मुलांसाठी पुस्तके – याद्यांची यादी ते यादी
२ एप्रिल २०२१ रोजी पार पडलेल्या बालसाहित्य दिनानिमित्त लोकसत्ताने १०० नामवंतांना मुलांनी कुठली पुस्तके वाचावी याबद्दल त्यांचे मत विचारले. प्रत्येक मान्यवरांने सुचवलेल्या साधारण पाच पुस्तकांची यादी अशा १०० याद्याही छापल्या (संदर्भ आत्ता सापडत नाहिये ! क्षमस्व !!) ही याद्यांची यादी हा महाराष्ट्राच्या वाचनसंस्कृतीचा एक ऐतिहासिक दस्तावेज आहे. त्याबद्दल लोकसत्ताला धन्यवाद.
मान्यवरांच्या सूचनांची व्याप्ती इसापनीती/ पंचतंत्र पासून तुकारामाची गाथा/ भगवद्गीता इतकी विशाल आहे. असे असले तरी ही यादी संपूर्णही नाही, आणि प्रातिनिधिकही नाही. ही यादी बनवणारे जीवनाच्या सर्वच क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतात आणि बालसाहित्याबाबतचा त्यांपैकी प्रत्येकाचा अनुभव व त्यांचे विश्लेषण हेही प्रातिनिधिक आहे असे म्हणणे थोडे धाडसाचेच होईल. या यादीत आवश्यक त्या सर्व प्रकारची पुस्तके समाविष्ट आहेत असेही मानता येणार नाही.
दुसरे असे की मुलांसाठी पुस्तके निवडू पाहाणार्या पालकांच्या दृष्टीने ही याद्यांची यादी तितकीशी उपयुक्त नाही. पालकांनी फक्त आपल्या आवडत्या मान्यवरांचे ऐकावे आणि आपल्या पाल्यासाठी पुस्तके निवडावी अशी अपेक्षा असेल तर प्रश्नच मिटला. पण ते काही योग्य नव्हे. कुठले लेखक किंवा कुठली पुस्तके मान्यवरांना अधिकाधिक आवडतात, ही माहिती पालकांच्यासाठी जास्त उपयुक्त असेल. सबब, या याद्यांच्या यादीचे लेखकवार व पुस्तकवार विश्लेषण व फेरवर्गीकरण करून तयार झालेली यादी पुढे दिली आहे.
या यादीचा उपयोग करून, आपल्या पाल्याला आज कुठले पुस्तक द्यावे हे ठरवताना पालकांनाही मेहेनत घ्यावी लागणार आहे. कारण वाचनप्रवासात आपले मूल कुठपर्यंत पोचले आहे याचे भान पालकांनाच असेल. त्यासाठी त्यांना ही पुस्तके किमानपक्षी चाळावी तरी लागणार. किंवा कोणाचा तरी सल्ला घ्यावा लागणार. ज्यांचे लेखकही दिलेले नाहीत अशा पुस्तकांच्या लेखकांचा शोधही घ्यावा लागणार. पालकांना बरंच काम दिलेलं आहे बरं !
या यादीतील काही शे पुस्तकांचे वयोगटवार वा शालेय इयत्तावार, किंवा वाङ्मयप्रकारानुसार वर्गीकरण असते तर त्याचा काही उपयोग होता. पण बालसाहित्याचे वर्गीकरण हाही एकमत होऊ न शकणारा विषय आहे. शिवाय वर्गीकरण करणार्याने ही सर्व पुस्तके किमान चाळली असली पाहिजेत. आपण हा विषय तज्ज्ञ मंडळींवर सोडू. या घडीला करू दे पालकांना मेहेनत !
एक गोष्ट नक्की ! काही वर्गीकरण उपलब्ध नसले तरी मुलांच्या वाचनाबाबत जागरूक पालकांना पुस्तके निवडायला लोकसत्ताने छापलेल्या याद्यांच्या यादीपेक्षा त्यावरून बनवलेल्या ह्या परिष्कृत यादीची जास्त मदत होईल. पुस्तके निवडताना वर म्हटल्याप्रमाणे मूळ याद्यांची यादी व त्यावरून बनवलेली ही विश्लेषित-परिष्कृत यादी सर्वंकषही नाही व प्रातिनिधिकही नाही हे पालकांनी अवश्य लक्षात ठेवले पाहिजे.
प्रथम अनेकवार म्हणजे दोन किंवा त्याहून जास्त वेळा शिफारस झालेली पुस्तके, तसेच एकाच लेखकाची शिफारसलेली दोन वा अधिक पुस्तके, यांची लेखकवार यादी पाहू. लेखकाच्या एका पुस्तकाचा एक उल्लेख हे एक मत असे धरून प्रत्येक लेखकाच्या एखाद्या पुस्तकाला मिळालेली सर्वाधिक मते इथे नोंदवली आहेतच. पण त्याशिवाय इतर पुस्तकांनाही मिळालेली मते धरून एखाद्या लेखकाला मिळालेली एकूण मतेही नोंदवली आहेत. ज्या लेखकांच्या केवळ एकाच पुस्तकाचा अनेकवार उल्लेख झाला आहे, त्यांच्या नावापुढे * ही खूण केली आहे.
लेखक (एकूण मते) | पुस्तकाचे शीर्षक (मिळालेली मते) (भाषांतरकार) |
भारा भागवत (२३) | फास्टर फेणे (१८), भुताळी जहाज, ब्रह्मदेशातील खजिना, शाबास शेरलॉक होम्स |
प्रना संत (२३) | वनवास (११), पंखा (६), शारदा संगीत (५), झुंबर |
वीणा गवाणकर*(१९) | एक होता कार्वर (१९) |
साने गुरुजी (१९) | श्यामची आई (१६), गोड गोष्टी, तीन मुले, धडपडणारी मुले |
माधुरी पुरंदरे (१६) | वाचू आनंदे (११), त्या एका दिवशी, पिकासो, लिहावे नेटके, सिल्वर स्टार एका मान्यवराने “संपूर्ण माधुरी पुरंदरे” सुचवलेला आहे. |
पुल देशपांडे (१५) | व्यक्ती आणि वल्ली (६), बटाट्याची चाळ (४), अपूर्वाई, असा मी असा मी, ती फुलराणी, पूर्वरंग, वंगचित्रे |
अब्दुल कलाम (१४) | अग्निपंख (१२), असे घडवा तुमचे भविष्य, मी देशाला काय देऊ शकतो (माधुरी शानभाग) |
रणजित देसाई (१४) | श्रीमान योगी (९), स्वामी, पावनखिंड बाजी प्रभुदेशपांडे, शिवाजी द ग्रेट मराठा, शेकरा |
जयंत नारळीकर (१२) | वामन परत न आला (३), चला जाऊ अवकाश सफरीला, प्रेषित, यक्षांची देणगी, अंतराळातील भस्मासुर, आकाशाशी जडले नाते, व्हायरस |
शिवाजी सावंत (११) | मृत्युंजय (७), छावा (४) |
सुधा मूर्ती (११) | आजीच्या पोतडीतल्या गोष्टी (३), ३००० टाके, आयुष्याचे धडे गिरवताना, आयुष्याचे धागे, गोष्टी माणसांच्या, पुण्यभूमी भारत, वाइज ॲड अदरवाइज (लीना सोहोनी) |
बमो पुरंदरे*(९) | राजा शिवछत्रपती (९) |
अनिल अवचट (८) | सृष्टीत गोष्टी (३), मोर, माणसं, शिकविले ज्यानी, स्वतःविषयी |
दिलीप प्रभावळकर (७) | बोक्या सातबंडे (७) |
व्यंकटेश माडगूळकर (७) | बनगरवाडी (३), करुणाष्टक, गावाकडच्या गोष्टी, माणदेशी माणसं, सत्तांतर |
गोनी दांडेकर (७) | आईची देणगी (२), दुर्गभ्रमण गाथा, माचीवरला बुधा, रुमाली रहस्य, शितू, शिवबाचे शिलेदार |
विदा सावरकर (६) | माझी जन्मठेप (३), काळे पाणी, समग्र सावरकर, हिंदुत्व |
चिवि जोशी (६) | चिमणरावाचे चर्हाट (३), ओसाडवाडीचे देव, चिमणराव आणि गुंड्याभाऊ |
जीए कुलकर्णी (५) | बखर बिम्मची (३), कुसुमगुंजा, माणसे अरभाट आणि चिल्लर |
सचिन तेंडुलकर *(५) | प्लेइंग इट माय वे (दीपक कुलकर्णी, बोरिया मुजुमदार) |
प्रभाकर पेंढारकर *(५) | रारंग ढांग |
भालचंद्र नेमाडे (४) | कोसला (४), हिंदू – जगण्याची समृद्ध अडगळ |
नाधो ताम्हनकर*(४) | गोट्या |
तेत्सुओ कुरोयानागी *(४) | तोत्तोचान (चेतना सरदेशमुख) |
अज्ञात (४) | पंचतंत्र |
मार्जरी रोलिंग *(४) | पाडस (राम पटवर्धन) |
अज्ञात *(४) | महाभारत |
मिलिंद बोकील *(४) | शाळा |
आर्थर कॉनन डॉइल (४) | शेरलॉक होम्सच्या कथा (भालबा केळकर) (दिलीप चावरे) (३), हाउंड ऑफ बास्करविल (प्रवीण जोशी) |
अच्युत गोडबोले (४) | मुसाफिर (२), किमयागार, संवाद |
अज्ञात *(३) | इसापच्या बोधकथा/ इसापनीती |
लुइस आलकॉट *(३) | चौघी जणी (शांता शेळके) (३) |
विग कानिटकर *(३) | नाझी भस्मासुराचा उदयास्त (३) |
विश्वास पाटील *(३) | पानिपत |
सत्यजित राय *(३) | फेलुदा (अशोक जैन) (ही व्यक्तिरेखा शेरलॉक होम्स वरूनच बेतलेली आहे.) |
दया पवार *(३) | बलुतं |
विंदा करंदीकर*(३) | बालकविता |
पुरुषोत्तम खेडेकर *(३) | शिवचरित्र |
कुसुमाग्रज *(३) | विशाखा |
जवाहरलाल नेहेरू (३) | इंदिरेस पत्रे/ प्रियदर्शिनीस पत्रे (२), भारताचा शोध |
नंदा खरे (३) | कहाणी मानवप्राण्याची (२), दगडधोंडे |
नरेंद्र दाभोळकर (३) | विचार तर कराल (२), तिमिरातुनी तेजाकडे |
मंगेश पाडगावकर (३) | बोलगाणी (२), सलाम |
महात्मा गांधी (३) | माझे सत्याचे प्रयोग |
मार्क ट्वेन (३) | भटकबहाद्दर हकलबरी फिन (भारा भागवत), हकलबरी फिनची साहसे (अवधूत डोंगरे), टॉम सॉयरच्या साहसकथा |
विस खांडेकर (३) | ययाति (२), मंझधार |
अरुण शेवते (२) | नापास मुलांची गोष्ट, हाती ज्यांच्या शून्य होते. |
अरुण साधू (२) | झिपर्या, सिंहासन |
ॲन फ्रॅंक (२) | द डायरी ऑफ ए यंग गर्ल (मंजूषा मुळे), डायरी ऑफ ॲन फ्रॅंक (मंगला निगुडकर) |
आरके नारायण *(२) | मालगुडी डेज (मधुकर धर्मापुरीकर) |
गोविंद पानसरे*(२) | शिवाजी कोण होता? |
गौरी रामनारायण*(२) | आमचं बालपण (उल्का राऊत) |
चार्ल्स डूहिग *(२) | द पॉवर ऑफ हॅबिट |
जिम कॉर्बेट (२) | मॅनईटर ऑफ कुमाव (विश्वास भावे), शिकारकथा (?) |
जॉं जिओनी *(२) | झाडे लावणारा माणूस (माधुरी पुरंदरे) |
दुर्गा भागवत *(२) | ऋतुचक्र |
पद्मजा फाटक, मा. नेरुरकर *(२) | बाराला दहा कमी |
प्रकाश आमटे *(२) | प्रकाशवाटा |
बाबुराव अर्नाळकर (२) | झुंजार कथा, निवडक बाबुराव अर्नाळकर (सतीश भावसार) |
मारुती चितमपल्ली *(२) | चकवा चांदणे |
रवींद्रनाथ ठाकूर (२) | पोरवय (पुल देशपांडे), पोस्ट ऑफिस |
लम कडू *(२) | खारीच्या वाटा |
विक्तर द्रागुन्स्की (२) | डेनिसच्या गोष्टी (अनघा भट) |
श्रीनिवास वि. कुलकर्णी | डोह, सोन्याचा पिंपळ |
संदेश कुलकर्णी *(२) | मांटुकले दिवस |
सलिम मुल्ला (२) | ऋतुफेरा, जंगल खजिन्याचा शोध |
सुरेश भट (२) | झंझावात, रंग माझा वेगळा |
सोमदेव *(२) | कथा सरित्सागर (हअ भावे) |
स्टीफन हॉकिंग (२) | ए ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम (सुभाष देसाई), बालवाङ्मय (?) |
ही यादी प्रातिनिधिक नाही याच्या खुणा वरच्या जंत्रीत दिसतात. उदाहरणार्थ वीणा गवाणकर यांचे एक होता कार्वर हे एकच पुस्तक बहुसंख्यांनी पुरस्कारले आहे. ते चांगलेच आहे. पण त्यांनी रोझालिंड फ्रॅंकलिन (वैज्ञानिक), सालिम अली (पक्षीतज्ज्ञ), गोल्डा मायर (राजकारणी), पांडुरंग खानखोजे (क्रांतिकारक व शेतीतज्ज्ञ) यांचीही चरित्रे लिहिली आहेत. “नाही चिरा” हे पांडुरंग खानखोजे यांचे चरित्र कार्वरच्या चरित्राइतकेच प्रभावशाली आहे, असे मला वाटते. नाधो ताम्हनकरांची चिंगी, खडकावरला अंकुर ही ही पुस्तके गोट्याइतकीच मुलांना आवडतील अशी आहेत. महाभारत, रामायण, इसापनीती पंचतंत्र, ही पुस्तके अनेक लेखकांनी विविध वयोगटांसाठी आपआपल्या परीने मांडली आहेत. त्या विविध लेखकांची नावे या यादीत नसल्याने निवड करू पाहाणार्या पालकांची गैरसोय होणार व त्यांना मिळेल ते घ्यावे लागणार. जाणकारांनी याबाबत अधिक प्रकाश टाकावा.
अनेक पुस्तके केवळ एकदाच सुचवली गेली आहेत. पण म्हणून ती कमी महत्वाची नव्हेत. त्यांची यादी खाली दिली आहे. प्रत्येक पुस्तकविषयक माहितीचा क्रम लेखक/लेखिका (भाषांतरकार), शीर्षक असा आहे. यातली बरीच पुस्तके मी वाचलेली नाहीत. सबब त्यांचे वर्गीकरणाचा प्रयत्न केलेला नाही. लेखकांची नावे अकारविल्हे देण्याचा प्रयत्न केला आहे.
अंजली जोशी, मी अल्बर्ट एलिस अतुल कहाते, वर्णद्वेष संपवणारा युगपुरुष – नेल्सन मंडेला
अनंत भावे, युद्धकथा अनुराधा पोतदार, महान स्त्रिया अपां देशपांडे, डॉ. रघुनाथ माशेलकर
अमिता नायडू, पहिला नंबरकारी अरुण कोलटकर चिरीमिरी
अरुण गांधी (सोनाली नवांगुळ), वरदान रागाचे अरुण वेढीकर, मुंबई ते काश्मीर सायकलप्रवास
अर्न्स्ट हेमिंग्वे (पुल देशपांडे), एका कोळियाने अशोक व्हटकर, ७२ मैल
ॲगाथा ख्रिस्ती (रेखा देशपांडे), वन टू बकल माय शू आचार्य अत्रे, कर्हेचे पाणी
आदर्श विकास कृष्णा, तीन मुलांचे चार दिवस आनंद नाडकर्णी, हेही दिवस जातील
आन्त्वान द संतेक्झ्युपेरी (ललिता मांडे), छोटा राजकुमार आरके लक्ष्मण, तुमचे आमचे हीरो
उद्धव शेळके, ढग एसजी सरदेसाई, भारतीय तत्वज्ञान – वैचारिक व सामाजिक संघर्ष
कविता महाजन, कुहू किशोर काळे, कोल्हाट्याचं पोर किशोर मासिक
कुमकुम खन्ना, पीटी उषा कुमार मासिक क्रिस्टीना लॅंब (सुप्रिया वकील), मी मलाला
गिरीश कुबेर, टाटायन गिरीश जाखोटिया, एका मारवाड्याची गोष्ट
गुलजार (विजय पाडळकर), रावी पार गोदावरी परुळेकर, जेव्हा माणूस जागा होतो
गोना मुनघाटे, माझी काटेमुंढरीची शाळा ग्यानदेव अग्निहोत्री, याराना चंद्रकुमार नलगे, रातवा
जीके प्रधान, साद घालती हिमशिखरे जेके रोलिंग, हॅरी पॉटर जेफ केलर, दृष्टिकोन म्हणजे सर्वकाही
जोतीराव फुले, गुलामगिरी जोसेफ मर्फी (पुष्पा ठक्कर), पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माइंड
ज्ञानदा असोलकर, वॉल्ट डिस्ने स्वप्नांचा किमयागार ज्ञानेश्वर मुळे, माती पंख आणि आकाश
डॅनिएल गोलमन, इमोशनल इंटेलिजन्स डेल कार्नेगी, चिंता सोडा सुखाने जगा
डॉन ब्रॅडमन (अतुल कहाते), क्रिकेट कसे खेळावे दमा मिरासदार, मिरासदारी देवदत्त पटनाइक, जय
नंदिनी देशमुख, रानातली गोष्ट- मनातली गोष्ट नचि केळकर, लोकमान्य टिळक चरित्र
नरेंद्र जाधव, आमचा बाप आणि आम्ही नरेंद्र लांजेवार, वाचू आनंदे मिळवू परमानंदे
नाग गोरे, बेडूकवाडी नातू पोघे, इरवाड स्वकथन नाथमाधव, वीरधवल
नारायण धारप, गूढकथा नारायण सुर्वे, माझे विद्यापीठ निनाद बेडेकर, गजकथा
निर्मलकुमार फडकुले, प्रबोधनातील पाउलखुणा नेल्सन मंडेला (गौरी साळवेकर), संवाद स्वतःशी
परमहंस योगानंद, एका योग्याची आत्मकथा पुग सहस्रबुद्धे, माझे चिंतन
प्रइ सोनकांबळे, आठवणींचे पक्षी प्रदीप ढवळ, पराक्रमाची हिमशिखरे बाबा भांड, आनंदमेळा
बाबुराव बागुल, मरण स्वस्त होत आहे बालाजी मदन इंगळे, झिम पोरी झिम
बिल गेट्स (आशा कवठेकर), यशाचे आणि श्रीमंतीचे धडे भाद खेर, हसरे दुःख
भानू काळे, बदलता भारत भानू शिरधनकर, शिकारकथा भालबा केळकर, रंजक विज्ञान प्रयोग
भीष्मराज बाम, विनिंग हॅबिट्स् मनोज अंबिके, मनाची शक्ती कशी वापराल महादेवशास्त्री जोशी, पुष्पदंत
मिल्खा सिंग (राकेश मेहेरा), द रेस ऑफ माय लाइफ मृणालिनी वनारसे, प्रतीक
मेरी कोम (विदुला टोकेकर), अनब्रेकेबल मोरा वाळंबे, सुगम मराठी व्याकरण मोहन आपटे, मला उत्तर हवंय
यशवंतराव चव्हाण, कृष्णाकाठ रचना भोला, द लाइफ ॲड टाइम्स ऑफ मेजर ध्यानचंद
रत्नाकर मतकरी, कळलाव्या कांद्याची कहाणी रमेश इंगळे उत्रादकर, निशाणी डावा अंगठा
रमेश पतंगे, महामानव अब्राहाम लिंकन राजा शिरगुप्पे, न पेटलेले दिवे राधाकृष्ण पिल्लइ कथा चाणक्य
राही गणेश व श्रीरंजन आवटे, आपलं आयकार्ड रॅंडी कर्क (सुनीती काणे), एलॉन मस्क
रेणू सरन, एपीजे अब्दुल कलाम रॉबिन शर्मा, ५ एएम् क्लब र्होंडा बायर्न, द सीक्रेट – रहस्य
लक्ष्मण गायकवाड, उचल्या विक्रम पटवर्धन, दर्या विजय तेंडुलकर, शांतता कोर्ट चालू आहे
विठ्ठल कामत, इडली ऑर्किड आणि मी विद्याधर पुंडलिक, चक्र
विनोद शिरसाट, निवडक बालकुमार साधना विल भावे, चक्रवर्ती नेपोलियन
विल्यम गोल्डिंग (जीए कुलकर्णी), लॉर्ड ऑफ फ्लाइज विवा शिरवाडकर नटसम्राट
विश्वास नांगरे पाटील, कर हर मैदान फतेह वीवीएस् लक्ष्मण, २८१ ॲड बियॉंड
वॉल्टर आयझॅक्सन (विलास साळुंखे), स्टीव जॉब्स व्हर्गीज कुरियन (सुजाता देशमुख), माझं ही एक स्वप्न होतं
शंह कुलकर्णी, बंडखोर बंडू शमी सूद (भगवान दातार), फील्डमार्शल सॅम माणेकशा
शिद फडणीस, हसरी गॅलरी शुभदा गोगटे, खंडाळ्याच्या घाटासाठी श्रीकृ कोल्हटकर, सुदाम्याचे पोहे
संगीता बर्वे, पियूची वही संजय डोंगरे, कणखर पीव्ही सिंधू संत तुकाराम, तुकारामाचे अभंग
संदीप श्रोत्री, कासवांचे बेट सत्यजित भटकळ (अशोक जैन), एका स्वप्नाचा प्रवास – लगान
सानिया, शोध सुधा लिमये, रंगावली सुनील गावस्कर, सनी डेज
सुनील विभुते, किस्से शास्त्रज्ञांचे सुरुचि पांडे, स्वामी विवेकानंदांच्या आनंदकथा
सुरेश सावंत, नदी रुसली नदी हसली सुहास कुलकर्णी मिलिंद चंपानेरकर, यांनी घडवले सहस्रक
स्वाती राजे, अंधाराचे गाव हमीद दलवाई, इंधन हेन्री शॅरियर (रवींद्र गुर्जर), पॅपिलॉन
हेमू अधिकारी, नाट्यविज्ञान सामाजिक वृत्त व विचार
अकबर बिरबलाच्या गोष्टी, आजोबांच्या आवडत्या गोष्टी, तेरा अपूर्व किशोरकथा, निबंधमाला विनोद आख्यायिका, पंचम बोधकथा, सिंदबादच्या सफरी यांचे लेखक दिलेले नाहीत. तर तुकारामाची गाथा, भगवद्गीता आणि भारताचे संविधान- ५१परिच्छेद या सारख्या ग्रंथांवर निरूपण करणारी पुस्तके आवश्यक असतील. पण त्यांचेही तपशील उपलब्ध नाहीत.
जाणकारांनी ही यादी पालकांना अधिक उपयुक्त व्हावी यासाठी तपशील प्रतिक्रिया म्हणून पुरवावे ही विनंती. अन्यथा हा सारा शोध पालकांनाच घ्यावा लागणार ! पालकांना पुस्तकशोधासाठी व पाल्यांना वाचनानंदासाठी शुभेच्छा !!
विश्वास द. मुंडले
Hits: 69
Recent Comments