प्राणिगीते – १
आईला असल्या गीतांची स्फूर्ती तिला बहुतेक मंगेश पाडगावकरांच्या वात्रटिकांवरून मिळाली असावी. पाडगावकरांच्या काही वात्रटिका लिमेरिकच्या धर्तीवर प्रौढांसाठी असल्या तरी बर्याच काही निर्मळ विनोदीही होत्या. त्यातली एक मला आठवते ती अशी –
एक होता हत्ती । सांगू बारीक किती ॥ त्याला आई म्हणायची । आलास कारे अगरबत्ती ॥
आईने तिच्या स्वभावाला अनुसरून मुलांना म्हणून दाखवता येतील, किंवा वाचता येतील अशी शंभरहून अधिक गंमतशीर प्राणिगीते लिहिली. त्यातील काही इथे दिली आहेत. नुकतेच वाचू लागलेल्या मुलांसाठी हा संग्रह उपयुक्त ठरेल. लिखाणाच्या जोडीला या प्राण्यांची कवितेतील चित्रविचित्र कृती करणारी चित्रे असतील तर मुलांना ते निश्चितच आवडेल. अशी चित्रे बनवणे हा मोठाच प्रकल्प होईल.
माझ्या मुलांचे भाषिक पोषण अशा प्रयत्नांनीच झाले, तसे इतर मुलांचेही व्हावे, त्यांचा शब्दसंग्रह, आणि कवि-कल्पनाशक्तीही वाढावी यासाठी हा प्रयत्न. या यादीतील कित्येक प्राण्यांची नावे मला परिचित नाहीत. काही पालकांनाही परिचित नसण्याची शक्यता आहे. त्यांची माहिती आणि चित्रे मिळवणे हाही एक प्रकल्प होईल.
ही प्राणिगीते साधारण दोन प्रकारची आहेत – काही पाडगावकरांच्या हत्ती या वात्रटिकेसारखी निव्वळ गंमतशीर, तर काही माहितीपर. गंमतशीर गीते बहुसंख्य आहेत. पण अल्पसंख्य अशा माहितीपर गीतांनाही वेगळे शिक्षणमूल्य आहे.
माहितीपर प्राणिगीते
ऊ
एक होती ऊ । तिनं केलं हूं ॥ तिचा ऐकून हुंकार । माणूस झाला बेजार ॥
करकोचा
एक होता करकोचा । त्याचा धंदा सच्चा ॥ नदीकाठी उभी स्वारी । दिसला मासा गट्ट करी ॥
कसर
एक होती कसर । तिने आणलं टसर । टसर आणलं फुकटात । म्हणून लपली कपाटात ॥
कांगारू
एक होतं कांगारू । म्हणे “मी आता काय करू” ॥ त्याला म्हणाली म्हैस । बाळाला मांडीवर घेउन बैस ॥
गाय
एक होती गाय । तिनं केलं काय॥ बाळाला नाही आई । मग ही झाली दाई ॥
चोपय
एक होती चोपय । तिच्यावर पडला पाय ॥ पायाखाली दबून गेली । तिची पाठ चपटी झाली ॥
झुरळ
एक होतं झुरळ । त्याच्या मिशा कुरळ ॥ मिशांची लाज वाटली । स्वारी गटारात लपली ॥
झेब्रा
एक होता झेब्रा । त्याने आणला सदरा ॥ त्याचे कापड ढवळे । त्यावर पट्टे काळे ॥
टोका
एक होता टोका । त्याने आणला खोका ॥ खोका ठेवला जपून । बरा बसाया लपून ॥
नंदीबैल
एक होता नंदीबैल । चालत जायचा मैलोमैल ॥ चालता चालता दमला । शंकराच्या देवळात बसला ॥
पाणबुड्या
एक पक्षी पाणबुड्या । नदी तळ्यात मारतो उड्या ॥ अर्धे मिनिट पाण्यात शिरतो । मासे टिपून वर येतो ॥
पेंग्विन
एक होता पेंग्विन । म्हणाला घेइन कोट शिवून ॥ शिंप्याने दिला शिवून कोट । काळी पाठ पांढरे पोट ॥
भुंगा
एक होता भुंगा । तो भारी दांडगा ॥ एक दिवस कमळाने । दाखवला त्याला इंगा ॥
मगर
पाहिली का तुम्ही मगर । तोंड उघडते पाण्याच्यावर ॥
पक्षी शिरतात उघड्या तोंडात । दात साफ करून जातात ॥
मुंगी
एक होती मुंगी । तिला आली गुंगी ॥ हिची गुंगी उतराया । साखर लागे पेराया ॥
लाळ्या
एक होता लाळ्या । त्याला दिसल्या गोळ्या ॥ तोंडाला पाणी सुटलं । सर्वांगातून वाहू लागलं ॥
साळिंदर
एक होता साळिंदर । तो मोठा बिलंदर ॥ नेम धरून मारायचा । शत्रूचा काटा काढायचा ॥
- मंगला द. मुंडले
Hits: 32
Lahanpan Dega Deva…
Sangrah aavadala.
धन्यवाद सुहास