पावसाची गाणी
पाऊस -१
देवाच्या बाळाचा वाढदिवस होता । खूप खूप खाऊ करायचा होता ॥१॥
बरीच येणार होती पाहुणी । म्हणून खूप भरलं पाणी ॥२॥
हांडे कळशा मातीचे रांजण । पातेल्या वाट्या डबे अन् झाकणं ॥३॥
बाळाचे मित्र जमा झाले । आंधळी कोशिंबीर खेळू लागले ॥४॥
खेळता खेळता झालं काय । भरल्या भांड्यांना लागला पाय ॥५॥
पाणी लागलं सांडायला । पाऊस लागला पडायला ॥६॥
- मंगला द. मुंडले (२८/७/१९६९)
पाऊस – २
सागरात होतं खूप खूप पाणी । गरम झालं उन्हाने ॥१॥
तापून त्याची झाली वाफ । आकाशात गेली आपोआप ॥२॥
त्याचा झाला निळा काळा रंग । आपण त्याला म्हणतो ढग ॥३॥
फुग्यात जशी असते हवा । तसा ढगात पाण्याचा ठेवा ॥४॥
आकाशात होते ढगांची दाटी । पळतात पुढे जाण्यासाठी ॥५॥
पळता पळता होते टक्कर । ढग फुटतात भराभर ॥६॥
त्यातून थेंब ओघळतात । त्यालाच पाऊस म्हणतात ॥७॥
- मंगला द. मुंडले (२८/७/१९६९)
पावसा पावसा
पावसा पावसा । सांग मला असा । आभाळातून खाली । येतोस कसा ॥१॥
आहे कारे तुझी । छोटी छोटी माडी । तेथूनच मारतोस का । एकदम उडी ॥२॥
घड घड वाजते ती । तुझी कारे गाडी । कशी आहे सांग त्याला । बैलांची जोडी ॥३॥
चमचम करतं । ते तुझं कारे विमान । तेच फक्त आहे । खरं वेगवान ॥४॥
सांगू नको पावसा । सारं सारं कळलं । ढगांच्या पॅराशूटने । आकाशच भरलं ॥५॥
वाटेल तेव्हा येतोस । अन् करतोस खोड्या । मारते कारे आई । मग विजेच्या छड्या ॥६॥
- मंगला द. मुंडले (३०/३/१९७०)
पावसाच्या सरी
(चाल पारंपरिक)
येग येग सरी । खेळू आम्ही बाहेरी ॥
येई तू ग धावून । आम्ही जाऊ भिजून ॥
पाणी लागेल साचू । त्यात आम्ही नाचू ॥
पाणी लागेल वाढू । त्यात नावा सोडू ॥
नकोत मोठ्या सरी । आई बोलविल माघारी ॥
- मंगला द. मुंडले (१५/७/१९८२)
Hits: 44
पावसाच्या कविता खूपच छान !
धन्यवाद गौरी. आणखी बर्याच कविता टाकणार आहे.