अंकगीते
आकडे एक ते दहा (१)
एक दोन एक दोन । बाबांचा आला सईला फोन ॥
तीन चार तीन चार । म्हणती खेळू नकोस फार ॥
पाच सहा पाच सहा । रडू नकोस हसत रहा ॥
सात आठ सात आठ । नवा धडा झाला का पाठ ॥
नऊ दहा नऊ दहा । आणिन खाऊ म्हणति पहा ॥
- मंगला द. मुंडले
आकडे एक ते दहा (२)
एक दोन एक दोन । अंकलिपी द्या आणून ॥
तीन चार तीन चार । पाटीवर मग लिहिणार ॥
पाच सहा पाच सहा । लिहून झाला धडा पहा ॥
सात आठ सात आठ । करीन मग तोंडपाठ ॥
नऊ दहा नऊ दहा । सगळे धडे शिकतो पहा ॥
- मंगला द. मुंडले
आकडे एक ते दहा (३)
एक दोन एक दोन । सरस्वतीचे करु पूजन ॥१॥
तीन चार तीन चार । आपण घालू तिजला हार ॥२॥
पाच सहा पाच सहा । तिजपाशी मागू वर हा ॥३॥
सात आठ सात आठ । धडा करूया रोज पाठ ॥४॥
नऊ दहा नऊ दहा । अर्पू देशा प्राण हा ॥५॥
- मंगला द. मुंडले
आकडे एक ते दहा (४)
एकी एकी एक । इकडे येरे विवेक ॥
एकी दुर्की दोन । हातपाय घेई धुवून ॥
एकी तिर्की तीन । बैस मांडी घालून ॥
एकी चौकी चार । अभ्यास आता करणार ॥
एकी पाची पाच । पुस्तक घेउन वाच ॥
एकी साही सहा । नवा धडा वाचून पाहा ॥
एकी साती सात । आता झाली रात ॥
एकी आठी आठ । म्हणा उजळणी पाठ ॥
एकी नव्वे नऊ । एवढे तरी करून घेऊ ॥
एकी दाही दहा । विवेकचा पहिला धडा हा ॥
- मंगला द. मुंडले
आकड़े एक ते दहा (५)
या गीतात एक ते दहा आकडे सांगताना महापुरुषांची नावे त्यांच्या आईच्या नावासोबत गुंफली आहेत.
एकी एकी एक । कोण कुणाचे लेक ॥१॥
एकी दुरकी दोन । पुतळाबाइचे मोहन ॥२॥
एके तिरकी तीन । सरोजिनीचे बिपीन ॥३॥ (बिपीन = बिपीनचंद्र पाल)
एकी चौकी चार । स्वरुपाराणीचे जवाहर ॥४॥
एकी पाची पाच । जिजाचे शिवाजी महाराज ॥५॥
एकी साही सहा । देवकीचा कृष्ण हा ॥६॥
एकी साती सात । पार्वतीचा बळवंत ॥७॥ (बळवंत = लोकमान्य टिळक)
एकी आठी आठ । नाती करा पाठ ॥८॥
एकी नव्वे नऊ । आपण सारे बहीण भाऊ ॥९॥
एकी दाही दहा । पाढा झाला पाहा ॥१०॥
- मंगला द. मुंडले
चिमण्यांची वजाबाकी
दहा बाई चिमण्या चिऊ चिऊ । एक गेली उडून उरल्या नऊ ॥
नउ चिमण्यांचा चिवचिवाट । एक गेली उडून उरल्या आठ ॥
आठ चिमण्यांची चिवचिव घरात । एक गेली उडून उरल्या सात ॥
सात चिमण्यांचा वावर पहा । एक गेली उडून उरल्या सहा ॥
सहा चिमण्यांचा चाललाय नाच । एक गेली उडून उरल्या पाच ॥
पाच चिमण्यांची चिव चिव फार । एक गेली उडून उरल्या चार ॥
चार चिमण्यांची चिव चिव छान । एक गेली उडून उरल्या तीन ॥
तीन चिमण्यांतिल चिवचिवते कोण । एक गेली उडून उरल्या दोन ॥
दोनच चिमण्या चिवचिव कितीक । एक गेली उडून उरली एक ॥
एकच चिमणी चिवचिव करते । ती गेली उडून की शून्यच उरते ॥
मंगला द. मुंडले
वन टू वन टू
वन टू वन टू । ट्रिप काढूया छोटू ॥
थ्री फोर थ्री फोर । रानी पाहू बगळा मोर ॥
फाइव सिक्स फाइव सिक्स । भेळपुरी हवी मिक्स ॥
सेवन एट सेवन एट । बरोबर घेऊ क्रिकेट सेट ॥
नाइन टेन नाइन टेन । उद्याच गाठू पहिली ट्रेन ॥
- मंगला द. मुंडले
Hits: 28
लेख अप्रतिम आणि मंगला ताईंची बालगीत मस्त!!!!!