून घेतले पाहिजे.
जन्माला आल्यापासून माणसाचा, नव्हे प्रत्येक जीवाचाच, जगण्यासाठी विविध पातळ्यांवर विविध प्रकारे संघर्ष सुरू असतो. मनुष्यप्राण्यांसाठी हा संघर्ष, शारीरिक पातळीवर आणि मानसिक पातळीवर, निसर्गाशी आणि समाजाशीही, इतरांशी आणि स्वतःशीही असतो. तुकाराम महाराज म्हणतातच ना, “रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग । अंतर्बाह्य जग आणि मन ॥”. पण जनसामान्यांपुरते बोलायचे तर उत्क्रांत होत जाणार्या तीन पातळ्यांवर हा संघर्ष करीत माणसे जगत असतात.
त्यातले प्राथमिक जगणे म्हणजे प्रत्येक सजीवाप्रमाणे निसर्गात राहूनही “देहधारी सजीव” हे वेगळेपण जपणे. कसे असते हे वेगळेपण? निसर्गातली निर्जीव वस्तू दिवसा तापते रात्री थंड पडते. सदैव निसर्गाशी तादात्म्य किंवा एकरूपता राखते. पण आपण देहधारी सजीव जिवंत असेपर्यंत आपले अंतर्याम निसर्गाहून वेगळे राखत असतो. बाहेर कितीही तपमान असो, आपल्या शरीराचे तपमान ३७ अंश सेलसिअसच राहाते, हे त्या वेगळेपणाचे एक उदाहरण. या देहाची निसर्गाशी सर्वस्वी एकरूपता होते ती मृत्यू नंतरच.
दुसरी पातळी निकटवर्तीयांबरोबर परस्परांच्या साहाय्याने जगण्याची. वाढत्या वयासोबत ही पातळी उत्क्रांत होत जाते. हे निकटवर्तीय म्हणजे आपले कुटुंबीय, सहचर/सहचरी असतील, किंवा आपल्या कार्यक्षेत्रातले सहकारी असतील. थोडक्यात तुमच्या जगण्याला किंवा तुमच्या हेतुपूर्तीला प्रत्यक्षपणे साहाय्यभूत होणारे सगळेच जीव यात मोडतील. त्यांच्यासोबतचे आपले जगणे हे आपल्या जीवनाचे दुसरे उत्क्रांत अंग.
तिसरी पातळी आपल्या जगण्याला अप्रत्यक्षपणे साहाय्यभूत होणार्या समाजात जगण्याची. इतर प्राणीही परस्परांच्या सहकार्याने जगत असतात. पण त्यामागे केवळ निसर्गदत्त अंतःप्रेरणाच असते. पण मनुष्यप्राणी म्हणून आपण इतर सजीवांपेक्षा काही वेगळेपण जपतो. अंतःप्रेरणेला आवर घालणे महत्वाचे मानतो. त्यातूनच संस्कृती उदयाला येते. ज्यांना हे मानवी वेगळेपण जपता येत नाही त्यांना आपण “साक्षात् पशुः पुच्छविशाणहीन:”, अर्थात् शिंगे व शेपटी नसलेले पशु म्हणतो. पण या सुसंस्कृत मानव-समाजात राहूनही एक व्यक्ती म्हणून आपण आपले वेगळेपण राखून असतो. मतभेद नोंदवतो, नवविचार सुचवतो, तर कधी जुळवून घेतो, इ. इ. या समाजाशी कळत नकळत देवाणघेवाण करीत आपण आपले आयुष्य जगत असतो. उशिरा उत्क्रांत होणारी ही तिसरी पायरी!
माणसाचा मृत्यूकडे होणारा प्रवास ही उत्क्रांत रचना उलट्या क्रमाने उसवत जातो असे बोरकरांना वाटत असावे. त्यांच्या मते व्यक्तीचे सामाजिक अस्तित्व हरपणे ही मृत्यूकडल्या प्रवासाची पहिली पायरी!
नाही पुण्याची मोजणी । नाही पापाची टोचणी । जिणे गंगौघाचे पाणी ॥१॥
माणसे समाजात जगतात. आणि समाजात जगायचे तर सामाजिक बंधने आपोआप येत जातात. पाप पुण्य या संकल्पना त्यातूनच उदयाला येतात व पाळल्या जातात. समाजात सुबकपणे जगण्यासाठी अधिकाधिक पुण्य (जसे की परउपकार, इत्यादी) गाठी बांधावे. पापाची (उदाहरणार्थ परपीडेला कारण ठरणे इत्यादींची) टोचणी लागून वर्तन सुधारावे. ही सामान्य रीत. पण जीवनाकडे पाठ फिरवू पाहाणारा जीव मृत्यूला भेटायला निघताना प्रथम समाजातून सर्वस्वी निवृत्त होत असतो. समाजाकडे पाठ फिरवली की पाप-पुण्य या संकल्पना व्यर्थ ठरतात. तिथे पुण्याची मोजणी कशाला करावी, आणि पापाची टोचणी तरी का लावून घ्यावी? मग जिणे कसे उरते – की जसे “गंगौघाचे पाणी”.
बोरकर या उताराकडे लागलेल्या जिण्याला गंगा ठरवीत नाहीत, गंगेचा ओघही ठरवीत नाहीत. हे “जिणे” आहे “गंगौघाचे पाणी”. ते निसर्गतः वरून खाली वाहात चालले आहे. या निसर्ग-शरणतेपोटीच, निसर्ग-नियमानुसार त्या पाण्याचा ओघ बनला आहे. या गंगेच्या ओघाने कोणाला पावित्र्य दिले, वा कोणाला जलसमाधी दिली त्याची पापपुण्यात्मक गणना त्या ओघाचा एक अतिसूक्ष्म घटक असणार्या पाण्याने कशी करावी, का करावी? ते पाणी तर निसर्गाशी एकरूप होऊन ओघ बनून धावत चालले आहे. जे निसर्गतः घडते, ते होऊ देत आहे. हा जीव जगू पाहात असता, तर तो असा निसर्गशरण नसता. तो जीव निसर्गाशी झगडला असता. पण आता ते नाही. निसर्गाला शरण जाण्याची पहिली पायरी झाली. मानवानेच रचलेल्या समाजापासून, त्याच्या बंधनापासून सुटकेची पहिली पायरी ओलांडली.
कशाचा न लागभाग । कशाचा न पाठलाग । आम्ही हो फुलांचे पराग ॥२॥
समाजाकडे पाठ फिरवल्यावरही माणूस उरतो, तो आपल्यापुरता. सामान्यतः आपल्यापुरते जगतानाही हा जीव प्रत्यक्षपणे आपल्या निकटवर्तीयांवर अवलंबून राहिला असता. पण मृत्यूकडे प्रवास करू पाहाणार्या या जीवाला व्यक्तिशःही आता काहीच साध्य करायचे नाही. कोणाशी वा कशाशी संलग्न राहावे, कशाचा हव्यास धरावा किंवा कशाच्या मागे लागावे असे काहीच उरलेले नाही. हे जिणे कसे? तर फुलांच्या परागांसारखे. फुलांचे पराग ज्या फुलात उपजतात, तिथून ते वार्यावर उडून विखरून जातात. एका विवक्षित दिशेने नव्हे, तर वारा नेईल तिथे. मग एखादा परागकण नष्टही होईल किंवा एखाद्या नवीन वृक्षाला जन्मही देईल. पण जाणीवपूर्वक यापैकी काही करणे ही त्या परागकणाची इच्छाच नाही. त्याने स्वतःला निसर्गावर सोपवून दिले आहे. मूळ फुलाशी लागभाग नाही. किंवा परागीभवनच करणार असा हव्यास नाही, आणि त्यासाठी दुसर्या एखाद्या फुलाचा पाठलागही नाही. इथेही निसर्गाशी झगडा नव्हे तर पावलापावलाने मृत्यूकडे जाणारी निसर्गशरण वृत्तीच आहे.
