गंधे सरांना श्रद्धांजली
मामगं, अर्थात् मार्तंड मल्हार गंधे ऊर्फ गंधे सर यांचे १९ एप्रिल २०२१ रोजी वयाच्या ९५व्या वर्षी वृद्धापकाळाने ठाणे येथे निधन झाले. पार्ले टिळक विद्यालयात १९५४ – १९८४ या काळात ते शिक्षक होते. पेठे बाईंच्या आठवणीनुसार त्यांनी प्रामुख्याने मराठी आणि भूगोल हे विषय शिकवले. तसेच ते स्कॉलरशिपच्या वर्गालाही शिकवीत होते, आणि भूगोल हा त्यांच्या विशेष आवडीचा विषय होता.
गंधे सरांबाबतच्या माझ्या दोन आठवणी आहेत. त्या लक्षात राहिल्या कारण दोन्ही मला प्रोत्साहक होत्या. पहिली भूगोलविषयक. एखाद्या हरित परिसराचे वाळवंट कसे होते या प्रश्नाचे मी वर्गात दिलेले उत्तर, विशेषतः त्यातले नेमकेपण त्यांना फारच भावले होते. तसे ते व्यक्त करून त्यांनी लगेच दादही दिली होती. अर्थात नेटके व नेमके निवेदन ही त्यांची स्वतःचीच खासियत होती. आणि निर्मळ दाद देणे हाही त्यांचा स्वभावच होता. पण नेमक्या आणि नेटक्या संवादकाकडूनच निर्भेळ दाद मिळण्याने माझा आत्मविश्वास दुणावला होता. आजही मी सरांचा हा आशिर्वाद जपायचा प्रयत्न करीत असतो.
शाळेचे पहिले छापील मासिक काढताना विद्यार्थी संपादकांपैकी कार्यरत असणारा मी एकटाच होतो. घाटकोपरला “धी रविउदय विजय फोटो-लिथो ऑफसेट वर्क्स” अशा अगडबंब नावाच्या छापखान्यात जाऊन मी प्रुफे तपासत असे. त्यावेळी नुकतेच शुद्धलेखनाचे नियम बदलले होते. पाटणकर बाईंच्या “कांहीं, नाहीं, शारीरिक” असल्या शुद्धलेखन-पठडीत घडलेल्या आमच्या पिढीला हे बदललेले नियम शिकणे भाग होते. बदललेल्या नियमांचे पुस्तक मिळवून चाललेल्या माझ्या मुद्रितशोधन व संपादनालाही गंधे सरांनी दाद दिली होती.
आमचे, नव्हे माझे दुर्दैव हे की गंधे सर मला केवळ चांगले शिक्षक म्हणूनच परिचित होते. त्यांच्या निधनानंतर सरांच्या निवडक कविता व्हॉट्सॅपवर माझ्यापर्यंत पोचल्या, आणि हळहळ लागली. त्या कवितांमधून दिसणारे संवेदनशील, विचारशील आणि मिश्कील गंधे सर हे कुमारवयात माझ्या लक्षात न येणे हे कदाचित माफ झाले असते. पण आम्ही जाणते झाल्यावरही गंधे सर पारल्यात होतेच की? “ये एकदा गप्पा मारायला” हे त्यांचे निमंत्रण मी एकदाच स्वीकारले, याचा आता खेद होतो. त्यांच्याकडून शालेय शिक्षणाखेरीज बरेच काही घेण्यासारखे होते, पण ते राहून गेले याची बोच आता लागत राहाणार.
गंधे सरांच्या आत्म्याला सद्गती लाभो अशी प्रार्थना करतानाच त्यांच्या तीन कविता इथे नोंदवतोय. सरांच्या अंतर्यामाचे दर्शन घडवणार्या या कविता निवडून उपलब्ध करून दिल्याबद्दल कल्पना गंधे यांचे, तसेच त्या व्हॉट्सॅप वर टाकल्याबद्दल पेठे बाईंचे, आणि माझ्यापर्यंत पोचवणार्या रत्नप्रभा जोशी – मायदेव – श्रीकांत लिमये या दुव्यांचेही आभार!
विश्वास द. मुंडले
तीन कविता गंधे सरांच्या
फाटका सदरा
धोंडू बसला नीटनेटका, अंगी सदरा एक ।
रंग तयाचा सांगत होता “की हा होता श्वेत” ॥
खोवुन त्याला विजारीत, जी होती विटकी तंग ।
झाकित होती कसेबसे तरि त्या गरिबाचे अंग ॥
चेहेर्यावरचा भाव तयाचा लपवित होता काही ।
काहुरले मन – कातर डोळे – केवळ पुढती पाही ॥
पाठ तयाची सोडित नव्हती टेकण बाकाची ।
जणू तयांची मैत्री होती साताजन्मांची ॥
विरली हजरी, “पाठ आपुले वाचा” शिक्षक वदले ।
तोच पारवे घुमू लागले वर्गांमधले सगळे ! ॥
कळी उमलली धोंडूची अन कुजबुजला तो काही ।
क्षणांत गप्पांमाजि रंगला मुलांसंगती तोही ॥
गप्पानंदी टाळि लागली! भुलला, अपुली ऐट (?)।
चाखित होता अविट माधुरी त्यातिल, वळवुनि पाठ ॥
-परंतु झटकन वळला – त्याते स्मरण जाहले काही ।
ढगाळला मुखचंद्र तयाचा ! अन् तो खाली पाही ॥
दीन वदन ते सांगत होते – नव्हती भाषा पुरती – ।
सदरा माझा असे फाटका बराच पाठीवरती ॥
तीन मासे
एका वेळी, एका जाळी, चुकुन गुंतले मासे तीन ।
मुक्तीसाठी अविश्रांत ते, तडफडले … श्रांतले … विलीन ! ॥
सुरू जाहली अनंत यात्रा, सोबत-संगत फक्त तिघांची ।
भिन्न गुणांचे तरी वाटले, उघड करावी व्यथा मनीची ॥
एक वदे, “किति आकस्मिक हे मरण ! निराश्रित सखी मुले मम ।
अनेक माझ्या अपुर्या इच्छा, त्यांच्यास्तव मी पुनरपि जन्मिन” ॥
दुजा जळत क्रोधाग्नित म्हणतो – “का न धरू मी आस सुडाची ।
धीवर वैरी आम्हा कुळांचे, जन्मुन मोडिन खोड तयांची” ॥
तिसरा होता शांत, म्हणे तो – “नको जन्म मरणाच्या व्याधी ।
अन्न कुणा क्षुधिताचे होउन विराजीन मी पूर्णब्रम्हपदि” ॥
दात आणि पैसा
दारिद्र्य गातसे करकरती अंगाई ।
टळली न कधी भू-अंकावरली गाई ॥
दवडिल्या कितीतरि थरथरत्या हिंवराती ।
अन ऊन दिसाचे सदाच माथ्यावरती ॥
श्रम दिवसभराचे करुनी अंति उसासा ।
लाभला मारण्या ना दातावर पैसा ॥
उजळले भाग्य, ये विद्या, धन त्यापाठी ।
चाळिशी हळुहळू अन हो बुद्धी नाठी ॥
तोषले श्रवण ऐकून ध्वनी रुपयांचा ।
जणु नाद रमेच्या पायातिल नुपुरांचा ॥
पण सचिंत मानस सोडी एक उसासा ।
राहिला दात ना अता मारण्या पैसा ॥
मा. म. गंधे
Hits: 171
अप्रतिम पोस्ट.
धन्यवाद कल्याण.
उत्तम, हळवी पोस्ट.
आपल्याला घडवणाऱ्या शिक्षक वर्गाचं मूल्य उशीराच लक्षात येतं. त्यात बऱ्याचदा शाळा कॉलेजात असताना आपल्या शिक्षकांबद्दल आवडी निवडी खूप स्ट्राँग असतात. जीव लावणारे, ओतून देऊन शिकवणारे शिक्षक आयुष्यभर आठवतात.
त्यांच्या बद्दल कृतज्ञता बाळगण आणि झेंडा पुढे नेत राहणं हे आपण करत राहू शकतो. तुमच्या परीने तुम्ही हे उत्तम करत आहात. धन्यवाद.
धन्यवाद कुळकर्णी. गंधे सरांचा चांगले शिक्षक म्हणून परिचय होताच.
सल हा की ते संवेदनशील, विचारशील आणि मिश्कील कवी ही होते हे फारच उशिरा कळले.
गंधे सरांच्या कविता फारच अप्रतिम आहेत काका
सरांचा हा पैलू मलाच नव्हे तर बर्यच जणांना माहित नव्हता.
गंधे सरांवरील लेख वाचून एकदम परत शाळेत गेल्यासारखे वाटले. सर आम्हाला पण भूगोल शिकवायचे.
वरील लेखाने परत शाळेतल्या आठवणी जाग्या झाल्या.
विश्वास असाच अधूनमधून शाळेच्या आठवणी काढून परत सर्वांना लहान बनवत जा.
गंधे सरां वर लिहिलेला लेख मनाला भावला . त्यांच्या आत्म्यांला सद्गती लाभो.
मी स्वाती कोरान्ने, गंधे सरांची मुलगी.
श्री.. विश्वास मुंडले यांनी बाबांना वाहिलेली श्रद्धांजली , सांगितलेल्या आठवणी मनाला खूपच भावल्या.
तुम्ही त्यांचे खूप आवडते विद्यार्थी होता हे मलाही माहित आहे.
अशा लाडक्या विद्यार्थांना भेटल्यावर त्यांना मनापासून आनंद होत असे.
वयोमानानुसार झालेली घटना दुःखदायक आहेच, पण हे ही खरय की ते खूप आनंदात, उत्साहात आणी सकारात्मक जगले.
पुन्हा एकदा श्री. विश्वास मुंडले यांचे मनापासून आभार.