कसं सुचतं बुवा?

आय-ट्रान्सफॉर्म या संस्थेची विज्ञान-लेखन-कार्यशाळा (९ ते १२ एप्रिल २०२१) ही वैचारिक मेजवानीच होती. निरंजन घाटे, डॉ. बाळ फोंडके, डॉ. मेघश्री दळवी, सुबोध जावडेकर या सिद्धहस्त लेखक-लेखिकांचे मार्गदर्शन हा एक चांगला योग होता. फोंडके सरांचे सत्र सुरू होते, त्यावेळची ही गोष्ट.

वैज्ञानिक माहितीपर लिखाणाबाबतचे सरांचे नेमके विवेचन ओघवत्या भाषेत चालले होते. लेख हा प्रकार लिहिताना सरांनी “कुतूहल जागवणारे शीर्षक” असावे अशी एक निकड सांगितली. आणि थोड्याच वेळात चॅटरूम वर सद्गुरु कुलकर्णी यांचा प्रश्न प्रकटला.

“नमस्कार फोंडके सर, मी Personalized Medicine ह्या विषयावर लेख (पॉप्युलर) लिहिला आहे. त्या लेखाचे शीर्षक देताना खूप समस्या आली. शेवटी 'औषधोपचाराचे वैयक्तिकीकरण' हे शीर्षक दिल. पण मला स्वतःला ते आवडलं नाही. लेखामध्ये 'वैयक्तिकीकरण' हा शब्द कमीत कमी वापरण्याचा प्रयत्न केला आहे आणि ती संकल्पना समजावली आहे. अशा वेळी काय करावं? उत्तम शीर्षक काय देता येईल?”

हा प्रश्न म्हणजे एक आवाहन होते. पण मला ते आव्हान वाटले. एक दोन मिनिटांच्या विचारानंतर मला दोन शीर्षके सुचली. ती चॅटरूमवर टाकली. (ही काही मिनिटे मी फोंडके सरांचे कथाकथन ऐकत नव्हतो, हे मान्य करतो. क्षमस्व सर !)

मराठीतले शीर्षक "ज्याचे त्याचे औषध”, आणि संस्कृत चालणार असेल तर “पिंडे पिंडे गुटिर्भिन्ना” 

शीर्षके प्रश्नकर्त्यांना आवडली. सुबोध जावडेकरांना ती अर्थवाही व समर्पक वाटली, तर स्वाती केळकरांना संस्कृत शीर्षक फारच आवडले. त्यांना धन्यवाद. अशी पावती मिळाली की बरे वाटते. पण मला लगोलग पडलेला प्रश्न असा की मला हे असे नाव कसे आणि का सुचले? ही व्यक्तिनिष्ठ कल्पकता आहे की शिकता येईल असे कसब आहे? की एखादे विचारसूत्र वा विचारप्रक्रिया? काहीही असो, हे सारे शिकता येते असे माझे मत आहे. कोण लवकर शिकेल तर कोणाला उशीर लागेल. पण त्यासाठी विद्यार्थ्यांनी काही प्रयत्न केला पाहिजे. त्याच न्यायाने ही नाव सुचण्याची प्रक्रिया शिकवताही येईल अशी माझी धारणा आहे. उघड आहे की त्यासाठी शिक्षकांनाही प्रयत्नशील राहावे लागेल. हे कसब शिकवायचे तर त्यासाठी ही नामनिश्चिती करताना मी कुठल्या वैचारिक प्रक्रियेतून गेलो हे पाहिले पाहिजे.

आता स्वतःचे निरीक्षण करणे हीच मुळात कठीण गोष्ट. स्वत:च्या विचारांचे निरीक्षण आणि विश्लेषण तर त्याहूनही अधिक कठीण ! त्यात ते पश्चात्बुद्धीने केलेले. पश्चात्बुद्धी ही सदैव शहाणीच असते. सबब हे विश्लेषण किमानपक्षी प्रदूषित आणि कदाचित “अतिशहाणे” असणेही संभवते. त्यात माझ्या पूर्वानुभवाची भेसळही होऊ शकते. ते काही असो. हे सदोष विश्लेषणही उपकारक ठरेल असे वाटले, म्हणून केलेला हा उहापोह. इथे आधी लेख लिहून मग शीर्षक-शोध चालला आहे असे गृहीत धरले आहे.

सदर शीर्षक सुचवताना ज्या पायर्‍यांवरून मी गेलो असे मला जाणवले, त्या खालीलप्रमाणे –

  1. प्रस्थापित औषध योजना सामान्यतः रोगानुसार बदलते, माणसानुसार नाही. सबब “व्यक्तिनिष्ठ औषध योजना” ही फारच नवीन आणि प्रस्थापिताच्या विपरीत जाणारी संकल्पना आहे.
  2. “व्यक्तिनिष्ठ औषध” ही कल्पना नवीन असली तरी दर माणसागणिक काही गोष्टींचे वेगवेगळे असणे हे जनसामान्यांना मान्य असते. उदाहरणार्थ नशीब, दैव, वा विचार.
  3. प्रत्येकाचे वेगळे नशीब ही कल्पना आपण “ज्याचे त्याचे नशीब” या वाक्प्रचारात मांडतो. तर प्रत्येकाचे विचार वेगळे ही संकल्पना आपण “पिंडे पिंडे मतिर्भिन्ना” या सुभाषितपर अनुष्टुपात मांडतो. दैव म्हणाल तर “प्रत्येकाचे दैव वेगळे” असा अण्णांच्या कवितेचा चरण आहे.
  4. आता नशीब दैव व विचार यांच्या बरोबरीला औषध आणून बसवायचे. त्यासाठी याच वाक्प्रचार वा सुभाषितात वा चरणात इष्ट तो बदल करायचा. असे का? तर एखादी पारंपरिक व म्हणून परिचित रचना वाक्प्रचार वा सुभाषित वाचू लागलो की त्या मूळ रचनेतला आशयही मनात दरवळू लागतो. सदर वाक्प्रचार, म्हण, चरण वा सुभाषिताच्या मूळ रचनेतच “औषध” वा तत्सम शब्द बसवण्यातली अपेक्षा ही की माणसामाणसागणिक जसे नशीब, दैव व विचार वेगवेगळे, तसेच औषधही ही कल्पना सूचकपणे वाचकापर्यंत पोचेल.
  5. मात्र हा बदल कवितेच्या मात्रा आणि वृत्त सांभाळणारा असला पाहिजे. नशिबाऐवजी औषध सहज बसते कारण या गद्य वाक्याला मात्रा गणाची बंधने नाहीत. अनुष्टुपात मति ऐवजी गुटीही बसते. (तशीच “वटि” ही बसली असती, हे नंतर सुचले.) प्रत्येकाचे दैव वेगळे यात दैव ऐवजी औषध सुचवणारा शब्द मला त्यावेळी सुचला नाही ! अजूनही सुचत नाही. कुणाला सुचला तर पाहा. पण हा लेख औषधाबरोबर आहाराचीही चर्चा करीत असेल, तर “प्रत्येकाचे पथ्य वेगळे” हा चरण वापरता येईल.
  6. या सगळ्या प्रक्रियेमागचे महत्वाचे विचारसूत्र हे की, माणसाला एकाएकी नावीन्याकडे लोटण्याऐवजी संवयीच्या गोष्टीतून नावीन्याकडे वळवणे सोपे असते. नाहीतरी नवीन संकल्पना समजावण्यासाठी पुराणकथा, परीकथा, सांस्कृतिक प्रतीके व अनुभव यांचा वापर करावा, असे फोंडके सरांनी सुचवलेलेच आहे. आणि जनमानसांत रुजलेल्या म्हणी, सुवचने आणि कविता ही सारी आपल्या संस्कृतीची प्रतीकेच म्हटली पाहिजेत. नाही का?

ही एक मला सुचलेली प्रक्रिया झाली. कुणा अन्याला आणखी कुठली प्रक्रिया सुचेल. त्यायोगे हे प्रक्रिया शिकवणे अधिक समृद्ध होईल. हेही लक्षात घेतले पाहिजे की लेखाची जातकुळी बदलली तर शीर्षक शोधण्याची प्रक्रियाही बदलेल. इतर प्रकारच्या लेखांचे समर्पक शीर्षक शोधण्याच्या प्रक्रियेचे चिंतन अजून बाकी आहे.

“कोणी चिंतन पुरवता का चिंतन?” किंवा “कोणी उदाहरण पुरवता का उदाहरण?”

विश्वास द. मुंडले

Hits: 59

You may also like...

3 Responses

  1. Madhav says:

    Chhan. Su-bhashitachya aivaji Su-vachan ka bara lihila?

    • visdam says:

      विशेष काही कारण नाही. मनात आले तसे लिहिले. पण आता भाषित व वचन यांच्यातला साम्यभेद जोखला पाहिजे. थोडा वेळ लागेल. तू शोध घेतलास तर जरूर लिही व कळव.

  2. अर्चना देशपांडे says:

    छान वाटले वाचून !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *