प्रौढत्वाची लक्षणे
ऐंशीच्या दशकाच्या पूर्वार्धात कामानिमित्त दिल्लीला एका कार्यालयात जाणे झाले. अभ्यागतांच्या साठी असलेल्या खोलीच्या भिंतीवर एक मोठे भित्तिपत्र लावले होते. त्यातले इंग्रजीतले गद्यकाव्यरूपातले सुवचन मला फारच आवडले. त्यात लेखकाचे नाव नव्हतेच. पण ते सुवचन कोणाचे होते, किंवा ते तिथे कोणी लावले हे कोणालाच माहिती नव्हते. कारण ते भित्तिपत्र त्या कार्यालयात वर्षानुवर्षे होते.
आवडले म्हणून मूळ लिखाण घाईघाईने लिहून घेतले. मूळ वचनाचा कच्चा खर्डा माझ्याकडून नंतर गहाळ झाला. अन्यथा तो ही इथे देता आला असता. घरी पोचल्यावर त्याचे अभंग वृत्तात रूपांतर केले. ते असे.
(मूळ रचनेच्या बाजाला अनुसरून प्रत्येक कडव्यानंतर धृवपद म्हणायचे आहे.)
वर्षे सांडुनीया । वय वाढतसे । प्रौढपण कैसे । येइल बापा ॥
ही सारी लक्षणे । प्रौढ माणसाची । खूण जगल्याची । अनुभव ॥धृ॥
लोक अद्वातद्वा । बोलू लागतील । दोषही देतील । सर्व तुजला ॥
स्थिर ठेवि तेव्हा । चित्तवृत्ती दोन्ही । हेचि घे जाणोनी । मोठेपण ॥१॥
बहुजने कधी । घेतला संशय । त्याचे मूळ काय । दुर्लक्षावे ॥
त्या मुळाचे पाठी । असे काही बीज । त्याचे काय काज । कोण्या कार्यी ॥
आत्मविश्वासाची । तीच खरी साक्ष । काज-बीज-वृक्ष । जेणे गणिला ॥२॥
सदैव तयार । वाट पाहण्याला । कधी ना थकला । त्या कारणे ॥३॥
करण्या सामना । असत्य बोलांचा । जेणे नाही वाचा । खोटाळली ॥४॥
किंवा कधी द्वेष । येतसे वाट्याला । तरी नाही केला । ज्याने द्वेष ॥५॥
गल्लत ध्येयांची । स्वप्नांशी न केली । त्या नरा लाभली । कीर्ती निखळ ॥६॥
विचार हे जाण । साध्याचे साधन । दोहोत निक्षून । भेद करी ॥७॥
यश अपयश । दोहोंची गणती । इष्ट वा आपत्ती । यात नसे ॥८॥
निखळ जे सत्य । तुवा बोललेले । विडंबित केले । अज्ञान्यांनी ॥
ते खरे सहन । केले रे पाहिजे । त्यात साठवले । सुधीरत्व ॥९॥
किंवा तन मन । आयुष्य नि धन । वाहिले आपण । ज्या कारणीं ॥
तेचि नष्ट झाले । डोळ्यांनी पाहिले । तरी ना खचले । ज्याचे मन ॥
पुनश्च हरि ॐ । म्हणुनी वाहिले । उरले सुरले । त्याच काजा ॥१०॥
वेळ येता ज्याने । पुण्याई आपुली । पणाला लावली । निःसंकोच ॥
त्यात दुर्दैवाने । आली जरी खोट । तरी नाही वीट । ज्याला आला ॥
फिरोनी उत्साहे । सुरुवात करी । आणि ना उच्चारी । भूतकाळ ॥११॥
अथक अपार । तन मन बुद्धी । यांची ज्याने सिद्धी । जोपासली ॥१२॥
किंवा कधी कधी । वाटते सगळे । प्रयत्न सरले । प्रयत्नांचे ॥
तेव्हा पुढे झाली । ज्याची इच्छाशक्ती । ती खरी आसक्ती । ध्येयवेडी ॥१३॥
लोकमान्यतेची । किंमत म्हणून । ज्याने ना सद्गुण । गमाविले ॥
किंवा जेव्हा लागे । वर्तावे थोरांशी । संबंध मातीशी । जो न सोडी ॥
राव आणि रंक । मिसळे सर्वांशी । एकाच वर्गाशी । दोस्ती नाही ॥१४॥
प्रहरी जो झाला । घटका पळांचा । त्याच्या कर्तृत्वाचा । पल्ला मोठा ॥१५॥
अंगी बाणवले । जरी सर्व गुण । त्याचे प्रदर्शन । जो न करी ॥
त्याचे सर्व जग । दास आपखुशी । तो मात्र स्वतःशी । रमलेला ॥१६॥
-विश्वास द. मुंडले
Hits: 0
खूप छान काका.