शब्द-कोडी-संकीर्ण

रचयित्री – मंगला द. मुंडले

चार अक्षरी मी एक शब्द । नवमतवादी हा त्यास अर्थ ॥
पहिले दुसरे पाजी अमृत । चवथे तिसरे दाखवि हात ॥
पहिल्या-तिसर्‍यामाजी देव । एक चार तिन सोपे होय ॥
चवथे तिसरे जागा बदला । हाका मारा त्या मुलग्याला ॥

उत्तर सुधारक

——————————————

मी एक आवाज । माझी अक्षरे तीन ॥
दुसरे तिसरे अक्षर घेता । मी सोन्याची तार बनेन ॥
तिसरे पहिले अक्षर घ्याल । थंडीमध्ये ऊब मिळेल ॥
पहिल्याला काना द्याल । तर होइल माझे एक मूळ ॥
पण काना देता तिसर्‍याला । मी आवडतो ताईला ॥

उत्तर गजर

—————————————————–

तीन अक्षरी शब्द मी साचा । “वेळ जाहला” अर्थ तयाचा ॥
पहिले दुसरे अक्षर वाचुन । झोप कशी हो यावी याविण ॥
दुसरे तिसरे अक्षर वाचा । डोके ऐसा अर्थ तयाचा ॥
पहिले तिसरे अक्षर घ्याल । शरिराचा तो भाग असेल ॥

उत्तर उशीर

—————————————————

तीन अक्षरी शब्द मी साचा । चेहेरा ऐसा अर्थ तयाचा ॥
पहिले दुसरे अक्षर वाचा । बोला ऐसा अर्थ तयाचा ॥
पहिले तिसरे अक्षर घ्यावे । हिरवे हिरवे सर्व दिसावे ॥

उत्तर वदन

———————————————————-

निरा निळा । रानी राळा । हा तर सारा । झाला घोटाळा ॥
तसा मी आहे । अगदी वेगळा । यातून मला । शोधून काढ बाळा ॥

उत्तर: निराळा

————————————————

तीन अक्षरी समूहवाचक । पहिले दुसरे वेदनादर्शक ॥
तिसरे दुसरे म्हणते । भरभर चाल ॥
पहिले तिसरे हे तर । सकाळीच हाती घ्याल ॥

उत्तर कळप

——————————————————

ज्ञान मिळवणे या अर्थाचा शब्द अक्षरे तीन ।
चवथे अक्षर मध्ये येता होते विद्यादान ॥

उत्तर शिकणे शिकवणे

—————————————————–

चार अक्षरी शब्द मी असुनी । दोन भाग हे करा त्यातुनी ॥
पहिला शब्द डोके अर्थी । दुसरा शब्द डोक्यावरती ॥
पहिले तिसरे दुसरे घ्याल । एका ॠतुचे नावच होइल ॥
पहिली अक्षरे घेता तीन । होइल एक गळित धान्य ॥
दुसरे तिसरे अक्षर घ्याल । अर्थ तयाचा दोरी होइल ॥
मला तुम्ही ओळखा । नाहीतर तुमचे डोके । अगदीच खोका ॥

उत्तर शिरशिरी

———————————————————————

एकच अक्षर तीनदा लिहावे । पहिल्या दोघाआधी व त जोडावे ॥
अडथळा असा होईल त्याचा अर्थ । माझा शब्द ओळखून दाखवा बुद्धिसामर्थ्य ॥

उत्तर: व्यत्यय

रचयित्री – मंगला द. मुंडले

अगोदर वाचले नसेल तर या कोड्यांची जन्मकथा व वापरविषयक निवेदन इथे वाचा.

Hits: 62

You may also like...

4 Responses

  1. Ramesh J Modi says:

    सुंदर. मुलांच्या पायाभूत शिक्षणासाठी उपयुक्त

  2. शरद जोशी says:

    शब्द कोडी मस्तच!पण उत्तर लगेच बघायला मिळू नयेत.ती सगळ्यात शेवटी दिली तर उत्सुकता राहील.

    • visdam says:

      धन्यवाद. कल्पना चांगली आहे. पुन्हा संपादनाची वेळ येईल तेव्हा अंमलात आणू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *