पलटन प्रमुखाचा तोफखाना
परिचय
आपणा सर्वांना जशा युद्धकथा आवडतात, तसेच सैनिकी जीवनाबाबत एक कुतूहलही असते. अशाच एका सेनाधिकार्याने सांगितलेली आपल्या शैक्षणिक जीवनातली ही एक रंजक आठवण! ती अधिक रसदार व्हावी म्हणून हा परिचय.
भावी सैन्याधिकारी, खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी मधून स्नातक म्हणून बाहेर पडल्यावर त्यांची पदोन्नती होते ती देहरादून मधल्या भारतीय सेनादल प्रबोधिनी, इथे. रासंप्र ते भासेप्र ही पदोन्नती समजून घेण्यासाठी पायदळाची रचना समजून घेतली पाहिजे.
पायदळाचा सर्वात छोटा घटक म्हणजे एक जवान. दहा जवानांची बनते एक तुकडी. तुकडी-प्रमुख, जो बरेचदा बिगर-आज्ञापत्रित-अधिकारी असतो, त्याला हविलदार म्हणतात. साधारणपणे तीन वा अधिक तुकड्यांची बनते पलटन. सामान्यतः सेकंड लेफ्टनंट वा लेफ्टनंट दर्जाचा कनिष्ठ आज्ञापत्रित अधिकारी हा पलटन-प्रमुख असतो. आज्ञापत्रित अधिकारी उपलब्ध नसेल, तर एखादा अनुभवी बिगर-आज्ञापत्रित अधिकारी पलटनीचे नेतृत्व करतो. त्याला सुबेदार म्हणतात. भावी अधिकार्यांचे रासंप्र मधले प्रशिक्षण तुकडी स्तरापर्यंत असते. तर भासेप्रचे प्रशिक्षण तुकडी स्तरावरून पलटन स्तरावर येते, कारण या प्रशिक्षणानंतर सेकंड लेफ्टनंट/ लेफ्टनंट बनून ते पलटन-प्रमुख बनणार असतात. अर्थात हे प्रशिक्षण घेताना प्रत्येक भावी लेफ्टनंटला जवान, हविलदार, सुबेदार, तसेच पलटन-प्रमुख, अशा विविध भूमिकांतून जावे लागते. अशा प्रशिक्षणाच्या पहिल्याच दिवशी घडलेला हा एक गंमतीशीर प्रसंग.
पलटन-प्रमुखाचा तोफखाना
आमचे प्रशिक्षण जसे तुकडी स्तरावरून पलटन स्तरावर आले, त्याच्या बरोबरीने प्रशिक्षणार्थ आमच्यासोबत असणारी शस्त्र सामग्रीही वाढली. बंदुका, हलकी मशीन गन यांच्यात भर पडली ती एका दोन इंची उखळी तोफेची. हिला कौतुकाने पलटन-प्रमुखाचा तोफखाना म्हटले जाई. उखळी तोफ चालवणारी दोन माणसे असत, तोपची नंबर १, आणि तोपची नंबर २.
युद्धसदृश परिस्थितीला तोंड देण्याचे प्रशिक्षण उघड्यावर – म्हणजे मैदान, जंगल, नदी, अशा विविध जागी – दोन-तीन दिवसाची मोहीम काढून दिले जाई. मोहीमेमध्ये घडणार्या चकमकी या लुटुपुटुच्या असल्या तरी कराव्या लागणार्या कारवाया या बहुअंशी खर्याखुर्या असत. अर्थात्, असल्या प्रशिक्षण समयी वापरावयाची हत्यारे मात्र नाकाम केलेली, म्हणजे शोभेची असत. त्यातून गोळ्या किंवा तोफगोळे झाडता येत नसत. त्याला ड्रिल प्रॅक्टिस, किंवा डीपी शस्त्र म्हणतात. त्याला आपण सरावी-शस्त्र म्हणू. सरावी-रायफल किंवा सरावी-मशीन गन बनवणे फारच सोपे. खर्या रायफल वा मशीनगनची गोळी डागणारी पिन काढली की काम झाले. पण दोन इंची उखळी तोफेची सरावी आवृत्ती कशी बनवायची?
सुदैवाने प्रबोधिनीने हे काम संरक्षण संशोधन व विकास संस्थेला न देता स्थानिक लोहाराला दिले. त्याने अगदी सोपा मार्ग शोधला. शेतीला पाणी पुरवणार्या एका दोन इंच व्यासाच्या तगड्या पाइपचा तोफेच्या लांबी इतका, म्हणजे तेवीस इंच लांबीचा तुकडा घेऊन तळाशी एक प्लेट वेल्डवली, आणि झाली की सरावी उखळी तोफ तयार!
