उखाणे

credit alamy.com

गेल्या शतकाच्या पूर्वार्धात केवळ विवाहसमारंभातच नव्हे, तर विविध कौटुंबिक कार्यक्रमात वेगवेगळ्या निमित्ताने विविध वेळेला विवाहित स्त्रियांना नवर्‍याचे नाव घेण्याचा आग्रह होई. उदाहरणार्थ लग्नाखेरीज, डोहाळे जेवणात, बारश्याला, किंवा स्त्रियांचे खेळ खेळताना ठराविक प्रसंगी उत्सवमूर्तीला नाव घेण्याचा आग्रह आजही होत असतो. तर हळदीकुंकू समारंभात आलेल्या वरिष्ठ स्त्रिया एखाद्या नवविवाहितेला नाव घ्यायला सांगत असतात. ज्या जमान्यात नवर्‍याला केवळ “अहो”, “साहेब”, “मालक” यासारख्या नावाने पुकारले जाई, त्या काळात या नाव घेण्याच्या प्रथेला काही विशेष संदर्भ होता. ही नाव घेण्याची परंपरा आजही ग्रामीण भागात जास्त प्रचलित दिसते.

मात्र नागर समाजातील सुशिक्षित स्त्रिया आजकाल नवर्‍याला नावाने बोलवीत असतात. त्यामुळे नागरी समाजापुरती तरी विविध समारंभात पतीचे नाव घेणे ही परंपरा तशी निरर्थक ठरली आहे. असे असले तरी लग्नाचे वेळी नवर्‍याला घास भरवताना नवरीने नाव घेण्याची प्रथा अजून टिकली आहे. आणि आता तर नवरदेवानेही नववधूला घास भरवताना नाव घेण्याची प्रथा पडली आहे. दोघेही आपआपल्या जोडीदाराचे नाव पहिल्यांदाच घेत असल्याने हे समारंभपूर्वक नाव घेणे तसे समर्पक म्हटले पाहिजे.

हे नाव उखाण्यात (म्हणजे एखाद्या किमान दोन ओळींच्या काव्यसदृश सयमक समयोचित रचनेत गुंफून) घेण्याची प्रथा होती आणि आहेही. त्यासाठी नाव घेणारीला किंवा घेणार्‍याला आयत्या वेळेला कल्पनांची, रचनेची, शब्दांची जुळवाजुळव करणे भाग पडते. गावाकडे तर कथाकथन ठरेल इतके मोठी रचना नाव घेताना ऐकायला मिळते. रचना लहान असो वा मोठी, तिच्यात एखाद्या व्यक्तीच्या हजरजबाबीपणाची, रसिकतेची, बुद्धिमत्तेची चुणूक दिसत असते. “समोरच्या कोनाड्यात उभी व्हिंदमाता, बेंबट्याचे नाव घेते माझा नंबर पहिला” हा पुलंचा विनोद तर प्रसिद्ध आहे. त्या अर्थी देखील ही नाव घेण्याची प्रथा सयुक्तिक ठरते. ती आपली मराठी सांस्कृतिक परंपराच म्हटली पाहिजे.

आईच्या जमान्यात उखाण्याला बरेच महत्व होते. बरेचदा तिच्याकडे उखाणे सुचवायचे कामही येई. त्या निमित्ताने तिने बरेच उखाणे लिहून ठेवले आहेत. त्यातील निवडक इथे नोंदले आहेत.

उखाण्यांचा खेळ

या उखाण्यांच्या सवाल-जबाब सदृश मालिकेत नाव घेताघेता स्त्री-पुरुष समानतेवर टिप्पणी केली आहे.

सरस्वती आधी, मी गणेशाला वंदी । xxx चे नाव घेण्याची, अशीच येवो संधी ॥

चालू युगी स्त्री-पुरुष, समान करती काम । xxx च्या जिवावर मी करी आराम ॥

घरी आराम करण्यापेक्षा, जावं म्हणते समाजात । संसाराच्या संगीताला xxx ची साथ ॥

समाजात जाणे मला नाही जमत । त्यातून गेले असते, पण xxx ना नाही आवडत ॥

समाजात जाण्याची मला हौस फार । xxx नको म्हणतात म्हणून घेते माघार ॥

समाजात जाती बायका, संसाराचा होतो खेळ । xxx ची घरी यायची चाराची वेळ ॥

समाजात जाती बायका, नाही सुटत चूल आणि मूल । xxx च्या पावलावर मी ठेवते पाऊल ॥

समाजात किती गेल्या तरी नाही होणार झाशीची राणी । असे ठासून सांगते xxx ची वाणी ॥

नाही झाली झाशीची राणी तर होतील दुर्गा देशमुख । xxx चे हसतमुख हेच माझे सुख ॥

समाजात जाऊन स्वभाव धीट होतो । म्हणून xxx आणि मी समाजकार्य करतो ॥

समाज सुधारल्याने देश होईल उन्नत । xxx च्या मताशी मी आहे सहमत ॥

समाजात जाणे हाच स्त्रियांचा विश्रांतीचा वेळ ।
xxx चे नाव ऐकून सांगा आवडला का उखाण्यांचा खेळ ॥

-मंगला द. मुंडले (१६/९/१९६२)

संक्रांतीचे उखाणे

पौषमासी महत्व संक्रांतीच्या सणा । xxx च्या जीवावर लुटते हळदीकुंकू वाणा ॥

बारा महिन्यांच्या बारा संक्रांती । पण मकरसंक्रांतीला महत्व फार ॥
xxx च्या जिवावर घालते मंगळसूत्र हार ॥

संक्रांतीच्या सणा तिळगुळाचं महत्व । xxx घरी येताच मला विसरायला हवं स्वत्व ॥

तिळाचा स्निग्धपणा, गुळाची गोडी । xxx च्या जिवावर घालते मंगळसूत्र जोडी ॥

नव्या रूपातला तिळगुळ त्याला म्हणती हलवा । xxx ची शिकवण आनंदात दिवस घालवा ॥

हलव्याचं रूप मोहक, परि त्याला काटे । xxx च्या पावली चालता हर्ष मनी दाटे ॥

हलव्याची तीनच अक्षरं, परी त्यात गूढ भरला अर्थ । xxx च्या बरोबर जीवन केलं सार्थ ॥

हलव्याचा अर्थ गूढ आम्हाला सांगा समजावून । xxx ने सेवेसाठी देह घेतला वाहून ॥

हलव्याचा अर्थ, हसून लवून वागा । xxx आहेत पतंग, xxx त्याचा धागा ॥

हसून लवून वागा, हा आवडला हलव्याचा संदेश । वाणी असावी गोड हा xxx चा उपदेश ॥

संक्रांतीच्या सणा भेदभाव सारे विसरा । माझा खरा अलंकार, xxx चा सदा हसरा चेहेरा ॥

संक्रांतीच्या सणा, जावयांना आलं तिळवण । xxx च्या पावली चाल ही आईची शिकवण ॥

संक्रांतीच्या सणा, जावयांना आला हलव्याचा साज । xxx जिवावर घालते सौभाग्याचा साज ॥

संक्रांतीच्या सणा, जावयांना आला हलव्याचा साज । xxx जिवावर साजरी पहिली संक्रांत आज ॥

हत्तीवरून तिळवण, आई आली घेऊन । वडलांनी केले जावई, xxx चे गुण पाहून ॥

-मंगला द. मुंडले (२/२/१९६७)

शीर्षक चित्र श्रेय: alamy.com

Hits: 0

You may also like...

1 Response

  1. श्रीकांत दिवाकर लिमये says:

    उखाणे ”झी वाहिनीवर’पैठणीच्या कार्यक्रमात प्रत्येक वेळेस घेतले जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *