स्वर्गसुखाची लज्जत न्यारी
व्हॉट्सॅप विद्यापीठात बरेच तत्त्वचिंतन ढकलत ढकलत आपल्यापर्यंत पोचत असते. त्यातलीच एक अनामिक मृत्यूविषयक तत्त्वचिंतक कविता मजपर्यंत पोचली. ती अशी –
कितीक केले प्रवास आणिक । किती बिर्हाडे घरे बदलली ॥
सामानाचे ढीग वाढले । भरहि त्यामधे पुन्हा टाकिली ॥१॥
हे घेऊ अन् ते ठेवू का । नकोच काही टाकायाला ॥
माहित नाही काय यातले । कधी येतसे उपयोगाला ॥२॥
कानतूटका कपही असतो । जुनेर किंवा पायपोसही ॥
असु दे घेऊ बांधुन तो ही । वाढत गेला असा सोसही ॥३॥
कपाट खुर्ची पलंगासह । सतरंजी अन् मच्छरदाणी ॥
कळशी हंडे डबे झाकणे । चिंधीलाही किती मागणी ॥४॥
हव्यासाला पार नसे हे । माझे माझे कवळुन बसतो ॥
दूर कुठेतरि उभा राहुनी । “तो” मिश्किलसा मजेत हसतो. ॥५॥
मावळतीची किरणे जेव्हा । कणाकणाचा निरोप घेतिल ॥
“तो” हाताला धरुनी तेव्हा । प्रवास तिथला मजला घडविल ॥६॥
पिशव्या नाही, पेट्या किंवा । बटवा सुद्धा नाही नेणे ॥
निघायचे तरि आनंदाने । तन ओझेही इथे ठेवणे ॥७॥
किती रम्य तो प्रवास ज्याची । नाही करणे काही तयारी ।
चालत सुद्धा जाणे नाही । केवळ सुटते श्वास पायरी ॥८॥
या रचनेचा मूळ कवी अज्ञात आहे. ही कविता, विशेषतः शेवटचे कडवे, आणि त्यातही श्वास पायरी सुटणे ही कल्पना मला फारच आवडली. पण ही झाली मृत्यूची एक तात्त्विक बाजू. तत्त्व व व्यवहार अशी जोडगोळी मांडली तर व्यावहारिक बाजूला काय असेल? त्यावर मला सुचलेली कविता अशी.
असा शेवटी निरोप घेउन । अस्मादिक स्वर्गाला गेले ॥
चित्रगुप्त मज अडवे दारी । म्हणतो, “स्वामी, तुमचे चुकले!” ॥१॥
जमविण्यात या अर्थ न काही । हे तुम्हा जरि उशिरा कळले ॥
तोवरि जमल्या इस्टेटीचे । वाटप कैसे नच सांगितले ॥२॥
तुमच्या जागेवरुनी आता । नातेवाइक भांडत बसले ॥
सहनिवास संचालक तेही । याबाबत पुरते गोंधळले ॥३॥
या सर्वांना सल्ला द्याया । स्नेही वकील जमले नामी ॥
या सगळ्या मामल्यात तुमची । किती किती होते बदनामी ॥४॥
इस्टेट असो, कितिही कशिही । तरिही करणे भाग, तयारी ॥
इच्छापत्र लिहिले जर तर । स्वर्गसुखाची लज्जत न्यारी” ॥५॥
तेव्हा मित्रहो, काहीही लहानमोठी स्थावर वा जंगम (वस्तुरूपी वा अधिकाररूपी) मालमत्ता बाळगून असाल, आणि कुठल्याही वयाचे असाल, तर इच्छापत्र अवश्य करा ! विशेषतः तुमच्या नावे एखाद्या लहान-मोठ्या शहरात मालकीचे घर, गावाला जमिनीचा तुकडा असेल तर इच्छापत्र करायला मुळीच विसरू नका. तुमच्या मालमत्तेबाबत विवाद होण्याची शक्यता वाटत असेल तर त्याची नोंदणीही अवश्य करा.
या विषयावर मदतगार होतील असे अनेक संदर्भ उपलब्ध आहेत. त्यापैकी एक इथे पाहा.
- विश्वास द. मुंडले
पुलंचा अंतू बर्वा म्हणतो ना, की, “परांजप्यान् सीमोल्लंघन केलनीत. अवघ्या देहाचें सोने झालें.” त्याची आठवण झाली म्हणून ही पोस्ट आजच टाकली.
Hits: 55
एकदम पटण्यासारखे.!
सर्वाना खूपच उपयुक्त. एकच मूल असेल तर त्याचे नांव सर्व ठिकाणी दुसरे असावे. बसायचा पाट आपल्या हयातीत मुलास किंवा मुलीस कधीच देऊ नये.
Congratulations Vishwas…..good poetic skills on display… & an interesting way to nudge people to make a Will.