आम्हा नाही नामरूप । आम्ही आकाश स्वरूप । जसा निळा निळा धूप ॥३॥
पाप-पुण्य सांडले, काही हेतूच उरले नाहीत, कशाचाही लागभाग उरला नाही तरी तुमचे देहरूप व्यक्तित्व उरतेच. जीवाला शेवटी तेही सांडायचेच आहे. त्याची पहिली पायरी म्हणजे तुमचे नामरूप सोडून द्यायचे. हाडामांसाची माणसे मृत्युशय्येवर आपले नावही विसरतातच ना! त्यानंतर मग जीवाने शून्यवत् व्हायचे आहे. परंपरेने त्याला “पंचत्वात विलीन होणे” म्हणतात. पण ही पंचत्वाची संकल्पना पृथ्वीवरील संस्कृतीशी निगडित आहे. बोरकरांचा दृष्टिकोन अधिक विशाल आहे. त्यांना या विशाल विश्वाच्या अवकाशात विरून जायचे आहे. म्हणून बोरकर त्या पंचत्वापैकी सर्वव्यापी आकाश निवडतात, आणि स्वतः आकाशस्वरूप होतात. कार्ल सागान म्हणाला होता की या विश्वातील तार्यांमधील अणूंपासूनच मीही बनलो आहे. मरणात बोरकर याच्याउलट प्रक्रिया कल्पितात. पुनश्च अवकाशात विरून जातात. या आकाशात विरून जाणार्या अस्तित्वाला बोरकर “निळा निळा धूप” म्हणतात, आणि सहजपणे ती विरून जाण्याची प्रक्रियाही दाखवतात. मृत्यूच्या अवस्थेला “डोळे मिटणे” असा वाक्प्रचार आहे. असे म्हणतात की मृत्यूच्या दरवाज्यात जीवाला प्रखर प्रकाश दिसतो. कदाचित पापण्या मिटून उजेडाकडे पाहिल्यावर दिसणार्या निळाईलाच बोरकर “निळा निळा धूप” म्हणत असावेत!
पुजेतल्या पानाफुला । मृत्यू सर्वांगसोहळा । धन्य निर्माल्याची कळा ॥४॥
अशा प्रकारे सामाजिक आणि व्यक्तिगत अस्तित्व सांडून उन्मुक्त अवस्थेत गेल्याची कल्पना करून बोरकर स्वतःकडे पाहताहेत. तुकाराम महाराजांप्रमाणेच त्यांना “तो झाला सोहळा अनुपम्य” असेच वाटते आहे. आणि सोहळा म्हटल्यावर त्यांना दिसते आहे पूजा. पूजेत वापरलेले पान वा फूल खुडले जाते, तो त्या पानाफुलाचा मृत्यूच असतो. पण देवाला वाहिलेल्या त्या फुलापानासाठी तो “मृत्यू” हा “सर्वांग सोहळा” च म्हटला पाहिजे – आपल्या सर्वांगाने सगुण देवत्वाला खुलवणारा सोहळा. तुकाराम महाराज म्हणतात “शरीर ज्याचे त्यासी समर्पिले”. बोरकर त्या शरीराला पूजेतल्या पानाफुलाची उपमा देतात, आणि ते देवाला वाहातात. देवाला वाहिलेल्या पानाफुलाला येणारी निर्माल्य अवस्था ही देखील बोरकरांना धन्यता वाटते. खरे आहे. आपण देवावरचे निर्माल्यही प्रसादवत् मानतो. त्या अर्थानेही हा मृत्यूचा सोहळाही अनुपम्यच.
मरण-कल्पनेचे पदर इतक्या सुबकपणे मांडून दाखवणारे बोरकर गोसावीच म्हटले पाहिजेत – तुमच्या आमच्या जाणिवा विस्तारणारे गोसावी.
- विश्वास द. मुंडले (२२ ऑक्टोबर २०२१)
Hits: 66
छान विश्लेषण.