शरद बोडसला पुनश्च श्रद्धांजली
शरद हा माझा शाळेतला सहाध्यायी. माझ्या आठवणीनुसार २००९ च्या सुरुवातीलाच कधीतरी तो एकाएकी गेला. त्याला जाऊन आता जवळ जवळ पंधरा वर्षे होत आली. तरीही गेल्या आठवड्यात त्याची विशेषत्वाने आठवण झाली. पंधरा वर्षांपूर्वी शरदच्या निधनाची बातमी कळल्यावर मला एका अनामिक वेदनेने ग्रासले होते, तेही आठवले.
शाळेतला शरद आठवायला लागलो. आठवणी तश्या थोड्याच आहेत. एकतर तो बऱ्याच उशीरा आमच्या वर्गात आला. तो बोडस सरांचा मुलगा! बोडस सरांना घाबरणारे विद्यार्थी बरेच होते. त्यात मीही होतो. त्याच्याशी जवळीक करताना अंतर्मनात बोडस सरही असायचेच! म्हणूनच शाळासोबती असूनही कधी त्याच्या घरी जाणे झाले नाही!
आम्ही दोघेही बुटके! पन्नास साठ वर्षांपूर्वीचे मला फारच पुसटसे आठवते आहे. पण बहुतेक अकरावीत तो व मी एकाच बाकावर बसायचो. पण आमच्या वृत्ती निराळ्या. तो चारचौघात मिसळणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एकनिष्ठ स्वयंसेवक. आणि मी बराचसा आत्ममग्न पुस्तकी किडा! पण आजही त्याच्या ज्या काही आठवणी येतात, त्या अगदी ठळक – त्याच्या गळ्यावरील जखमेच्या व्रणाइतक्या ठळक! तपशील मात्र धूसर – त्याच्या प्रसिद्धीपराङ्मुख प्रतिमेसारखे!!
लहानपणी अंगावर आरश्याचे कपाट पडल्याची गोष्ट त्याने मला सांगितली होती. फुटलेल्या काचेने त्याचा गळा जवळजवळ आरपार चिरू घातला होता. कापल्याची जखम होती एका कानापासून सुरू होऊन गळाभर! पण त्याच्या आयुष्याची दोरी – तेव्हातरी – बळकट होती. मला वाटते की संघाला वाहून घेण्यासाठीच तो वाचला. त्या बाबतीत तो बोडस सरांच्या माळेचाच मणी! शाळेत असतांनाही तो नियमित शाखेत जात असे. त्यावरून त्याला “दक्ष! पोरींवर लक्ष!!” म्हणत चिडवणारेही काही होते. त्यांचे चिडवणे मला काही रुचत नसे. शरदही असा सभ्य आणि ऋजु, की त्याने याबाबत कोणाशीही भांडण केल्याचे मला आठवत नाही. त्याला चिडवणार्या एका दोघांना मीच एकदा विरोध केल्याचे मला आठवते.
त्या शाळकरी वयात मी संघाबाबत साधकबाधक विचार करण्याइतका पोक्त वगैरे मुळीच नव्हतो, आणि स्वयंसेवकही नव्हतो. शरदची आणि माझी ऒळख होण्याच्या बरीच वर्षे आधी मला शाखेत ऒढण्याचा प्रयत्न झाला होता. अर्थात् शरदकडून नव्हे, तर इतरांकडून. पण तो काही दिवसातच फसला. सातवी-आठवीत असताना काही दिवस मी पार्लेश्वराच्या आवारात भरणार्या संघशाखेतही गेलो होतो. मात्र मी तिथे रुजलो नाही. त्याची कारणे अगदी साधी होती. माझ्या प्रकृतीला खोखो, आट्यापाट्या अशा मैदानी खेळापेक्षा गोट्या, भोवरे, विटीदांडू हेच खेळ आवडत. आणि मर्यादित विषयांवरील भाषणे ऐकण्याऐवजी विविध विषयांवरील पुस्तके वाचायला आवडत, एवढेच!
तेव्हा शरदला डिंवचणाऱ्यांना टोंकण्यामागेही त्यावेळी तरी तात्विक अधिष्ठान वगैरे काही नव्हते. वर म्हटल्याप्रमाणे त्या शाळकरी वयात संघ, संघविचार याबाबत चिंतन करण्याइतकी माझी क्षमता नव्हती. मात्र हे सहज लक्षात येई की शरदसारखे स्वयंसेवक नाकासमोर पाहून “दक्ष – आरम” करीत. याउलट, “दक्ष, पोरींवर लक्ष” अशी टीका करणारेच जास्त “लक्ष” ठेवून असत. असल्या भंपक वात्रटांपेक्षा त्यांना सभ्यपणे तोंड देणारा – नव्हे, सहन करणारा – आपल्या विचारांशी प्रामाणिक राहाणारा शरद मला उजवा वाटे. एकच विचार स्वीकारून त्याला वाहून घेणे त्या वयात मला जमले नाही. पण ते साधणार्या शरदसारख्यांच्या प्रती माझ्या मनात त्याही वयात, एक आदर होता. तेव्हा माझ्या लेखी, त्या वात्रटांनी यमके जुळवून केलेल्या त्या टीकेला यमके जुळवून दिलेल्या घोषणांइतकाही अर्थ नव्हता.
दुसरे म्हणजे हे स्वयंसेवक जे काही करत ते शिस्तीत करत. शाळेत दिसणारी शिस्त बाहेर फक्त शाखेतच पहायला मिळे. ती शिस्त स्वयंसेवक मंडळी स्वयंस्फूर्तीने पाळत. काही ठरवून कामे करतांना दिसत. याउलट माझ्याकडे कामकाजातील शिस्त आणि ठरवून कामे तडीला नेण्याचे बावतीत तसा आनंदी आनंदच होता. त्यामुळे टीका दुर्लक्षून आपल्याला योग्य वाटते ते विधायक काम शिस्तीत करीत रहाणाऱ्यांबद्दल मला नेहेमीच आदर वाटत आला आहे. अपरिपक्व अशा शालेय वयातही थिल्लर टीकेला उत्तरही न देण्याचा पोक्तपणा दाखवणाऱ्या शरदच्या बाजूने त्याच्या वात्रट टीकाकारांना मी जे टोकले ते याच भावनेपोटी.
शाळेनंतर सर्वांच्याच शिक्षणवाटा बदलल्या. शरदशी संपर्क तुटला. त्याचे संघकार्य चालूच राहिल्याच्या खुणा मात्र पारल्यात दिसत राहिल्या. मधे बरीच वर्षे उलटली. २००४ मध्ये मी UDCT मध्ये फेरदाखल झालो आणि VJTI मधील शरदच्या पुन्हा गाठी पडू लागल्या. एकमेकांच्या वाहनांवरून पार्ला ते माटुंगा प्रवास झाले. आमच्या गप्पांमध्ये अभियांत्रिकी, संशोधन, राष्ट्रीय मतदाता मंच, विश्व संवाद केंद्र, वनवासी कल्याण आश्रम सारख्या सामाजिक संस्थांची कामे, अशा अनेक विषयांवर गप्पा होत. तेव्हा त्याची Ph. D. साठीच्या प्रकल्पाची जुळवाजुळव चालू होती. चर्चेसाठी तोही एक विषय असे. (त्याची Ph.D. पुरी झाली की नाही हे मात्र कळले नाही.) सार्या भेटीगाठीत त्याची माझ्यावद्दलची आपुलकी जाणवे. त्याची अविचल श्रद्धा आणि प्रसिद्धिविन्मुखता याबद्दल मला वाटणारा आदरही त्याला जाणवला असावा असा माझा कयास आहे.
शरदशी अशा अनेक विषयांवर बोलणे झाले तरी व्यक्तिगत आणि कौटुंबिक बाबी त्यात कधीच नसत. याचे महत्वाचे कारण म्हणजे स्वत:बद्दल बोलावे असा त्याचा स्वभावच नव्हता. तसेच दुसर्याच्या व्यक्तिगत बाबतीत आपणहोऊन लक्ष घालावे असा त्याचा स्वभाव नव्हता, आणि माझाही नाही. आज मितीला इतक्या वर्षांनंतर मात्र, त्या पाच वर्षांत इतक्या भेटी घडूनही व्यक्तिगत सुखदु:खाच्या गोष्टींची देवाणघेवाण आमच्यात का घडली नाही याचा सल मला काहीसा डांचत असतो. पण शरदसारख्या संघविचारांना वाहिलेल्या व्यक्तीच्या संभाषणात “व्यक्तिगत सुखदुःखे” हा विषय नसणे हेही स्वाभाविकच म्हटले पाहिजे.
एखाद्या संघटनेत काम करून पद अगर मान मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाणारी माणसे आपण आजकाल पहातोच आहोत. वर्षानुवर्षे संघात राहून तो काही फार मोठा पदाधिकारी वगैरे झाल्याचे ऐकिवात नव्हते. अंगावर पडेल ते काम निष्ठेने पार पाडण्याची जबाबदारी अंगावर घेणारे ते स्वयंसेवक पदच त्याला आवडत असावे. अंगीकृत कार्यावर प्रगाढ श्रद्धा असल्याशिवाय माणसे अशी निरपेक्ष वागत नसतात.
आपल्या श्रद्धांची मोठी किंमतही शरदने मोजली. मी त्याच्या अंतर्वर्तुळातला नसल्याने मला फक्त एकच पण मोठ्ठे उदाहरण माहित आहे. २५ जून १९७५ च्या रात्री २ वाजता अटक झालेला शरद, १९७७ साली जनता पक्ष सत्तेवर आल्यावर एक महिन्यानंतर सुटल्याचे मला स्मरते. शरदच्या शिक्षणाचे, कारकीर्दीचे पार वाटोळे झाले. जवळ जवळ दोन वर्षांच्या ह्या काळात त्याच्या आईची आणि बोडस सरांची काय अवस्था झाली असेल या कल्पनेने तेव्हाही मी काहीसा कासावीस झालो होतो, आजही होतो. उद्या कधी स्वतंत्र भारताचा आणि त्या आणीबाणी पर्वाचा इतिहास लिहिला गेलाच तर त्यात शरदचे किंवा त्याच्यासारख्या अनेकांचे नांव असण्याची जिथे शक्यता नाही, तिथे त्याच्या आई वडिलांच्या वेदनेचे स्मरण होणे हे तर दुरापास्तच!
आणि हेच तर शरदची आज आठवण येण्याचे कारण! २५ जून २०२३ ला आणीबाणी लादल्याला ४८ वर्षे झाली. पण २५ जून २०२३चा लोकसत्ता वाचून कुणाचाही असा ग्रह होईल की २५जूनला भारतीय इतिहासात घडलेली एकमेव घटना म्हणजे १९८३ साली भारताने क्रिकेटचा वर्ल्डकप जिंकणे. २५ जून १९७५ची आणीबाणी अनुल्लेखाने इतिहासातून पुसून टाकायचा वसा लोकसत्ताने घेतलाय की काय असा संशय येतो. आणीबाणीचा इतिहासच पुसून टाकण्याचा प्रयत्न म्हणजे पर्यायाने आणीबाणीत “शरद बोडस” सारख्या अनेकांनी केलेला त्याग, आणि त्यांच्या कुटुंबीयांनी भोगलेल्या दु:खाचे कृतघ्न विस्मरण!
शरदच्या करियरचे वाटोळे झाले. पण आपल्या त्यागाचे भांडवल सोडाच पण प्रसिद्धीही त्याने कधी केली नाही. “पुनश्च हरि ॐ” म्हणून त्याने शिक्षण क्षेत्रात आपले बस्तान बसविले. VJTI सारख्या संस्थेत प्राध्यापक व विभागप्रमुख पदापर्यंत मजल मारली. मला हे विलक्षण वाटते. मनात येते की जर शरद आपल्या श्रद्धांना चिकटून न रहाता, तर कदाचित् याहून अधिक प्रगती करता. पण हेही खरे की मग ’शरद बोडस’ हा ’शरद बोडस’ राहिला नसता. “लोकसत्ता” आता “लोक”सत्ता उरला नसला तरी “शरद बोडस” सारखी माणसे अटल आहेत, म्हणूनच काही भवितव्य आहे.
शरदला पुनश्च एक श्रद्धांजली!
-विश्वास द. मुंडले
Hits: 212
माझे काका ‘यशवंत काशीनाथ लिमये हे गोरेगावकर बिल्डिंग मधे ”रद्दी दान “प्रत्येक महिन्यात सहा चाळींमधे १९७५ते २००५ या कालावधीत राबवली;जमा पैसे ”वनवासी कल्याण आश्रमा च्या”स्वाधीन करत.मदतीला आले तर ठीक नाहीतर एकट्या सगळा उरक पाडीत.याचा ना कधी डंका पिटला.अशी लहान लहान कामं अगणित आहेत.याचाच परिपाक म्हणून २०१४ नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले.
RSS या नांवातच त्याग भरलेला आहे.