कॅंपला निघताना प्रत्येकाने एक एक हत्यार उचलून चालू पडायचे असते. कसा कोण जाणे, माझ्या पहिल्याच कॅंपला निघताना शस्त्र घ्यायला मला झाला उशीर. गेलो तेव्हा सर्व रायफली नि मशीनगन जाऊन फक्त सरावी उखळी तोफ म्हणजेच पलटन-प्रमुखाचा तोफखाना, हे आमच्यासाठी सर्वस्वी नवे हत्यारच शिल्लक राहिले होते. तशीही नव्याची भीती असतेच. त्यामुळे रायफल वा मशीनगनच्या पेक्षा वेगळे असणारे व दिसणारे हे नवे हत्यार पेलायला कोणी तयार नव्हते. मी उशीरा पोचलो. आणि हे दोन इंच रुंद तेवीस इंच लांब दणकट जुगाड आले माझ्या दुबळ्या खांद्यावर.
हे हत्यार घेऊन माझे अन्य सामान न्यायला पुन्हा मागे फिरलो. तेवेळी माझ्या गुडघ्यापर्यंत वासलेल्या “आ”ने माझ्या ऑर्डर्लीला, हरिरामला, माझी समस्या कळली असावी. त्याने त्याच्या कारकीर्दीत अनेक भविष्यकालीन अधिकार्यांची ही स्थिती पाहिलेली असावी. सबब त्याने माझी विचारपूस केली. माझा प्रश्न असा की, “पुढचे ७२ तास हे अवघड जुगाड घेऊन मला चालायचे दौडायचे आहे. लुटुपुटुच्या लढाया करायच्या आहेत. आता काय करू?”
त्याने मार्ग काढला. माझ्या अंथरुणातल्या चादरीची दोन्ही टोके त्याने नळकांड्याच्या दोन्ही टोकांना व्यवस्थित गाठवली. पाठपिशवी पाठुंगळीला लावली. तोफ नामक लोखंडी तुकडा पाठपिशवीवर आडवा टेकवला. आणि चादरीचा दोर माझ्या कपाळावरून घेत या तोफेचे वजन माझ्या डोक्यावर दिले. मशीनगन घेऊन चालण्या- धावण्यापेक्षा हे फारच सोयिस्कर होते.
आमची “शत्रुप्रदेशातली” मोहीम निघाली, आणि लवकरच “शत्रू”शी गाठही पडली. अज्ञात शत्रूने आमच्यावर गोळाबारी सुरू केली, आणि आम्ही विखुरलो. गेल्या दोन महिन्यातल्या चमकदार कामगिरीमुळे आमच्या मोहिमेचा नेता होता कुमार. त्याने या लुटुपुटुच्या लढाईचे नेतृत्व स्वीकारले.
नेता ओरडला, “मशीन गन झाडीके पीछे. रायफलधारी मेरे पीछे, चलो.” आमची लुटुपटुची कारवाई पाहाणारा आमचा उस्ताद खूष झाला. सगळे आपआपल्या नेमल्या जागी गेले. हलले नाहीत दोघे उखळी तोफ हाताळणारे, म्हणजे मी तोपची नं १ आणि माझा साहाय्यक तोपची नं. २. आम्हाला काही हुकूमच मिळाला नव्हता. तर उस्ताद किंचाळला, “मूर्खांनो, जा त्या तिकडच्या झुडुपापाशी, आणि दर पाच सेकंदांनी “बॉम्ब असे ओरडा!” लुटुपुटुच्या या लढाईत जणू काही उखळी तोफच डागली जाते आहे, असे हे नाटक.
इकडे पलटन-प्रमुखाच्या नेतृत्वाखाली प्रतिहल्ला सुरू झाला. मशीनगन वाले दणादणा गोळ्या झाडल्याचा आवाज करीत चालले होते. मग आक्रमणाची जबाबदारी असणार्या गटाला आदेश आला, “धावा बोल”.
पण आमच्या प्रतिहल्ल्याची दिशा उस्तादाला पटली नाही. त्याने सर्व पलटन पुन्हा गोळा केली. नवीन पलटन-प्रमुख नेमून लुटुपुटुची लढाई पुन्हा सुरू झाली. परत “मशीन गन उधर, रायफल ग्रुप इधर”. हे सर्व तासभर चालले होते. हा सर्व काळ आमचा तोफखाना त्याच एका झुडुपामागे बसून तोफेचा मारा करून पलटनीला मदत करत होता. म्हणजे काय, तर बसल्या बसल्या दर पाच सेकंदांनी “बॉम्ब” असे ओरडत होता.
शेवटी एकदाची ही लुटुपुटुची लढाई संपली. मंडळी गोळा झाली. तोफखान्यावरचे आम्ही दोघे वगळता सर्व पलटन घामेजलेली होती. एव्हाना बर्याच नजरा आमचा हेवा करू लागल्या होत्या. या मोहिमेत पुढे आणखी दोन हल्ले झाले. सगळे पार थकून मरगळून गेले. अपवाद दोघे तोपची. लढाई सुरू झाली, आणि पलटन-प्रमुखाचा आदेश आला की तोफ घेऊन तोपची जवळच्या झुडुपामागे पळायचे, नि दर पाच सेकंदाला ओरडायचे, “बॉम्ब”!
मोहिमेत यथावकाश आम्ही एका बंदरापाशी पोचलो. तिथे खंदक खणून रात्रीसाठी राहायचे होते. प्रत्येकाने साडेचार फूट खोल खणायचे, आणि त्यात राहायचे. जवळपास प्रत्येकाला रात्रभर खणावे लागले. कुणालाच झोप मिळाली नाही. पण उखळी तोफेचा खंदक कधीच खोल नसतो. आमचे काम लवकर आटपले. छान झोप मिळाली. एव्हाना सगळ्यांच्याच डोळ्यात असूया दिसू लागली होती.
पहाटे पहाटे परत हल्ला झाला. परत आम्ही “बॉम्ब”, “बॉम्ब” असे ओरडत आमचे काम चोख बजावले. पलटनीने हा हल्ला परतवला आणि तोफखाना चालवणार्या आम्हाला कामगिरीबद्दल शाबासकीही मिळाली.
मग सकाळची आन्हिके उरकायची वेळ झाली, आणि सगळ्यांची कसोटी लागली. प्रत्येकाला फक्त एकच बाटली वापरायची परवानगी होती – पाणी प्यायला तीच, चहा प्यायला तीच, प्रसंगी डाळ ठेवायला तीच, आणि प्रातर्विधीसाठी पाणी न्यायलाही तीच. टॉयलेटपेपर वगैरे वापरायचा प्रश्नच नव्हता.
आता काय करावे याचे चिंतन करता करता माझ्या लक्षात आले की माझ्याजवळ एक पाणी पुरवठ्यासाठी वापरला जाणारा दोन इंची व्यासाचा तेवीस इंच उंचीचा खालून बंद असलेला पाइप आहे. उखळी तोफ चालवणार्या दोघांना प्रातर्विधीला पुरेल इतके पाणी त्यात सहज मावत होते. आर्किमिडीजप्रमाणेच तो आमचा युरेका क्षण होता. हुश्श. मग काय म्हणता, सरावी उखळी तोफ उसनी घेण्यासाठी चक्क रांग लागली. दुर्दैवाने, त्यांच्यापैकी एकाला आमच्या उस्तादाने तोफेशेजारी पॅंट गुडघ्यापर्यंत उतरवून बसलेले पाहिले. निर्बंधित वस्तूचा, म्हणजेच तोफेचा, गैरवापर केल्याबद्दल बिचार्याला बरेच सोसावे लागले. त्याच दिवशी, तोफ चालवून पलटन-प्रमुखाला उत्तम साहाय्य केल्यामुळे मला आमच्या तुकडीचा प्रमुख म्हणून बढती मिळाली. आणि त्या बहुगुणी तोफेची आणि माझी फारकत झाली.
त्यानंतर जेव्हाजेव्हा अशा मोहिमांवर जायची वेळ आली, तेव्हा मी आठवणीने तोपची नंबर एक बनून तोफ काबीज करायचा प्रयत्न करीत असे. पण मी नेहेमी यशस्वी ठरत नव्हतो. कारण दोन इंची डीपी उखळी तोफेला फारच मागणी होती.
मूळ इंग्रजी लेखक: अज्ञात मराठी रूपांतरकार: विश्वास द. मुंडले
हा लेख माझ्या नजरेला आणून दिल्याबद्दल कर्नल (निवृत्त) अरुण जोशी यांचे आभार
Hits: 81
It’s a good and informative content which flashes
practical life of soldiers. Nice translation.
धन्यवाद. पुढे शिक्षणविषयक मजकूरही देण्याचा विचार आहे.
सरावाचे वर्णन जमले आहे बऱ्याच गोष्टी कळल्या
धन्यवाद श्रीकांत