सप्तपदी
महाराष्ट्रीय विवाहसमारंभात सप्तपदी महत्वाची मानली जाते. वर आणि वधू दोघेही सात पावले चालत असले तरी वधूला सर्वस्वी नवीन जगात प्रवेश करायचा असतो. तेव्हा, विवाह समयी नववधूला उद्देशून आईने वा एखाद्या वडीलधार्या स्त्रीने उपदेश करणे हे स्वाभाविकच. हा उपदेश काव्यरूपात किंवा प्रसंगी गद्यातही लिहिला जातो, व रुखवतात सजवून मांडलाही जातो. सात पावले चालण्याचे रूपक घेऊन या गद्य वा काव्याचा उपदेशपर भाग सात परिच्छेदात वा सात कडव्यांत मांडला जातो. म्हणून त्यालाही नाव सप्तपदी!
आईने लिहिलेल्या काही सप्तपदी !
सप्तपदी १
पाऊल टाक पहिले । कौमार्य सोडी काठ ॥
संसार सागरी या । पद संथ संथ टाक ॥१॥
पाऊल टाक दुसरे । अजमाव खोली त्याची ॥
सासू श्वसूर सगळे । जिंकी मने तयांची ॥२॥
पाऊल टाक तिसरे । वेंचून घेइ मोती ॥
नणंदा नि दीर जावा । सद्गुण त्यांत दिसती ॥३॥
पाऊल टाक चवथे । वाटेल खोल खोल ॥
पति संगती असेल । जाऊ न देइ तोल ॥४॥
पाऊल पाचवे हे । निश्चीत टाकशील ॥
खोली ही सागराची । कळली तुला असेल ॥५॥
पाऊल हे सहावे । जवळी दिसे किनारा ॥
सुखदुःख सर्व लाटा । सोसूनियाहि मारा ॥६॥
पाऊल सातवे तू । टाकून गाठी तीर ॥
जैसे क्षिरी मिसळले । न्यारे न होइ नीर ॥७॥
- मंगला द. मुंडले
सप्तपदी २
पाऊल टाक पहिले । बाणून अंगि त्याग ॥
चेहेर्यावरी कधीही । दावू नकोस राग ॥१॥
पाऊल टाक दुसरे । होऊन स्वाभिमानी ॥
कुलधर्म सासरीचा । घे सर्व तू शिकोनी ॥२॥
पाऊल टाक तिसरे । वागून विनयशील ॥
सासू श्वशूर सगळे । बघ कौतुकच करतील ॥३॥
पाऊल टाक चवथे । करी कंकणे ही सेवा ॥
दुबळ्या दीनास नित्य । आधार तव असावा ॥४॥
पाऊल पाचवे हे । चारित्र्य शुभ्र वस्त्र ॥
लौकिक वाढवाया । नाही दुजा ग मंत्र ॥५॥
पाऊल हे सहावे । तडजोडिचे असावे ॥
दोन्ही मनामनांचे । एकत्व हे दिसावे ॥६॥
पद सातव्यास टाकी । घे वृत्ती समाधानी ॥
संसारवृक्ष तव गे । येईल बघ फुलोनी ॥७॥
देत तुला मी या मंत्राला । सप्तपदी नित जीवनी चाला ॥
उणे न काही कधी तुम्हाला । अनुभव याचा असे अम्हाला ॥८॥
- मंगला द. मुंडले
संसार मंदिर
सासरि जेव्हा पडेल कन्ये पहिले पाऊल । लागू दे सार्यांना तेव्हा लक्ष्मीची चाहूल ॥१॥
रुसवा फुगवा भातुकलीचा खेळ इथे विसर । पती संगती चालून जिंकी हा जीवनसंगर ॥२॥
त्यासाठी संगतीस ठेवी गोड बोलिचा घडा । करू नको तो कधीही रिता वाजविण्या तडतडा ॥३॥
श्वशुरगृही तव जाणे नसते एकट्या पतीसाठी । प्रौढ जे कुणी असतिल त्यांची असशी तू काठी ॥४॥
तन-मन-धन वापरून मंदिर-पाया करि बळकट । संसाराचे मंदिर त्यावर कर्तृत्वाचा घुमट ॥५॥
सौजन्याची वरी पताका शोभतसे भगवी । आपुलकीच्या वार्याने ती सदा डुलत रहावी ॥६॥
जुने नवे आचार विचार भिंतीवरि चित्रे छान । अशा मंदिरी तुमच्या मूर्ती व्हाव्या विराजमान ॥७॥
वर म्हटल्याप्रमाणे सामान्यतः ही सप्तपदी आई किंवा माहेरची वडीलधारी स्त्रीने नववधूला केलेला उपदेश असतो. पण सासूही नववधूला उपदेश करते आहे अशी कल्पना करून आईने एक सप्तपदी लिहिली आहे. ती अशी –
सप्तपदी ३ सासूचे सांगणे
पाऊल टाक पहिले । गृहलक्ष्मी होऊनीया ॥
स्वगृही प्रवेशताना । मापास उलटुनीया ॥१॥
पाऊल टाक पुढचे । करुनी मनी विचार ॥
कुलधर्म चालवाया । घेई नवा आचार ॥२॥
पाऊल टाक तिसरे । पतिसंगती तू चाल ॥
असता समीप दोघे । वाढे तुझेही मोल ॥३॥
पाऊल टाक चवथे । पतिपाउलावरी या ॥
त्या संगती फिरूनी । घे सर्व पाहुनीया ॥४॥
पाऊल पाचवे हे । हासून टाकशील ॥
सासू श्वशूर बघुनी । संतोष पावतील ॥५॥
सहाव्या पदास टाकी । बोलून गोड गोड ॥
तुजला उणे न काही । पुरतील सर्व कोड ॥६॥
पद टाक सातवे तू । प्रौढत्व पांघरुनिया ॥
कुणी घालताच साद । हो सिद्ध हाक द्याया ॥७॥
गतजन्मिची मी आई । नाही तुझी ग सासू ॥
अपुल्या घरास येशी । नयनात का ग आसू ॥८॥
येताच तू घराला । तुज चालवीन हाती ॥
जाईल गे दुरावा । अपुली मनेही जुळती ॥९॥
- मंगला द. मुंडले
Hits: 55
सप्तपदी …अप्रतिम.