मुंबई ग्राहक पंचायत – जगाच्या मंचावर – ३

परिचय

भारतीयांनी जगाच्या मंचावर आपला प्रभाव पाडणार्‍या घटना या नेहेमीच आनंददायक असतात. त्यापैकीच ही एक. आनंदवर्धक बाब ही की या घटनेशी संबंधित दोन व्यक्ति (लेखक शिरीष देशपांडे व एक सहकारी वसुंधरा दाते देवधर) या माझ्या पाटिविमधील सहाध्यायी होत्या.

शिरीष देशपांडेचा मूळ लेख वॉट्सपवर फिरत होता, त्याचे हे सचित्र व संपादित रूप- भाग तिसरा व शेवटचा. अगोदर वाचला नसल्यास पहिला भाग इथे वाचा, तर दुसरा भाग इथे.

स्मरणरंजन – वर्धापन दिनाचे – ३

जिनिव्हातील २०१३ मधील पहिली फेरी आपण जिंकली होती.‌ अमेरिकेसह काही प्रगत राष्ट्रांच्या विरोधाला वेसण घालत, सुधारीत होणाऱ्या UNGCP अंतर्गतच त्याच्या अंमलबजावणीसाठी UN Commission on Consumer Protection स्थापन केले जावे या आपल्या सूचनेवर UNCTADने दहा देशांचा कृतिगट नेमला होता, हे आपण पहिल्या लेखात पाहिले. इतकेच नव्हे तर UNGCP मध्ये बदल करण्यासाठे आणखी तीन गटही नेमले होते. सन २०१३ मधील बैठकीनंतर भारतात परतल्यावर UNCTAD कडून आपल्याला या चारही कृतिगटांसाठी प्रश्नावली प्राप्त होत असत.  त्यावर अभ्यास करणे, कंझ्युमर्स इंटरनॅशनलच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणे, आणि UNCTADला प्रतिसाद कळवणे असा हा कामाचा प्रकार होता. या सर्व गटांच्या कार्यवाहीत मुंबई ग्राहक पंचायतीने UNCTAD च्या जागतिक मंचावर MGP-India चा ठसा उमटवला हेही आपण दुसर्‍या लेखात वाचले.

Mr. Narendra Modi

हे सर्व होईपर्यंत वर्ष उलटलं होतं. आणि त्याबरोबरच २०१४ मधे केंद्रात सरकारही बदलले. नरेंद्र मोदींचे सरकार आले आणि चित्र पालटले. आपण UNCTAD ला चारही गटात सहभागी होऊन आपल्या सूचना देत होतो. तसेच केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयातील उच्च स्तरीय अधिकाऱ्यांशीही संपर्कात होतोच. २०१३ मधे जिनिव्हाला येऊन मूग गिळून गप्प बसणाऱ्या अतिरिक्त सचिव या तोपर्यंत निवृत्त झाल्या होत्या. त्याजागी आलेले अतिरिक्त सचिव गुरुचरण सिंह हे एकदम धडाडीचे आणि कल्पक. त्यांना भेटून सर्व कल्पना दिल्यावर त्यांनी स्वतः जातीने यात लक्ष घातले आणि सरकारतर्फे आपल्या सूचनेला संपूर्ण पाठिंबा देण्याचे मान्य केले. त्याचबरोबर ग्राहक व्यवहार राज्य मंत्री म्हणून सी. आर. चौधरी यांची नेमणूक झाली होती. त्यांच्याशीही आपण संवाद साधला. ते तर आपल्या संस्थेच्या प्रेमातच पडले होते. त्यांनी आपल्याला पुढे खूपच मदत केली. त्यावर सविस्तर कधीतरी लिहीन.

दरम्यान २०१४ मधे जिनीव्हात UNGCPतील सुधारणांवर चर्चा करण्यासाठी पुन्हा दोन दिवसांची एक परिषद UNCTAD तर्फे घेण्यात आली. UNGCPमधे अनेक दुरुस्त्या/सुधारणा करण्याच्या सूचना विविध देशांकडून UNCTAD कडे आलेल्या होत्या. त्याला या चर्चेत चाळणी लावून शेवटी निवडक सूचनांचा मसुदा अंतिमतः विचारार्थ घेतला जाणार होता. या वेळीही आपल्या त्या सूचनेला अमेरिकन गटातर्फे विरोध कायम राहिला. तर काही देशांनी आपल्या सूचनेवर काही बदल सुचविले.

UNCTAD परिषदेत वर्षा राऊत

याच बैठकीत प्रत्येक देशात इ-कॉमर्सचे ग्राहक, वित्तीय ग्राहक, पर्यटक/ प्रवासी या सर्वांचे संरक्षण तसेच तक्रार निवारण करणारी यंत्रणा किमान कशी असावी, याबद्दल UNGCP मधे काय तरतुदी कराव्या यावर खूप छान आणि उद्बोधक चर्चा झाली. आपणही त्यात चांगले योगदान दिले. या बैठकीत वर्षाने काही नवीन सूचना मांडल्या. विशेषत: Tourism मधे Time shareचा अंतर्भाव करावा ही तिची सूचना सर्वांनाच पसंत पडली. वर्षाने चर्चेत सहभागी होताना आपले मुद्दे अत्यंत आत्मविश्वासाने सभेपुढे मांडले. त्यामुळे आपली संस्था (MGP – India) ही संयुक्त राष्ट्राच्या जागतिक व्यासपीठावर पुन्हा एकदा लक्षवेधी ठरली. अशा प्रकारे जिनिव्हातील या दुरुस्ती/सुधारणांवरील दुसरी बैठकही अत्यंत समाधानकारकरित्या पार पडली. मी आणि वर्षा राऊत त्या आनंदातच भारतात परतलो.

आता चर्चेच्या चाळणीतून बाहेर आलेल्या सर्व सूचना/दुरुस्तींचा अंतिम मसुदा तयार करुन त्यावर UNCTAD ने शिक्का मोर्तब करण्याचे काम बाकी राहीले होते. त्यासाठी जुलै २०१५ मधे UNCTADने जिनिव्हात अंतिम सभा आयोजित केली. यावेळीही माझ्याबरोबर वर्षा होती. भारत सरकारतर्फे ग्राहक व्यवहार सचिव श्री. देसिराजू हे या सभेला उपस्थित होते. प्रथेप्रमाणे यावेळीही आपण त्यांना व्यवस्थित पूर्वसूचन (briefing) केले होते. गुरुचरण यांनी सुद्धा देसिराजूंना याची सर्व पूर्वपीठिका देऊन ठेवली होती.

या दोन दिवसांच्या अंतिम परिषदेत बाकी अन्य सर्व सूचनांवर चर्चा होऊन थोडे फार फरक/बदल करत बहुतेक सूचनांना अंतिम स्वरुप देण्यात आले. परंतू आपली UN Commission on Consumer Protectionची सूचना मात्र तीव्र वाद आणि विरोधात अडकली. अपेक्षेप्रमाणे अमेरिकेच्या गटाने आपल्या सूचनेला विरोध चालूच ठेवला. परंतू यावेळी भारत सरकारतर्फे श्री. देसिराजू यांनी आपली सूचना कशी योग्य आहे हे अत्यंत प्रभावीपणे मांडले. तरीही या सूचनेवर सर्वांची मते आणि काहींचे आक्षेप लक्षात घेऊन या सूचनेवर तडजोडीने मार्ग काढता येऊ शकेल हे त्यानी खूप आर्जवी भाषेत सभेला पटवून दिले. मग परत नवा मसुदा, खाजगीत अमेरिका, भारत आणि UNCTAD प्रतिनिधींबरोबर चर्चा! हे सर्वच आम्हाला अनोखं आणि अप्रूप होतं!! हा वेगळाच अनुभव होता!!!

आपल्या सूचनेवर अति आग्रही राहीलो तर संपूर्ण सूचनाच फेटाळली जाण्याची शक्यता होती. गेले ३ वर्ष यासाठी केलेली सर्व मेहनत फुकट गेली असती. UNCTAD प्रतिनिधींनी सुद्धा आपल्याला “लवचिक राहून मूळ उद्दिष्ट साध्य करुन घ्या” असा मित्रत्वाचा सल्ला दिला. अखेरीस सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करून UNGCP अंमलबजावणीसाठी UN Commission on Consumer Protection स्थापन केले जावे या आपल्या सूचनेला आपण मुरड घालण्यास तयारी दर्शवली.

UNCTAD ने त्याजागी एक खास कायमस्वरूपी देखरेख यंत्रणा प्रस्तावित केली. ही यंत्रणा म्हणजेच ग्राहक संरक्षणार्थ आंतरराष्ट्रीय सरकारी-तज्ञ-गट Inter-governmental Group of Experts (IGE) for Consumer Protection. याच्या प्रारुपाबद्दल UNCTAD संचालकांनी मग सर्व सभेला कल्पना दिली. त्यावर पेपर circulate करुन त्यावर दुसऱ्या दिवशी चर्चा आणि निर्णय असा कार्यक्रम ठरला. अशा रितीने दुसऱ्या दिवशी सर्वात जास्त चर्चिली गेलेली आपली सूचना UNCTAD च्या दुरुस्तीसह सर्वसहमतीने अखेर संमत केली गेली. अमेरिकन ग्रुप मात्र शेवटपर्यंत नाराजी व्यक्त करत राहीला.

अशा रीतीने, जवळजवळ तीन वर्षांच्या प्रदीर्घ चर्चासत्रांनंतर २०१५ साली UNCTAD परिषदेने UNGCP मधे आमूलाग्र सुधारणेची (Revision) शिफारस करणारा ठराव संमत केला. त्याप्रसंगी समारोप करताना UNCTADच्या संचालकांनी आपण नेटाने लावून धरलेल्या आपल्या देखरेख यंत्रणेच्या सूचनेचा खास गौरवपूर्ण उल्लेख करुन नव्याने प्रस्तावित “IGE for Consumer Protection will be a Jewel in the Crown of UNCTAD”, असा विश्वास व्यक्त केला.

अर्थात हे सर्व झाल्यावर अंतिम टप्पा बाकी होता. आता हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या आम सभेमध्ये (UNGA मध्ये) पाठवण्याची प्रक्रिया बाकी होती. आपल्याला तिथे प्रवेश नाही. अमेरिका तिथे काही तरी दगाफटका करेल अशी एक भीती मनात होतीच. तरीही आपली एक सूचना संयुक्त राष्ट्रांत आपण नेटाने नेऊ शकलो हा आनंद खरोखर अनोखा होता. आणि त्या आनंदातच आम्ही भारतात परतलो. आपले काम आता संपले होते. आता फक्त आमसभेच्या निर्णयाची वाट बघणे एवढेच हातात होते. “तिथे ऐनवेळी आपल्या मुद्द्यावर काही बदल होतील का?” ही धाकधूक मात्र सतत मनाला सतावत होती. आणि अखेर काही महिन्यांनी डिसेंबर २०१५ मधे ती much-awaited Breaking News आली.

“UN General Assembly ने २२ डिसेंबर २०१५ रोजी १९८५ च्या UN Guidelines for Consumer Protection (UNGCP) मधे UNCTADने शिफारस केलेल्या सर्व सुधारणा/दुरुस्त्यांना एका विशेष ठरावाद्वारे  सर्वसहमतीने मान्यता दिली.”

ही बातमी कळताच मला जो आनंद झाला तो केवळ आणि खऱ्या अर्थाने अवर्णनीय आहे. नाही शब्दांकित करता येत आजही! हे आता लिहितानाही गहिवरुन येतंय!! शुभदा, वर्षा तुम्हाला लाख लाख धन्यवाद!!!

या सुधारित UNGCP मधे एकूण ९९ कलमे आहेत, तर आपल्या सूचनेवर आधारित देखरेख यंत्रणेवर (IGE for Consumer Protection) एक खास प्रकरण (chapter)! त्यातील ९५ ते ९९ ही कलमे म्हणजे मुंबई ग्राहक पंचायतीने जगातील ग्राहकांना ग्राहक हितार्थ दिलेली ही एक कायमस्वरूपी भेट आहे!! MGP is simply great!!!

६ मार्च २०१२ मधे जिनीव्हाच्या बर्फाळ कुशीत आपण एक बीज रोवले आणि २२ डिसेंबर २०१५ रोजी त्या बीजाचे छोटेसे मूर्त रोपटे जन्माला आले आणि आता गेल्या पाच वर्षांत ते छानच बहरलंय. २०१६ पासून दरवर्षी जुलैमधे नित्यनेमाने या देखरेख यंत्रणेची (IGE for Consumer Protection) एक जागतिक बैठक जिनिव्हात UNCTAD तर्फे आयोजित केली जाते. या सर्व बैठकांना हजर राहण्याची संधी मला मिळाली. आमचे अमेरिकन मित्रही यात उत्साहाने सहभागी होतात आणि आता याच यंत्रणेचे गुणगानही करतात. याबाबतही बरंच काही सांगण्यासारखं आहे. ते परत कधी तरी सांगेन सवडीने.

मंडळी, या आठवणी जागायला निमित्त झाले परवाच्या १६ एप्रिलचे. याच दिवशी १९८५ साली UN General Assembly ने UNGCP हा “ग्राहक-हिताय” दस्तावेज जगाला दिला. त्याला आता ३६ वर्षे, म्हणजेच तीन तपे, पूर्ण झाली. त्यानिमित्ताने, आठवण झाली ती २०१६ साली आपल्या मुंबई ग्राहक पंचायतीने मोठ्या विरोधावर मात करुन, एक कायम स्वरुपी देखरेख यंत्रणा UNGCPमधे कशी समाविष्ट करून घेतली त्याची. त्या चार वर्षांचा हा धावता चित्रपट – जसा आठवला तसा मांडला.

जाता जाता, या प्रवासाची एक परिणती सांगण्याचा मोह आवरत नाही. २०१६मधे जिनिव्हात भरलेल्या पहिल्याच IGE परिषदे दरम्यान मी आपले केंद्रीय ग्राहक व्यवहार राज्यमंत्री श्री. चौधरी यांना भारतात एक आंतरराष्ट्रीय ग्राहक संरक्षण परिषद भरवण्याची कल्पना सांगितली. त्यांना ती तत्काळ पटली. या परिषदेसाठी केंद्र सरकार आणि UNCTAD यांचा समन्वय साधण्याचे सर्व काम करण्याची संधी मला मिळाली.

२५ आणि २६ ऑक्टोबर २०१७ मधे दिल्लीतील विज्ञान भवनात भरलेल्या या परिषदेला UNCTAD चे सेक्रेटरी जनरल श्री मुखीसा किटुयी आणि भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे आवर्जून उपस्थित होते. यावेळी मुखिसा किटुयी यांनी मुंबई ग्राहक पंचायतीने UNGCP मधे सुधारणा घडवून आणण्यासाठी जे परीश्रम घेतले त्याचे जाहीर कौतुक केले. नरेंद्र मोदींनी आपल्या उद्घाटनपर भाषणात कौटिल्यापासुन ते आजच्या सरकारपर्यंत भारत देश ग्राहक संरक्षाणात कसा आघाडीवर आहे हे या आंतरराष्ट्रीय परिषदेत जगाला आपल्या ओघवत्या वक्तव्याद्वारे दाखवून दिले. यूट्यूबवर हा कार्यक्रम उपलब्ध आहे.

विज्ञान भवनातील आंतरराष्ट्रीय ग्राहक संरक्षण परिषदेत डावीकडून
वर्षा राऊत, शिरीष देशपांडे, अनुराधा देशपांडे, अध्यक्ष डॉ रामदास गुजराथी, अर्चना सबनीस आणि ज्योती मोडक

आज हे सर्व मागे वळून बघतो तेव्हा हा सर्व प्रवास मनाला खूप खूप सुखावून जातो. अंगावर चक्क रोमांच उठतात. एखादी स्वयंसेवी संस्था आणि तिचे झपाटलेले कार्यकर्ते अशी काही जागतिक भरारी घेऊन संयुक्त राष्ट्रात एक कायमस्वरुपी देखरेख यंत्रणा ग्राहक हितार्थ निर्माण करू शकतात हे स्वप्नवत् वाटतं. पण हे स्वप्न, आपण शाश्वत सत्यात उतरवू शकलो आहोत, याहून आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट काय असू शकेल? (लेखमाला समाप्त.)

आपल्या प्रतिक्रिया /सूचना वाचायला मला निश्चितच आवडेल.

शिरीष देशपांडे, मुंबई ग्राहक पंचायत (१८.०४.२०२१)

Hits: 170

You may also like...

3 Responses

  1. अर्चना देशपांडे says:

    अॕडव्होकेट श्री.देशपांडे व त्यांचे सहकारी यांचे अभिनंदन.
    दर महिन्याला मिळणार्या मुं ग्रा पं च्या मुखपत्रातून या यशाची गाथा वाचताना अभिमान वाटत होता व देशपांडे सर व इतर सहकारी यांचे कौतुक वाटत होते.

    • visdam says:

      नमस्कार,
      धन्यवाद. आपल्या भावना शिरीष देशपांडे यांच्यापर्यंत पोचवीन.
      ही गाथा अन्य मार्गांनी प्रसारित झाली असली तरी ती फार काळ टिकून राहिली नसती,
      तसेच ती मर्यादित समूहापर्यंतच पोचली असती, असे मला वाटले.
      आपल्यासारख्या अनेकांप्रमाणेच मलाही आवडलेली ही गाथा वेबसाइटवर असेल तर
      वेबसाइट चालू असेपर्यंत ती आणखी अनेकांपर्यंत पोचेल असे वाटले म्हणून हा पुनरावृत्तीचा प्रपंच.
      वेबसाइटवर फोटो टाकणे शक्य असल्याने ही गाथा आकर्षक करणेही जमले.
      पुनश्च धन्यवाद
      विश्वास मुंडले’

  2. Shirish Deshpande says:

    अर्चना देशपांडे यांचे मनापासून आभार.
    माझा शाळकरी मित्र विश्वास मुंडले याने हे सर्व आपल्यापर्यंत आकर्षकपणे पोचवण्यासाठी जे कष्ट घेतले त्याबद्दल त्याचेही मनापासून आभार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *