मेलरोज नावाची टेकडी

“जरा लाइट मिळेल का?”

वर बघितले तर एक जवळपास माझ्याच वयाचा जपानी दिसला, हातात न पेटवलेली सिगरेट. खिशातला लाइटर चाचपून त्याला दिला, त्याने सिगरेट शिलगावली. १९८० च्या त्या शरदात (autumn) आम्ही दोघेही एकाच गाडीने बर्नहून जिनेवाला जाणारे सहप्रवासी निघालो.

“भारतीय?” – त्याची पृच्छा. “होय” – माझे उत्तर. संभाषणाला सुरुवात झाली.

तो एक संयुक्तराष्ट्रसंघटनेचा अधिकारी होता नि जिनेवास्थित आपल्या मुख्यालयात परतत होता. तर जिनेवातल्या विद्यापीठात माझे व्याख्यान होते. मग काही किरकोळ गप्पा झाल्या. त्याने मला जिनेवात काय पाहावे, कुठे खावे याविषयी सूचना दिल्या. पण “सुरक्षित” संभाषणांचा साठा संपला नि मग आम्ही गप्प झालो. मी “Defeat into Victory” हे दुसर्‍या महायुद्धातील ब्रम्हदेशातील युद्धाची कथा सांगणारे फील्डमार्शल विलियम स्लिम यांचे पुस्तक बाहेर काढले तर त्याने वर्तमानपत्र उघडले.

काही वेळ शांततेत गेल्यावर त्याने विचारले, “आपण युद्धेतिहासाचे प्राध्यापक आहात काय?” “नाही”, मी उत्तरलो. “केवळ रुचि. शिवाय माझे वडील युद्धादरम्यान ब्रम्हदेशात होते.” तर तो म्हणाला, “माझेही”.

काय घडले होते युद्धकाळात ब्रम्हदेशात?

डिसेंबर १९४१ मध्ये जपान्यांनी ब्रम्हदेशावर आक्रमण केले, व ब्रिटनच्या लेखी सर्वात दूर अशी जमीनी-युद्ध-मोहीम सुरू झाली. जपानला ब्रम्हदेशातून खुश्कीच्या मार्गाने चीनला, आणि पर्यायाने चांगकाइशेक यांना मिळणारी युद्धसाहित्याची मदत बंद पाडून चीनवर कब्जा करायचा होता. दुसरे असे की जपान्यांसाठी ब्रम्हदेश हा भारतात पोचण्याचा दरवाजा होता. एकदा कलकत्त्याच्या वाटेवर पोचलो की भारतीय जनताच ब्रिटिशांविरुद्ध उठाव करेल असा जपान्यांना विश्वास होता.

थायलंडमधून ब्रम्हदेशात शिरून जपान्यांनी बघता बघता १९४२ साली रंगून बंदर व ब्रम्हदेशाकडे जाणारे रस्ते काबीजही केले. ब्रम्हदेशात शिरण्याचे समुद्री प्रवेशद्वारच बंद झाले व चिन्यांची रसद मुळातच आटली. जपानी सेनेने एकापुढे एक लढाया जिंकत दोस्तसेनेला भारतापर्यंत माघार घ्यायला भाग पाडले.

परिस्थिती बिकट होती. एकतर ब्रिटन युरोपातील युद्धाला जास्त बांधील होते. त्यात त्यांच्यकडे ब्रम्हदेशावर पुन्हा कब्जा करायला आवश्यक सामग्रीही नव्हती नि संघटनही नव्हते. पण १९४३ च्या सुमारास ब्रिटिशांच्या कारवाईत सुघटपण आले. उच्चस्तरीय नेतृत्वापासूनच बदल झाले. पूर्वक्षेत्राचे सर्वोच्च सेनानी म्हणून वेव्हेल यांचे जागी माउंटबॅटन आले. कारवाईचे अधिकार (operational control) विलियम स्लिम या हुशार अधिकार्‍याकडे आले. स्लिम यांनी त्यांच्या दलात एक नवीन उर्जा संचारली, दलाचे नीतिधैर्य उंचावले आणि ब्रिटीश, भारतीय व आफ्रिकन दलांचा समावेश असलेली, सक्षम लढवय्या म्हणून प्रसिद्ध झालेली १४ वी थलसेना (14th Army) घडवली. शत्रूच्या वाढत्या बळाला आळा घालण्यासाठी जपान्यांनी एकाचवेळी भारतावर तसेच ब्रम्हदेशात आराकान येथे हल्ला करून ब्रम्हदेशातील युद्धच संपवणारी धाडसी मोहीम आखली.

युद्धेतिहासात नोंदलेल्या या महान घटनाक्रमांच्या चढउतारात एक शिपाई म्हणून माझ्या वडिलांचा सहभाग होता – प्रथम कोहिमा मोहिमेत जपान्यांना नागा टेकड्यांवरून हलवण्यात, नंतर इंफाळमध्ये नि शेवटी आराकानच्या पर्वतराजीतील घनदाट जंगलातील मोहिमेत. नियतीनेच त्यांना तिथे नेले. मौगडौ येथे संपूर्ण भारतीय ब्रिगेडचे मुख्यालय होते. माझ्या वडिलांची रेजिमेंट ही त्या ब्रिगेडच्या तीन रेजिमेंटपैकी एक होती.

ब्रम्हदेशातील धुवाधार अंधकारी पावसात सर्वोच्च सेनानी माउंटबॅटन यांचे विमान उतरले तेव्हा त्यांचे बरोबर लेफ्टनंट-जनरल ब्राउनिंग होते. सॅंडहर्स्ट येथील रॉयल मिलिटरी कॉलेजमध्ये ते माझ्या वडिलांचे adjutant होते. प्रथम माझे वडील (थोरात) व अन्य दोघा कमांडरांचा (थिमय्या व सेन) माउंटबॅटन यांच्याशी परिचय करून देण्यात आला. सहज गप्पा मारता मारता त्यांनी शोधक प्रश्न विचारत त्यांनी या तीन्ही सेनाधिकार्‍यांच्या प्रत्यक्ष युद्धातील अनुभवाची चाचपणी केली, व ते अन्य वरिष्ठांसोबत खलबतखान्यात शिरले.

खलबते बराच वेळ चालली. बाहेर पडता पडता माउंटबॅटन यांनी सर्वस्वी भारतीय ब्रिगेडचे कमांडर रेगी हटन यांना पुढील कारवाईची परवानगी दिली. पण हे काम अतिकठीण असल्याची पूर्वसूचनाही दिली. तिघा भारतीय रेजिमेंट कमांडरांकडे वळून त्यांना मोहिमेची कल्पना दिली. “जपानी उत्तरेकडून दक्षिणेकडे माघार घेत आहेत. तुम्ही त्यांना दक्षिणेत उतरू दयायचे नाहीये. अक्याबला जमा. समुद्रमार्गे म्येबोनला जा. वाटेत कांगाव जिंका. मग शत्रूच्या प्रदेशातून वाट काढत माघार घेणार्‍या शत्रूचा निःपात करा. समजलं?” मोहिम स्पष्ट होती.

हा वेळपर्यंत ही कथा टक लावून ऐकणार्‍या माझ्या जपानी मित्राने पुढे सरसावत विचारले, “आपले वडील भारतीय ब्रिगेडमध्ये होते असं आपण म्हणालात काय?” “होय” मी उत्तरलो. एव्हाना वेटरने कॉफी देता देता आमचे संभाषण अडखळले. पण माझ्या जपानी मित्राने तो धागा सोडला नाही. “आपले वडील कनिष्ठ अधिकारी होते काय?” “नाही नाही. ते ब्रिगेड कमांडर होते”. ही माहिती रिचवत त्याने पुढचा प्रश्न टाकला, “कुठची रेजिमेंट?”. मी म्हटले, “पंजाब रेजिमेंट” आणि त्याचा चेहेराच उतरला. एकदा वाटले की तो कदाचित खेळही असेल, छायाप्रकाशाचा किंवा माझ्या मनाचा. शेवटी मी त्यांना विचारलेही, “आपल्याला बर वाटत नाहीये का?” पण त्यांनी केवळ मान हलवली नि म्हणाले, “कृपया, सांगत राहा.”.

