विज्ञान काल्पनिका – व्याख्या व विचार

साहित्यातील काल्पनिकांप्रमाणेच विज्ञान काल्पनिकांचा प्रमुख हेतू रंजन असाच असतो. अन्य साहित्याप्रमाणेच विज्ञान-काल्पनिकांचेही काव्य, निबंध/ लघुनिबंध, कथा, कादंबरी असे विविध प्रकार संभवतात. पण मग विज्ञान काल्पनिका कशाला म्हणावे?

“विज्ञान कथा – का व कशासाठी?” या आपल्या लेखात लक्ष्मण लोंढे या नामवंत विज्ञानकथाकारांनी विज्ञान कथा या प्रकाराची व्याख्या ठरेल असे विवेचन केले आहे. काही मामुली बदल करून लोंढे यांच्या विज्ञान-कथेची व्याख्या विज्ञान-काल्पनिकेच्या व्याख्येत रूपांतरित होईल. ही रूपांतरित व्याख्या अशी – “विज्ञान काल्पनिका म्हणजे एक वा अनेक वैज्ञानिक तथ्ये, संकल्पना वा अनुमानितांच्या आधारे गुंफलेली साहित्यकृती – जीमधून वैज्ञानिक घटक वगळल्यास ती साहित्यकृती साहित्य म्हणून विरून जाईल.” (वाळूचं गाणं, लक्ष्मण लोंढे, ग्रंथाली/ ग्रंथघर (१), १९९५)

याच अनुषंगाने साहित्य या प्रकाराचेही विवेचन लोंढे यांनी केले आहे. ते म्हणतात की, “साहित्याच्या केंद्रस्थानी माणूस असतो. त्यानं स्वतःचा घेतलेला शोध, मनाच्या डोहात बुडी मारण्याचा केलेला प्रयत्न, इतर मानवांशी असलेले कौटुंबिक, सामाजिक, व राजकीय संबंध, व त्यातून निर्माण होणारे ताणतणाव हे खरं साहित्याचं क्षेत्र.” (तत्रैव) विज्ञान काल्पनिका ही साहित्यकृती असल्याने तिच्यात हे सारे गुणही असले पाहिजेत हे उधड आहे.

थोडक्यात विज्ञान-काल्पनिकाकाराला विज्ञानही चांगले समजले पाहिजे व त्याला चांगली साहित्यकृतीही घडवता आली पाहिजे. लालित्यपूर्ण कल्पनाविलास आणि वैज्ञानिक वस्तुनिष्ठ विचार या परस्पर विरोधी वाटणार्‍या दोन्ही गोष्टी जमल्या पाहिजेत. उघड आहे की ललितलेखक, ज्यांनी बहुधा जाणीवपूर्वक विज्ञानापासून फारकत घेतलेली असते, ते   विज्ञान-काल्पनिकांकडे वळणार नाहीत.  पण वाचक म्हणून मला असे वाटते की वस्तुनिष्ठ विज्ञानात तयार झालेले बहुसंख्य ललित-लिखाणेच्छुक, ज्यात मीही आलो, हे लालित्यात  कमी पडतात.  कारण या शिक्षणव्यवस्थेत विज्ञानाकडे दुर्लक्ष करणार्‍या लालित्यप्रेमींप्रमाणे या वैज्ञानिकांनीही साहित्यापासून लवकरच फारकत घेतलेली असते. मला काल्पनिका लिखाणाचा अनुभव नाही. पण एक वैज्ञानिक व एक साहित्यिक अशी जोडगोळी परस्पर सहकार्याने विज्ञान-काल्पनिका लिहू शकेल का, असे माझ्या मनात येऊन जाते.

अन्य ललित साहित्याच्या तुलनेत विज्ञान-काल्पनिका या प्रकाराचे एक खास वैशिष्ठ्य वाचक म्हणून मला जाणवते. लोंढे यांनी म्हटल्याप्रमाणे साहित्य रचनांमध्ये विविध मानवी शक्यतांतून उद्भवणार्‍या काल्पनिक प्रसंगांच्या आधारे मानवी मन, स्वभाव, परस्परसंबंध, व वर्तणुकीचा शोध घेतला जातो. विज्ञान काल्पनिकेतही हेच घडत असते. पण साहित्यातले काल्पनिक प्रसंग ज्ञात वास्तवाच्या बंधनात राहातात. या उलट विज्ञान काल्पनिकेला वैज्ञानिक तत्वे, तथ्ये, अनुमाने वापरून नवनवीन प्रसंग रचता येतात. उदाहरणार्थ प्रकाशाच्या वेगाने जाऊन वय न वाढलेला मुलगा पृथ्वीवरील मुलीच्या प्रेमात पडणे असा एक प्रसंग मला आठवतो. टाइम मशीन तर आता सर्वज्ञात आहे. इतरही असतील. सामान्य अनुभवाच्या पल्याड जाणार्‍या अशा अनुभवांच्या आधारे मानवी मनाचा वेगळ्या अंगाने, वेगळ्या प्रकारे आणि वेगळ्या दृष्टिकोनातून घेतलेलाा शोध अधिक रम्य असेल असे मला वाटते. आपले साहित्यिक विज्ञान-काल्पनिकेत रस घेतील तर नवनवीन प्रसंग रचून त्यातून ते मानवी मनाचे नवनवीन पैलू उजागर करू शकतील.

मला विज्ञान-काल्पनिका लिहिण्याचा अनुभव नाही. तेव्हा पाण्यात उडी न मारता ही काठावरूनच केलेली  ही समीक्षावजा टिप्पणी इथेच थांबवतो.

विश्वास द. मुंडले

ताजा कलम: मूळ लेख हा वेबसाइट बनवताना एक नमुना म्हणून टाकला होता. सबब त्यात बदल व संपादन करणे इष्ट वाटले,

Hits: 22

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *