आश्वासन व परिशीलन
शब्दकोशानुसार विहीण म्हणजे मुलाची वा मुलीची सासू. पण विहीण हा एक लग्नात जेवणाची पंगत बसल्यावर म्हणायचा पारंपरिक काव्यप्रकारही आहे.
“आमच्या मुलीचा सांभाळ करा” अशी वधूची आई वा वडील यांनी आपल्या विहिणीला –मुलीच्या सासूला- केलेली विनंती हा पहिला प्रकार. “ओटीत घातली मुलगी विहीणबाई, सांभाळ करावा हीच विनवणी पायी” या गदिमांच्या गीताने विहिणीचा हा प्रकार सर्वांना परिचित झाला आहे.
दुसरा प्रकार, जो आईने अगत्याने जोपासला, तो तितकासा प्रचलित नाही. त्यानुसार विहीण म्हणजे वधूपक्षाची पंगत बसल्यावर वराच्या आईने किंवा वरपक्षातील एखाद्या वडीलधार्या स्त्रीने विहिणीला (म्हणजेच वधूच्या आईला) उद्देशून म्हणायचे कवन. आणि या कवनातून नववधूच्या सासूने तिच्या माहेरच्या कुटुंबीयांना “आपण सुनेला चांगले वागवू” असे (सार्वजनिक रीत्या) आश्वासन द्यायचे.
आता तर लग्नात विहीण म्हणणे हा प्रकार लोप पावला आहे. तेव्हा या लेखाचा पहिला हेतू हा की वाचकांना या काव्यप्रकाराची आठवण करून द्यावी. वरपक्षाने म्हणायच्या विहिणीचा परिचय माडगूळकरांसारख्या सिद्धहस्ताने करून दिलाच आहे. पण वरपक्षाने म्हणायची विहीण ह्याही प्रकारच्या कवनाची नोंद व्हावी हा दुसरा हेतू.
१९६० च्या दशकाच्या सुरुवातीला आई कविता लिहू लागली. त्यानंतर विविध विवाहसमयी आईने वधूपक्षाच्या वतीने वा वरपक्षाच्या वतीने अनेक विहिणी रचल्या. या प्रकारच्या कवनात नातेवाइकांची नावे येणे स्वाभाविकच होय. आणि कुटुंबीयांखेरीज इतर वाचकांना त्या नावांत रस असणे शक्य नाही. तरीही आईने लिहिलेली दुसर्या प्रकारची, वरपक्षाने म्हटलेली एक विहीण उद्धृत करण्याचा मोह मला आवरत नाही. वाचकांच्या सोयीसाठी, कवनाचा अर्थापलाप होत नसेल तिथे नातेवाइकांचा नामोल्लेख असलेली कडवी मी गाळली आहेत. वरपक्षाने गायलेली विहीण हे वधूपक्षाला दिलेले आश्वासनच असते. म्हणूनच आईच्या या विहिणीचे शीर्षक होते “आश्वासन”.
आश्वासन
(चाल: रमला कुठे ग कान्हा)
तुम्ही नका करू मुळिं चिंता । मानीन तिजसी दुहिता ॥धृ॥
तुमच्या हो वृक्षाखाली । शशिप्रभा लता वाढली । आधारहि तुमचा सुटता । तुम्ही … ॥१॥
कौतुके घालिन खत । प्रेमाचे पाणी देत । बहरेल फळांनी आता । तुम्ही … ॥२॥
येता तिज तुमची याद । पाठीवर फिरविन हात । मी तिचीच होउन माता । तुम्ही … ॥३॥
शंकरासवे पार्वती । श्री गणेश सरस्वती । रामास शोभे सीता । तुम्ही … ॥५॥
सुशिक्षित सून माझी । पतिसह जनतेच्या काजी । कीर्तीची वाहिल सरिता । तुम्ही … ॥७॥
सून माझी ही एकुलती । तिजवरती अमाप प्रीती । मी तिचीहि होइन माता । तुम्ही … ॥८॥
मज नाही दुसरे कोणी । आधारा हिजवाचोनी । काठी ही माझ्या हाता । तुम्ही … ॥१०॥
मायेचे मनोरथ । पुरवील कृष्ण नाथ । जोडी तया मी हाता । तुम्ही … ॥११॥
-मंगला द. मुंडले (६ जानेवारी १९६३)
ही विहीण रचली तेव्हा आई नुकतीच कविता करू लागली होती. कुठल्याही कवीला आपली कविता कोणीतरी वाचावी व दाद द्यावी असे वाटत असते. आमच्या शेजारच्या टेंबुलकर कुटुंबीयांचे एक नातेवाईक श्री. माधव (बबन) पाडगावकर, राहाणार शिवपुरी, खानदेश यांच्या वाचनात ही विहीण आली. त्यांनी “आश्वासन” या कवितेचे रसग्रहण म्हणून त्याच चालीवर रचलेली “परिशीलन” या शीर्षकाची एक कविता लगोलग पोस्टाने पाठवून दिली. ती अशी
परिशीलन
पद्माहुन सुंदर दुहिता । आश्वासन तुमची कविता ॥धृ॥
कौटुंबिक सोज्वल तैशी । भाषा सुंदर नाजुकशी । शैलीतहि पृथगात्मकता । आश्वासन … ॥१॥
हातात घालुनी हात । चालती गीत संगीत । दिपवी शब्दांची प्रभुता । आश्वासन … ॥२॥
चंद्राची जणु शीतलता । स्वर्गीय सुधेची मधुता । कुसुमाची की कोमलता । आश्वासन … ॥३॥
किति रसाळ रचना तुमची । बांधणी सुबक चरणांची । उपमांची नच कमतरता । आश्वासन … ॥४॥
भावांचे वारू स्वैर । धावते गमे चौखूर । शब्दात न ये वर्णियता । आश्वासन … ॥५॥
वात्सल्य रसाचा स्रोत । मातृत्वहि ओतप्रोत । दिव्यत्वाची महनियता । आश्वासन … ॥६॥
जी सुनेस मानी दुहिता । ती अमर भूतली माता । वंदनीय प्रातःस्मरता । आश्वासन … ॥७॥
बबन पाडगावकर, शिवपुरी
कधी कधी पुस्तक-परीक्षणे पुस्तकाइतकीच रम्य वाटतात. मला हे रसग्रहण त्याच प्रकारचा अनुभव देऊन गेले !
विश्वास द. मुंडले
Hits: 26
फारच सुंदर काव्यरचना.
मंगला आईंचे कौतुक करावे तेवढे थोडे !
पाडगावकरांचे काव्य पण सुंदर आहे.