शत्रूमय प्रदेशातून मजल-दरमजल करीत चालत ब्रिगेड एकदाची म्येबोनला पोचली. म्येबोनला काहीच विरोध झाला नाही. तेव्हा ब्रिगेड तडक कांगावला निघाली. पण केवळ ४८ तासांनंतर, दोन आठवडे चालणार्‍या, व ३००० बळी घेणार्‍या युद्धात आपली ब्रिगेड गुंतणार हे त्यांना थोडेच ठाउक होते?

माउंटबॅटन यांची अटकळ बरोबर होती. जपान्यांच्या माघारीच्या मार्गावर नकाशावर १७० नंबर धारण करणारी मेलरोज नावाचे टेकाड होते. जपान्यांचा त्यावर ताबा असल्याने त्यांचा वरचष्मा होता. त्याहून वाईट होती ती गुप्तवार्ता विभागाने दिलेली बातमी – जपानी फौजेत २ ब्रिगेड होत्या. भारतीय सैन्याची एकच ब्रिगेड होती. ब्रिगेडियर हटन यांच्या लक्षात आले की शत्रूपेक्षा आपले बळ तोकडे असले तरी या घडीला जपान्यांची माघार रोखायची तर मेलरोज टेकडी जिंकलीच पाहिजे. त्यांनी निर्णय घेतला.

थिमय्या यांच्या नेतृत्वाखाली हैदराबादी रेजिमेंटने चढवलेल्या पहिल्या हल्ल्याने शत्रू घायाळ झाला, पण टेकडी जिंकण्याचा हेतू काही साध्य झाला नाही. सेन यांच्या नेतृत्वाखालील बलुची रेजिमेंटच्या हल्ल्याचा परिणामही तोच झाला. मग एक शेवटचा प्रयत्न म्हणून रेगी हटन यांनी पंजाबी रेजिमेंटला हल्ल्याचा आदेश दिला. तोफदल व हवाई दलांशी संधान साधून २९ जानेवारी १९४४ ला सकाळी ७ वाजता हल्ला करायचे ठरले. उजाडता उजाडता आघाडीची दले पुढे सरसावली. जपान्यांनी त्यांच्यावर मशिनगनने मारा केला. तोफखान्याने संरक्षक मारा केला व धुराचा पडदाही केला. पंजाबी टेकडी चढू लागले. सुरक्षित खंदक व बंकरमध्ये बसलेल्या जपान्यांनी या वर येणार्‍या दळावर गोळ्यांचा पाउस पाडला. वर चढणारे सैनिक कोसळू लागले, मृत वा आहतांची संख्या वाढत चालली. हवाई दलाकडून अपेक्षित चढाई झालीच नाही – कारण? वाईट हवामान व दुर्दैव.

पंजाबी दलाच्या कमांडरनी परिस्थिती जोखली व जोखीम पत्करून चढाई चालूच ठेवली. आघाडीचे सैनिक माथ्यापासून केवळ १०० यार्डावर पोचले नि जपान्यांनी होते-नव्हते ते सर्व बळ एकवटून प्रतिकार सुरू केला. त्या घनघोर प्रतिकाराने पंजाब रेजिमेंटचे आक्रमण काहीसे अडखळले नि आता थांबणार की काय अशा अनिश्चिततेच्या गर्तेत अडकले. रेजिमेंटच्या नेत्यासाठी हा कसोटीचा क्षण होता – लढायचे की माघार घ्यायची? पण मशीनगनच्या मार्‍याने कोसळणारे आपले जवान पाहून या नेत्याचे पित्त खवळले. जिवाची पर्वा न करता हा नेता आपल्या जवानांसोबत लढायला आघाडीवर धावला, आणि पारडे फिरले. सैनिक नेत्याबरोबर पुढे सरसावले, नि बंदुकांवर संगिनी चढवून युद्धगर्जना करीत, शेलक्या शिव्या देतदेत जपानी सैन्यात घुसले. घनघोर हातघाईची लढाई झाली. कोणीही हटेना. जपानी तर कोंडीत पकडलेल्या वाघासारखे लढले. लढाई अविरत रात्रभर चालली. जपान्यांनी लाटांवर लाटा याव्या अशा प्रकारे प्रतिहल्ले केले. पण भारतीय सैन्य बधले नाही. शेवटची गोळी सुटली आणि मग शांतता पसरली.

अनेक वर्षांनंतर लॉर्ड माउंटबॅटन यांनी “आराकानची सर्वाधिक रक्तरंजित लढाई” असे या लढाईचे जे वर्णन केले ते अगदी खरे होते. विजय मिळवताना या एकाच लढाईत २००० जपानी व ८०० भारतीय कामी आले. रेजिमेंटमधील अधिकारी व जवान मिळून ५० जणांना विविध शौर्य पुरस्कार मिळाले. बटालियन कमांडरना विशिष्ट सेवा पुरस्कार मिळाला. पण हे सगळे नंतर भविष्यात घडणार होते. युद्धभूमीवर मात्र त्यावेळी काही वेगळेच घडणार होते.

भारतीय बटालियन कमांडर काही जपानी युद्धकैद्यांची दखल घेत होते. सर्वच सैनिक नेहेमीच जसे शिस्तीत जमतात, तसे ते युद्धकैदीही शिस्तशीर गोळा झाले होते. भारतीय सैन्याचा कर्नल पुढे आल्याचे पाहून जपानी कमांडरने आपल्या सैनिकांना अटेन्शनमधे उभे केले, एक पाऊल पुढे सरून एक सॅल्यूट ठोकून त्याने आपल्या कमरेची तलवार सोडवली व ती दोन्ही हाती धरून तो भारतीय कमांडरपुढे वाकून उभा राहिला. भारतीय कमांडरला आश्चर्य वाटले ते याचे की जपानी कमांडरच्या गालावरून आसवे ओघळत होती. पराभवाचे दुःख हे व्हायचेच पण अश्रू कशासाठी? शेवटी युद्ध हे युद्ध असते. कोणीतरी जिंकणार, तर कोणीतरी हरणार.

जपानी कमांडरपुढील समस्या अशी की हे अश्रू पराभवाच्या दुःखाचे नव्हेत तर ती शरमेपोटी गाळलेली आसवे आहेत हे या सर्वांना कसे पटवावे. सामुराइ योद्धा असणे याचा अर्थ यांना कसा कळणार? शक्य होते तर जपानी कमांडर हाराकिरी (आत्महत्येचा समारंभ) करता. पण दैवगती काही वेगळीच होती. भारतीय कर्नलला देऊ केलेली ती तलवार जपानी कमांडरच्या घराण्याची ठेव होती. त्याच्या अनेक पूर्वजांनी ती अभिमानाने बाळगली होती. आणि तीच तलवार आता देताना आपण आपल्या पूर्वजांना लाज आणतो आहोत हीच त्याची भावना होती.

भारतीय कमांडरला हे माहिती नव्हते. माहिती असणेही शक्य नव्हते. तो एका वेगळ्याच संस्कृतीतून आला होता, तेव्हा समोरच्या कमांडरच्या मनात काय चालले असेल हे त्याला कसे ठाउक असणार? पण जपानी कमांडरचा आविर्भाव भारतीय कमांडरला हलवून गेला. कोणीही न सांगता त्याने ताडले की मामला नुसताच गंभीर नव्हे तर श्रद्धेचाही आहे. भारतीय कमांडरने ती तलवार स्वीकारली, आणि स्वीकारताना एखाद्या शूरवीराच्या भावना तोलामोलाच्या शूरवीरानेच जाणाव्या त्या सहजतेने, स्पष्ट आणि सर्वांना ऐकू येईल असे उत्स्फूर्तपणे म्हटले की, “कर्नल, मी तुमची शरणागति स्वीकारतो आहे. पण ही तलवार मात्र मी शरणागतीचे प्रतीक म्हणून नव्हे तर एका सैनिकाने दुसर्‍या सैनिकाला दिलेली भेट म्हणून स्वीकारतो आहे.”

जपानी कर्नलने ह्या अनपेक्षित प्रतिसादाने गोंधळून खाली वळवलेली नजर वर केली. भारतीय कर्नलच्या टिप्पणीने त्याच्या चेहेर्‍यावर उमटलेला अनिर्वचनीय उपकृतभाव (gratitude) गालावरील चमकत्या अश्रूंनी उजळून निघाला होता. मनापासून उमटलेल्या या प्रतिक्रियेने जपानी कमांडरचाच नव्हे तर सैनिकांचाही आत्मसन्मान जपला. तिथे जमलेल्या पंजाब रेजिमेंटच्या सैनिकांनी – मग त्यात हिंदू मुस्लिम सर्वच आले – दाद देत मान डोलावली. शेवटी युद्ध हे युद्धच असते. ते चालू असते तेव्हा सर्व शक्तीनिशी समोरच्याशी लढायचे असते. पण युद्ध संपल्यावर व्यक्तिगत वा राष्ट्रीय वैरभाव कशाला? शत्रूला समजून घेणारे असले विचार बाळगणार्‍या सैनिकांचा देव, व मान-सन्मान, राष्ट्रीयता व झेंडा यांबाबतचे प्रचलित नियम पाळणार्‍या इतरेजनांचा देव वेगवेगळा असला पाहिजे.

शरणागती संपली नि भारतीय कमांडरने सिग्नल अधिकार्‍याला इशारा केला. त्याने यशाचा इशारा देणारे बाण उडवले. टेकडीखालच्या जंगलात दूरवरून ब्रिगेडियर रेगी हटन यांनी आकाशात उडालेले तीन लाल उजेड पाहिले नि त्यांच्या चेहेर्‍यावर स्मित झळकले. भारतीय सेनानेतृत्वावरील त्यांचा विश्वास खरा ठरला होता. नंतर एके ठिकाणी त्यांनी असे म्हटले होते की, “त्या रात्री जपानी हरणार की जिंकणार येवढाच प्रश्न नव्हता, तर भारतीय मंडळी समरप्रसंगी सेनेचे नेतृत्व करू शकतात काय याचा निर्णय व्हायचा होता. हटन यांचा विश्वास काही शंकेखोरांना अनाठायी वाटे. पण मेलरोजवरील विजयाने हटन यांचा विश्वास सार्थ ठरवला होता.

माझ्याच विचारात गुंगून मी खिडकीबाहेर पाहात बसलो होतो, तेवढ्यात मला हुंदका ऐकू आला. माझा जपानी मित्र अक्षरशः हलून गेला होता, ओक्साबोक्षी रडत होता. डोळे मिटून घेतलेला तो अगदी गलबलून गेला होता, नि “कर्मा,कर्मा” असे पुटपुटत होता, आपल्याच भाषेत स्वतःशी काही बोलत होता. थोड्या वेळाने त्याने डबडबलेल्या डोळ्यांनी वर पाहिले, व माझे दोन्ही हात हाती घेऊन म्हणाला, “मेलरोजवर तुमच्या वडिलांशी लढले ते माझे वडील होते. त्यांनीच तुमच्या वडिलांकडे  शरणागति पत्करली. तुमच्या वडिलांनी माझ्या वडिलांची भावना जर जाणली नसती तर घरी परतल्यावर माझे वडील शरमेनेच मेले असते. पण आमची खानदानी तलवार स्वीकारताना तुमच्या वडिलांनी आमच्या कुटुंबाचा मान राखला, तर मला माझे वडील मिळाले. आता तू आणि मी – आपण भाऊ भाऊ झालो.”

गाडी जिनेवाला पोचली. आम्ही उतरलो. जे बोलायचे ते सर्व बोलून झालेच होते. निरोप घेण्यासाठी तो जपानी पद्धतीने तो वाकला, मी गुडबाय म्हटले. एकमेकांच्या संपर्कात राहाण्याचेही ठरवले. मी म्हणालो, “ती तुमची पिढीजात तलवार, मी तुमच्या कुटुंबाला परत दिली तर तुम्हाला आवडेल काय?” तो हसला, माझ्याकडे बघून म्हणाला, “नक्कीच नाही आवडणार. ती तलवार एका सामुराइच्या घरातच आहे.” ती त्याची नि माझी शेवटची भेट.

माझी पत्नी उषा मला सांगते की आमची भेट संख्याशास्त्राला उलथवून टाकते. तिला हे ठाउक असले पाहिजे कारण तिने संख्याशास्त्र व अर्थशास्त्र अभ्यासले आहे. हेच पाहा ना! महायुद्ध चालले होते – छान! माझे वडील भारतीय सैन्यात तर त्याचे वडील जपानी सैन्यात होते – सहज शक्य. ते दोघेही एकाच युद्धक्षेत्रात लढत होते – समजण्याजोगे! त्या दोघांनी एकाच लढाईत भाग घेतला– काहीसे अविश्वसनीय पण अशक्य नाही ! युद्ध संपले, व हे दोघे आपआपल्या घरी परतले – सहजशक्य! पण त्यांचे वेगवेगळ्या भूमीत वाढलेले दोन मुलगे एकाच वेळी बर्नला जातात, एकाच गाडीत, एकाच डब्यात असतात, एकत्र कॉफीपान, धूम्रपान करतात, आणि चार दशकांपूर्वी घडलेल्या एका घटनेबाबत संभाषण करतात, आणि आपआपले वडील परस्परांविरुद्ध लढले याचा त्यांना शोध लागतो, हे निःसंशय समजण्यापलिकडचे आहे.

व्यक्तिशः मी नियती मानत नाही. पण कधी कधी माझा विश्वास डळमळतो. घटनांचे लागेबांधे भविष्याकडे पाहात जुळत नसतात, त्यासाठी भूतकाळातच डोकवावे लागते. हे लागेबांधे भूतकाळात जुळत असतील तर भविष्यातही जुळत असले पाहिजेत ही श्रद्धा जिवाला शांतवणारी असेल कदाचित. मला माहित नाही. पण शेवटी माणसाला कशानाकशावर विश्वास ठेवावा लागतोच ना !

ती तलवार आमच्या कुटुंबाची अभिमानास्पद ठेव आहे. जेव्हा जेव्हा मी ती पाहातो, तेव्हा माझे मन आराकानच्या जंगलात जाते – जिथे समरप्रसंगी चिरकालीन मानवतेचा अनुभव देत दोन शिपाइगडी परस्परांच्याच नव्हे तर आपआपल्या देशवासियांच्याही काळजाला भिडले.

भाषांतरकार: विश्वास मुंडले

मूळ लेखक: डॉ. यशवंत थोरात (NABARD चे माजी अध्यक्ष), ले.ज. एस् पी पी थोरात (KC, DSO) यांचे सुपुत्र

ले.ज. एस् पी पी थोरात (KC, DSO), हे दुसर्‍या महायुद्धातील नामवंत सेनानी होते. यथावकाश ते  पूर्व विभागाचे लष्कर प्रमुख म्हणून १९६१ साली निवृत्त झाले. पूर्व सीमेचे चीनच्या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी ले.ज. थोरात यांनी लष्करी व्यावसायिकते बरहुकूम बनविलेली व तत्कालीन सैन्यप्रमुख थिमय्या यांनी दुजोरा दिलेली योजना पंडित नेहेरू सरकारने नाकारल्यानेच १९६२ साली भारताची लष्करी पीछेहाट झाली.

मूळ लेख: http://www.coloursofglory.org/hill-called-melrose/

मूळ लेख नजरेला आणून दिल्याबद्दल कर्नल (निवृत्त) अरुण जोशी यांचे आभार

Hits: 81

You may also like...

8 Responses

  1. Kalyan Ramchandra Kulkarni says:

    प्रिय विश्वास,
    खूप छान. रंजक कथा वाटावी असे वास्तव. दोन्ही प्रवाशांची भेट व एकत्र प्रवास हा तर विलक्षण योगायोग.
    विश्वास, भाषांतर उत्तम झाले आहे व भाषाशैली अप्रतिम व ओघवती आहे. अभिनंदन .
    कल्याण

  2. अनिल कानिटकर says:

    एक न ऐकलेली युद्ध कथा . छान आहे.

  3. Asavari S Joshi says:

    व्यक्तिशः मी नियती मानत नाही. पण कधी कधी माझा विश्वास डळमळतो. घटनांचे लागेबांधे भविष्याकडे पाहात जुळत नसतात, त्यासाठी भूतकाळातच डोकवावे लागते. हे लागेबांधे भूतकाळात जुळत असतील तर भविष्यातही जुळत असले पाहिजेत ही श्रद्धा जिवाला शांतवणारी असेल कदाचित. मला माहित नाही. पण शेवटी माणसाला कशानाकशावर विश्वास ठेवावा लागतोच ना !

    हे या कथेचे वा सत्य घटनेचे सार आहे.
    सुंदर भाषांतर encyclopaedia काका

  4. अनुराधा रानडे says:

    न ऐकलेली युद्ध कथा भारावून टाकणारी आहे

  5. मंजूषा says:

    गोष्ट आवडली.भाषांतर चांगले झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *