रॉबर्ट आणि ॲण्टिस
१५ मार्च १९३९, म्हणजे दुसरे महायुद्ध सुरू होण्याच्या सहा महिने आधीच, जर्मन फौजांनी चेकोस्लोवाकिया बळकावला. अनेक चेक नागरिक देशोधडीला लागले. त्यापैकीच एक होता वाका रॉबर्ट बॉझडॅक हा वैमानिक. तो पळून गेला फ्रान्सला.
सप्टेंबर १९३९ला दुसरे महायुद्ध सुरू झाले. रॉबर्टकडे फ्रान्स-जर्मनी सीमेवरील टेहेळणीचे काम आले. जानेवारी १९४० मध्ये एका मोहिमेत विमानविरोधी तोफांनी जायबंदी झालेले त्याचे विमान सीमेवरील निर्मनुष्य भागाजवळ पडले. सुदैवाने त्याला फारशी इजा झाली नव्हती. तो बर्फातून खुरडत जवळच्या ओस पडलेल्या शेतघरात पोचला. तिथे त्याला एक थंडीने गारठलेले, उपाशी जर्मन शेफर्ड कुत्र्याचे पिलू सापडले. त्याही अवस्थेत रॉबर्ट समोर आल्याआल्या हे पिलू उभे राहून, मान फुलवून, रॉबर्टवर गुरगुरू लागले. रॉबर्ट या धाडसी पिलाच्या प्रेमातच पडला.
त्याने त्याला आपल्या जवळचे चॉकलेट खाऊ घातले. बर्फ वितळवून पाणी पाजले. आणि आपल्या कोटाच्या उबेत ठेवून त्याला आपल्या तळावर आणले. रॉबर्टचे मित्रही या पिलाच्या प्रेमात पडले. “जर्मन” शेफर्ड असला तरी फ्रान्समध्ये सापडला. म्हणून तो आपलाच आहे असे रॉबर्ट आणि त्याच्या मित्रांनी ठरवले. हे चेक वैमानिक रशियन बनावटीच्या ॲण्ट बॉम्बरचे चाहाते होते. म्हणून त्यांनी पिलाचे नाव ठेवले ॲण्टिस. पुढची १३ वर्षे रॉबर्ट जिथेजिथे गेला तिथे या ॲण्टिसने निष्ठेने सोबत केली. कुठेही गेल्यावर रॉबर्टही ॲण्टिसची व्यवस्था सदैव आपल्या सोबतच करीत असे. अगदी त्याचा पलंगही नेहेमीच रॉबर्टच्या पलंगाशेजारी असे.
हा श्वानवीर युद्धात दोनदा जखमी झाला. शिवाय त्याला एकदा गोळी लागली, एकदा कुंपणाने भोसकला गेला, एकदा थंडीत गोठून मरणाच्या दारी जाऊन आला, एकदा गाडला गेला. या सगळ्यातून तो स्वतः तर वाचलाच. पण त्याखेरीज युद्धकाळात शेकडो जीव वाचवण्याची लक्षणीय कामगिरी बजावली. ब्रिटनने प्राण्यांना मिळणारे व्हिक्टोरिया क्रॉस दर्जाचे डिकिन्स पदक, आणि युद्धवीर (War Hero) हा दर्जा ॲण्टिसला दिला. रॉबर्ट व ॲण्टिसच्या या कथेवर डेमियन लुईस व हॅमिश रॉस या लेखकांनी इंग्रजीत पुस्तके लिहिली आहेत. या कुत्र्याच्या युद्धकालीन आणि युद्धोत्तर कामगिरीची ही चित्तथरारक कथा.
ॲण्टिस नेहेमी रॉबर्टसोबत वावरत असे. त्याचे एक उपयुक्त कसब १० मे १९४० या दिवशी दिसू लागले. रॉबर्ट आणि मित्र फुटबॉल खेळत होते. सोबत हा कुत्राही बागडत होता. एकाएकी ॲण्टिस ताठ उभा राहून एका विशिष्ट दिशेने क्षितिजाकडे पाहात गुरगुरू लागला. पवित्रा अगदी रॉबर्ट आणि ॲण्टिसच्या पहिल्या भेटीच्या वेळी होता, तसाच ! थोड्याच वेळात सायरन वाजू लागले. पाठोपाठ ॲण्टिसने दाखवलेल्या दिशेकडून विमाने आली. जर्मनीच्या फ्रान्सवरील विमानहल्ल्याची सुरुवात झाली होती. यथावकाश, हवाई हल्ला आणि त्याची दिशा आगाऊ ओळखण्याचे ॲण्टिसचे हे कसब सर्वांच्या उपयोगी पडू लागले. अशा रीतीने मे १९४० मध्ये ॲण्टिस स्क्वॉड्रन ३११ मध्ये अधिकृतपणे सामील झाला. विमानांची आगाऊ (कधी कधी तर रडारच्याही आधी) सूचना देणार्या ॲण्टिसने भविष्यातील युद्धकाळात शेकडो लोकांचे प्राण वाचवले.
इतकेच नव्हे तर तो स्क्वॉड्रन ३११चे प्रतीक (mascot) बनला. स्क्वॉड्रनच्या तळावर त्याला मुक्तद्वार मिळाले. विमाने येतजात असताना धावपट्टी ओलांडू नये, किंवा विमानाची इंजिने सुरू असताना जवळ जाऊ नये म्हणून ॲण्टिसला प्रशिक्षण देण्यात आले. स्क्वॉड्रनचे प्रतीक असला तरी ॲण्टिस रॉबर्टची पाठ कधीही सोडत नसे. टेहेळणी विमानातही साथीला ॲण्टिस असे. सामान्यपणे कुत्रे हे मोठ्या आवाजांना घाबरतात. पण विमान चालू करताना एकाएकी सुरू होणारा चढत जाणारा आवाज, इंजिनांची घरघर, बॉम्बस्फोटाचे, तोफांचे आवाज याकडे दुर्लक्ष करून आकाशात वेड्यावाकड्या दिशेने उडणार्या, सूर मारणार्या विमानात ॲण्टिस चक्क झोपी जात असे. ॲण्टिसच्या आगमनानंतर स्क्वॉड्रन ३११ चे एकही विमान पडले नाही. या चेक वैमानिकांची अशी ठाम समजूत होती की ॲण्टिसमुळेच आपले नशीब फळफळले आहे.
जर्मनांनी फ्रान्स काबीज करायला सुरुवात केली आणि जर्मन हल्ल्यात रॉबर्टच्या दलाची सर्व विमाने नष्ट झाली. सर्व चेक वैमानिक (ॲण्टिसला घेऊन) मार्सेलिस मार्गे जिब्राल्टरला व तिथून इंग्लंडला जायला दक्षिणेकडे निघाले. मार्सेलिसला पोचायला त्यांना महिना लागला. एक वेळ अशी आली की पळून जाणारे इतर फ्रेंच नागरिक ॲण्टिसला सोडून द्यावे वा मारावे असे सुचवू लागले. तेव्हा या चेक वैमानिकांनी ॲण्टिसला आळीपाळीने उचलून घेतले, पण त्याला अंतर दिले नाही. त्यांना ॲण्टिस जवळ असण्याचा फायदा कळला होता.
जिब्राल्टरला ब्रिटीश बोटीत ॲण्टिसला प्रवेश मिळेना. तेव्हा स्क्वॉड्रन ३११च्या वैमानिकांनी ॲण्टिसला धक्क्यावर ठेवले आणि ते बोटीवर चढले. बोटीच्या शिड्या काढल्यावर रॉबर्टने खालच्या सामान ठेवण्याच्या डेकवरून शिटी मारून ॲण्टिसला बोलावून घेतले. हा पठ्ठ्या १०० यार्ड पोहून बोटीवर पोचला. प्रवासात सगळा वेळ रॉबर्ट व ॲण्टिस हे खालच्या डेकवरच लपून राहिले.
इंग्लंडमध्ये कुठलेही प्राणी आणायला बंदी होती. अगदी पाळीव प्राणीही आणायचा तर त्याला विलगीकरणात ठेवावे लागे. विलगीकरणाचा खर्च मालकालाच भरावा लागे. आणि ते शक्य नसेल तर प्राणी ठार मारला जाई. परागंदा आणि निष्कलंक झालेल्या या वैमानिक मंडळींनी सामानात लपवून ॲण्टिसला इंग्लंडच्या किनार्यावर उतरवले, आणि बाहेर काढले. एकंदरीत हा पठ्ठ्या तग धरून राहाण्यात पटाईत होता. ते पुढेही अनेक प्रकारे दिसलेच!
स्क्वॉड्रन ३११ला त्याचा दुसरा एक गुण लवकरच कळणार होता. जून १९४० मध्ये, म्हणजे इंग्लंडला आल्याआल्याच, एका रात्री लिव्हरपूल शहरात फेरफटका मारायला हे दोघे बाहेर पडले. एकाएकी ॲण्टिसचे ते आकाशाच्या दिशेने पाहात, अंग फुलवून सूचक गुरगुरणे सुरू झाले. पाठोपाठ सायरन वाजला, विमानेही आली. लपायला कुठे जागा नव्हती. रॉबर्टने ॲण्टिसला कवटाळून जमिनीवर लोळण घेतली. आसपासच्या इमारतींवरच बॉम्ब पडले. बॉम्बहल्ला काही सेकंदातच थांबला. तीन इमारतींच्या पडक्या भिंतीच शिल्लक होत्या. त्याही मधेच कोसळत होत्या. ढिगार्याखाली अडकलेल्यांचा मदतीचा आक्रोश वाढत चालला होता.
धुळीने माखलेला ॲण्टिस तिथे धावला नि पाठोपाठ रॉबर्टही. त्याचे तीक्ष्ण कान ढिगार्याच्या खाली अडकलेल्यांच्या जागा बचावकार्यकर्त्यांना दाखवून देत होते. एका क्षणी तर ॲण्टिसच कोसळणार्या ढिगाखाली आला. त्याला बाहेर काढल्याकाढल्या त्याने पुन्हा शोधकार्य सुरू केले. ॲण्टिसने शेवटी एका अर्भकाला वाचवले तेव्हा उजाडू लागले होते. या सगळ्या कामगिरीत ॲण्टिसचे पंजे इतके दुखावले की त्याला शेवटी चालताच येईना. रॉबर्टला त्याला उचलून घ्यावे लागले.
पुढेपुढे, विमान-हल्ल्याची आगाऊ सूचना देऊन अधिकाधिक लोकांना निवार्यात/ भुयारात शिरायला संधी देऊन वाचवायचे, तसेच हल्ल्यानंतर ढिगार्याखाली अडकलेल्यांना वाचवायचे हा ॲण्टिसचा शिरस्ता झाला. एकदा तर स्क्वॉड्रनच्या तळावर झालेल्या बॉम्बहल्ल्यात ॲण्टिस ढिगार्यात काही दिवस गाडला गेला होता. पण त्यातूनही तो बचावला. आणि त्याच्या बचावमोहिमा त्याच जोमात सुरू राहिल्या. आता तो केवळ पाळीव प्राणी वा स्क्वॉड्रनचे प्रतीक राहिला नव्हता तर स्क्वॉड्रनमधला महत्वाचा जीवनरक्षक बनला होता.
फ्रान्समध्ये ॲण्टिस रॉबर्टसोबत सर्रास मोहिमांवर जात असे. पण इंग्लंडमध्ये नियमांच्या कडक अंमलबजावणीपोटी ते शक्य नव्हते. रॉबर्ट रात्रीच्या बॉम्बफेक मोहिमेवर निघाला की निराश झालेला ॲण्टिस रॉबर्टच्या विमानाला (C for Cecilia) ओळखे, धावपट्टीच्या बाजूबाजूने त्याला सोबत करी. त्या विमानाचा ठिपका क्षितिजावर दिसेनासा होईपर्यंत तीक्ष्ण नजरेने पाहात राही. आणि मग धावपट्टीच्या कडेला एका ठराविक जागी काहीही न खाता, न पिता, पडून राही.
फटफटल्यानंतर एका क्षणी ॲण्टिस जागा होई, आणि कान टवकारी. जणू काही त्याला आपल्याच तळावरील विमाने येताहेत याचा कानोसा लागायचा. पण त्या तुम्हा-आम्हाला ऐकू न येणार्या आवाजातूनही त्याचे कान काही विशिष्ट आवाज शोधत असावेत. कारण थोड्याच वेळात, एका विशिष्ट क्षणी, कान टवकारलेल्या ॲण्टिसचा मोहोरा पालटे. तो उठून, उड्या मारत, भुंकत बागडू लागे. इतक्या विमानांच्या आवाजातून रॉबर्टच्या विमानाचा आवाज त्याला ओळखू येत असावा. कारण ते विमान उतरले की त्याच्या उत्साहाला अंत नसे. विमान थांबण्याच्या ठिकाणी तो धाव घेई. शिकवल्याप्रमाणे वरची झडप उघडेपर्यंत थांबे. मग धावत जाऊन शिडीच्या तळाशी रॉबर्टच्या भेटीची वाट बघत उभा राही. आणि मग भरतभेट!
जून १९४१ मध्ये आक्रीत घडले. रॉबर्ट जर्मनीतील हॅम शहरातील रेल्वे यार्डावर बॉम्बफेक करण्याच्या मोहिमेवर गेला होता. धावपट्टीच्या कडेला रॉबर्टच्या विमानाची वाट बघत पहुडलेला ॲण्टिस रात्री एक वाजता एकाएकी थरथरत उठला व भयाण आणि करुण आवाजात रडू लागला. अनेकांना “रॉबर्टचे विमान संकटात सापडले की काय?” अशी शंका आली. तिकडे आग्नेय दिशेला २०० मैलांवर हवाई-लढाईत गुंतलेल्या रॉबर्टच्या विमानाच्या पायलटसमोरील खिडकीवर एक लोखंडी तुकडा धडकला होता. प्लास्टिक तावदानाच्या ठिकर्या उडाल्या आणि त्यातली एक रॉबर्टच्या कपाळात घुसली, तीही वेळ होती रात्रीच्या सुमारे एक वाजताची !
कपाळातून होणार्या रक्तस्रावाने काही दिसत नाहीये, विमान हळू हळू जमिनीच्या दिशेने चाललेय, अशा अवस्थेत रॉबर्टने आपले विमान कसेबसे इंग्लंडच्या किनार्यावरील कड्यांच्या पार नेले आणि नॉरफोक विमानतळावर उतरवले. तिकडून त्याची रवानगी थेट इस्पितळात झाली. बरे व्हायला कित्येक दिवस लागतील असा अंदाज होता. पण कुणाच्याही विनवणीने ॲण्टिस आपली जागा सोडायला तयार नव्हता. तो काही खातपीतही नव्हता. स्क्वॉड्रनमधील लोकांनी उघड्यावरच उपाशीपोटी झोपलेल्या ॲण्टिसच्या अंगावर ब्लॅंकेट पांघरले. “रॉबर्टच्या विरहाने हा उमदा जीव प्राण त्यागणार की काय?” अशी परिस्थिती आली. रॉबर्ट जिवंत आहे ही बातमी ॲण्टिसला कशी सांगायची?
दुसरीही रात्र संपली. पहाटेपहाटे एक मोटार ॲण्टिसजवळ आली. तिच्यातून चेहेरा आणि अंग बॅण्डेजमध्ये गुंडाळलेला रॉबर्ट उतरला. त्याने आपला चेहेरा पहुडलेल्या ॲण्टिसच्या तोंडापाशी नेला. बॅण्डेजच्या थरातून, आयोडिन व जंतुनाशकांच्या वासातून ॲण्टिसला रॉबर्ट आल्याचे कळले असावे. त्याने रॉबर्टचा चेहेरा चाटायला जीभ लांबवली. उभे राहायचा प्रयत्न केला. पण तो कोसळला. रॉबर्टने त्याला उचलून घेतले तेव्हा एक दिवस व दोन रात्री उलटून गेल्या होत्या. रॉबर्टच्या स्क्वॉड्रनच्या पाद्री महाशयांची विनंती नॉरफोकच्या इस्पितळाने मानली आणि ॲण्टिसचे प्राण वाचले.
रॉबर्ट बरा होऊन पुढच्या मोहिमेला सज्ज व्हायला जून अखेर उजाडली. ब्रेमेनच्या रिफायनरीवर बॉम्बफेकीसाठी विमाने सज्ज झाली. पण नेहेमीप्रमाणे आसपास बागडणारा ॲण्टिस कुठेच दिसेना. मागील दुर्धर अनुभवांती ॲण्टिसने सवयी बदलल्या की काय अशी रॉबर्टला शंका आली. उड्डाणाची वेळ आली, विमाने उडाली, आणि रॉबर्ट ॲण्टिसची काळजी विसरून पुढे वाढून ठेवलेल्या धोक्याचे चिंतन करू लागला. इतक्यात रॉबर्टच्या कोपराला स्पर्श झाला. सहवैमानिक काही सांगतोय की काय हे पाहाता पाहाता रॉबर्टला पायाजवळ ॲण्टिस दिसला. रॉबर्टने आपल्याला काही भास तर होत नाही ना याची खातरजमा केली. पण तो ॲण्टिसच होता. मोहिमेअगोदर प्रत्येक विमानाची आतून-बाहेरून तपासणी होत असताना कुणाच्याही नकळत ॲण्टिस विमानात कधी शिरला असावा? इतक्यात रॉबर्टच्या लक्षात आले की त्याला चांगलीच धाप लागली आहे. स्वाभाविक होते ते. विमान १६००० फुटांवरून उडत होते. रॉबर्ट पायलटला उपलब्ध असलेल्या बाटलीबंद प्राणवायूचा वापर करीत होता. पण ॲण्टिसचे काय? रॉबर्टने एक दीर्घ श्वास घेतला, आणि आपल्या तोंडावरील मास्क ॲण्टिसच्या नाकाला लावला. विमान उतरेपर्यंत अशी प्राणवायूची वाटणी चालली होती. उतरताना मात्र रॉबर्टला चिंता पडली होती ती आता पुढे काय वाढून ठेवले आहे याचीच. कारण ब्रिटीश हवाई वाहतूक नियमानुसार विमानातून ॲण्टिसचे उड्डाण हा सरळ सरळ नियमभंग होता.
“ॲण्टिस कालच्या रात्री कुठे होता ह्या प्रश्नाच्या उत्तराचा अंदाज आता सर्वांनाच आला आहे” विंग कमांडर कडाडले.
“सर, कृपया जरा माझं एका …” रॉबर्टची विनवणी.
विंग कमांडरने रॉबर्टला अर्ध्यावरच रोखले आणि म्हणाले, “त्यासाठी इंग्रजीत एक छान वचन आहे. What the eye does not see, the heart doesn’t grieve after.” (दृष्टीआडच्या सृष्टीसाठी कोणी होते का कष्टी?)
विंग कमांडर साहेबांनी खास ब्रिटिश सूचकपणे या अपराधाकडे काणाडोळा करत असल्याचे सांगितले. स्क्वॉड्रन ३११चे प्रतीक म्हणून ॲण्टिस टिकून राहिला. इतकेच नव्हे तर त्यानंतर युद्ध संपेपर्यंत तीसहून अधिक मोहिमांमध्ये रॉबर्टला ॲण्टिसची सोबत मिळाली. मॅनहाइमवरील बॉम्बहल्ल्यावर असताना तर तो श्रॅपनेलने जखमीही झाला. मग काही काळ त्याला एका आजीबरोबर राहाणार्या लहान मुलीचा रक्षक-सोबती म्हणून नेमण्यात आले.
युद्ध संपेपर्यंत अविरत कार्यरत राहिलेल्या ॲण्टिसने विविध प्रकारे अनेकांचे जीव वाचवले. स्क्वॉड्रनमध्ये त्याला आता युद्धवीराचा मान होता. १९४९ साली ब्रिटिश सरकारने त्याला अधिकृतपणे युद्धवीर घोषित केले व प्राण्यांचा व्हिक्टोरिया क्रॉस मानले गेलेले डिकिन पदक देऊन गौरवले.
तुम्हाला प्रश्न पडला असेल की युद्ध १९४५ मध्ये संपले असतानाही ॲण्टिसला डिकिन पदक मिळायला चार वर्षे कशी लागली? तर झाले असे की युद्ध संपल्याबरोबर रॉबर्ट (अर्थात ॲण्टिसला घेऊन) आपल्या मातृभूमीला, चेकोस्लोवाकियाला गेला. पण तिथे रशियनांच्या प्रभावाखाली इंग्लंड व फ्रान्सच्या बाजूने लढलेल्या चेक नागरिकांना त्रास द्यायला सुरुवात झाली. पुढे तर कम्युनिस्टांनी लोकशाहीवादी राजवट उलथून टाकली, तेव्हा रॉबर्टसारख्या चेक नागरिकांना पळून जाण्याला पर्याय राहिला नाही. १९४८ मधे ॲण्टिससह रॉबर्ट चेकोस्लोवाकियातून पळून गेला व चालत पश्चिम जर्मनीत दाखल झाला. या प्रवासातही रॉबर्ट आणि बरोबरीच्या चेक नागरिकांना पळून जायला ॲण्टिसने विविध प्रकारे मोलाची मदत केली, जसे की पोलिस ठाणी चुकवणे, नाकेबंदी टाळणे, पोलिसांचे लक्ष विचलित करून इतरांना निसटायला वाव देणे इ. रॉबर्ट पश्चिम जर्मनीमधून इंग्लंडला परतल्यावर ॲण्टिसच्या युद्धकाळातील कामगिरीला परत उजाळा मिळाला, आणि त्याला डिकिन पदकही मिळाले.
१९५३ मध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी या युद्धवीराचे देहावसान झाले. त्याच्या थडग्यावर चेक भाषेत लिहिले आहे, “Loyal unto death” (देहांतापर्यंत इमानी)
- विश्वास द. मुंडले
संदर्भ:
http://extravaganzafreetour.com/hitlers-invasion-of-czechoslovakia-15-march-1939/
http://www.dailymail.co.uk/news/article-2482520/So
https://en.wikipedia.org/wiki/Antis_(dog)
https://aviationoiloutlet.com/blog/antis-german-shepherd-dog-of-war/
Hits: 0
रॉबर्ट आणि अँटीस . Superb