तारिणी अतुल धैर्यधारिणी
ही सत्यकथा आहे एका लश्करी डॉक्टरणीची, जिने युद्धकाळात युद्धभूमीवर विरळा असे दुर्दम्य धाडस दाखवले. तसेच एका अधिकारपदस्थ पुरुषाची (या कथेतला मी), ज्याला डॉक्टरमंडळी जी हिप्पोक्रेटिसची शपथ पाळतात तिचा धडा मिळाला. (कुणाला या गोष्टीत काही विनोद सापडलाच तर तो असेल क्रूर विनोद.) कथा आहे २००४ सालातली, काश्मिरात बारामुल्ला इथे घडलेली.
१९८८ साली काश्मिरातील बारामुल्ला येथे बंडाळीला जी सुरुवात झाली, ती २००४ सालीही चालूच होती. (हा लेख लिहिताना २०१४ सालीही ती जारी आहे.) १८-१८ तास ड्यूटी चालणार्या त्या काळात एका मध्यरात्री झोपेचा पहिला हप्ता म्हणून मी डुलकी घेत होतो, तेवढ्यात फोन आला. ऑपरेटरने “अर्जंट” अशी प्रस्तावना करीत घाईघाई कळवले की “एक जुगाडी स्फोटक उडाले आहे, कॅप्टन देविका गुप्तांना आपल्याशी बोलायचे आहे, नि त्या वैद्यकीय तपासणी खोलीतून (MI room मधून) बोलतायत”.
काश्मिरात ड्यूटीवर असताना नेहेमीच सशस्त्र झोपण्याची प्रथा आहे. त्याअर्थी मी तयारच होतो. दोन मिनिटात मी गणवेश चढवला तोवर आमचे शीघ्र प्रतिकारक पथक देखीेल तयार झाले, नि दलप्रमुखांच्या बंगल्यातून आम्ही धावत बाहेर पडलोही. हा बंगला झेलमच्या तीरावर आहे. याच झेलमच्या तीरावर, अशाच मे महिन्यातील पावसाळी रात्री, २३०० वर्षांपूर्वी, इ.स.पू ३२६ मध्ये अलेक्झांडरने कांगरा प्रांताच्या कटोचवंशीय, साडेसहा फुटी धिप्पाड, आणि शूरवीर राजा पोरसचा पराभव करत भारताच्या इतिहासाला वळण दिले होते.
वैद्यकीय तपासणी खोली आमच्या जवळच होती. मी पोचलो तेव्हा फारशी लगबग दिसत नव्हती. झाले होते ते असे की आमच्या राष्ट्रीय रायफलची एक तुकडी रात्री प्रभावकारी गस्त घालून बारामुल्ला मार्गे परतत होती. त्यातील एका जवानाचा पाय एका ट्रांझिस्टरमध्ये लपवलेल्या जुगाडी स्फोटकावर पडला, नि स्फोटात त्याची आतडीच बाहेर पडली. तुकडीतील अन्य जवानांनी त्याला झटपट वैद्यकीय तपासणी खोलीत पोचवले होते. डॉक्टर कॅप्टन देविका गुप्ता खांद्यापर्यंत रक्ताळलेल्या हातांनी, त्या जखमी जवानाचा अलोट रक्तस्राव थांबवण्यासाठी सुबकपणे त्या जवानाच्या पोटाला टाके घालत होत्या. कुठल्याही क्षणी काहीही घडेल असली कटोकटी अवस्था.
आमच्या कर्मचार्यांनी या जवानाला ६० किमी अंतरावरील श्रीनगरस्थित मुख्यालयीन इस्पितळात (Base Hospital) हलवावे लागण्याची शक्यता ओळखून एका सुरुंग व गोळाबारीविरोधी चिलखती गाडीची नि सोबतीला संरक्षक म्हणून शीघ्रप्रतिकारक गुरखा टीमच्या तीन गाड्यांचीही व्यवस्था केली. हे सर्व, डिव्हिजन कमांडर म्हणून मी ठरवलेल्या “प्रमाण-कार्य-प्रणाली”ला धरूनच होते.
मी पोचल्या पोचल्या देविका म्हणाली, “सर, परिस्थिती नाजूक आहे. त्याच्या पोटावर दीडशे टाके घातलेत. पण त्याची (रक्तदाबादि) महत्वाची मोजमापे ढासळतायत. त्याला श्रीनगरच्या अतिदक्षता विभागात नेऊन तातडीने शस्त्रक्रिया आवश्यक आहे. तिथे जाताना वाटेत त्याच्यावर लक्ष ठेवायचे, तसेच त्याचे सलाइन चालू ठेवायचे तर मला उघडी जीप पाहिजे. हा ‘रणगाडा’ नको.” दक्षिण आफ्रिकी बनावटीच्या सैन्यवाहक चिलखती गाडीला – कॅसिपरला – देविका रणगाडा म्हणाली ते खरेच होते. तिचे छप्पर तसे खालीच होते. ती युद्धकाळासाठी उपयुक्त होती, जखमींना घेऊन जाण्यासाठी नाही. एव्हाना रात्रीचा एक वाजला होता.
बारामुल्ला पाटण रस्ता हा पाटणजवळ टेकाडे व गल्यांमधून जातो. हा रस्ता आमच्या काफिल्यांवर होणार्या नित्याच्या गोळीबारामुळे बदनाम होता. साध्या ॲम्ब्युलन्सने किंवा जिप्सी गाडीने जाताजाता केवळ पेशंटच नव्हे तर डॉ. देविकालाही गमवायची वेळ आली असती. या धोक्याची मी तिला स्पष्ट कल्पना दिली. कारण शेवटी या डिव्हिजनचा प्रमुख म्हणून मी दिलेल्या हुकमांची नैतिक जबाबदारी केवळ माझीच होती.
सेनाधिकारी जनरलना पुढे काय वाढून ठेवले आहे त्याचा अंदाज बांधायला शिकवलेले असते. जे बोलणे गरजेचे होते ते मी बोललो, नि माझी माणसे चपळाईने कामाला लागणार, तोच एक शांत, अविचल पण जरबेच्या आवाजाचा हस्तक्षेप (की ध्वनिक्षेप?) झाला.
“जनरल सर, जरा एक मिनिट”
माझ्या मनाने नोंद घेतलीच की हा डॉ. देविकाचा आवाज नव्हे. रक्ताने माखलेल्या लष्करी हिरव्या साडीतली देविका त्या सैनिकाचे पोट शिवता शिवता उठून उभी राहिली. जेमतेम ५ फूट उंचीची, मृदु, ठेंगणीठुसकी (petite), सुसंस्कृत नि आपल्या कामात तरबेज देविका कापलेल्या केसांवर बेरेट चढवत उभी राहिली, तेव्हा पन्नासएक जवान वा अधिकारी पाहात असतील. मला मात्र ती माझ्यापेक्षा उंच वाटली. होतीच ती तशी.
चालत ती माझ्यासमोर येऊन उभी ठाकली – तिच्या नजरेतला राग, रोब नि आग मला दिसेल इतक्या जवळ – नि म्हणाली, “सर?”
“इथे दलप्रमुख कोण आहे? तुला काही शंका आहे का?” माझी पृच्छा
“नाही. मला शंका नाही. पण मला सांगा या जवानावर उपचार करणारा डॉक्टर कोण? मी समजलो. दलप्रमुख मूर्ख नसतात. कुणाच्याही लक्षात येईल ते माझ्याही लक्षात आलं.
“सर, हा पोरगा माझा पेशंट आहे. त्यात ढवळाढवळ नको. ती कराल तर त्याच्या मृत्यूची जबाबदारी तुमच्या शिरावर असेल. मी त्याला उघड्या जिप्सीने घेऊन जाणार, कॅसिपरने नाही. मी मेले, तर शोक करेल माझा नवरा. तुम्हाला त्याची उठाठेव नको.” तिचा नवरा हा मुख्यालयातील इस्पितळात विशेषज्ञ डॉक्टर होता. माझ्या जखमी जवानांना शोधताना मुख्यालयीन इस्पितळातच त्याची माझी भेट झाली होती.
“सर, नंतर वाटल्यास तुम्ही माझे कोर्टमार्शल करू शकता, पण आत्ता मला जाऊ द्या.”
केवळ तीन वर्षांचा अनुभव असलेल्या या चिंधीने माझ्या ३६ वर्षांच्या अनुभवाचा जो पाणउतारा केला त्यावर माझी प्रतिक्रिया काय होते याची माझे सर्व कर्मचारी वाट बघत होते. युद्धभूमीवर एखादा सभ्य सेनाधिकारी जे करू शकतो तेच मी केले. मी तिला सल्यूट केला, नि म्हटले,
“देविका, मी ढवळाढवळ केली हे माझं चुकलं. तू जा. देव तुझा पाठराखा असो.” त्या अंधार्या रात्री किमान दोन जण डोळ्यातले पाणी लपवत होते. देविका त्यातली एक होती.
पण खरे नाटक पुढेच होते. अतिरेकी हल्ल्याची जिथे भीती होती, त्या पाटणमध्येच गुरखा रक्षक दलाच्या दोनपैकी एक जीप बंद पडली तेव्हा रात्रीचे २:३० झाले होते. ह्या शूरवीर डॉक्टरने आपल्या रक्षक दलाला वाहन दुरुस्त करून पाठोपाठ येण्याची आज्ञा दिली. शेवटचे ३० किलोमीटर ही वीरांगना उघड्या जिप्सीमधून कुठल्याही रक्षक दलाविना, फक्त तिचे धैर्य व पाठराखा परमेश्वर यांच्यासोबत पुढे जात राहिली नि श्रीनगरला पोचली. लक्षात घ्या, अतिरेक्यांच्या निशाण्याखाली असणार्या कुणालाही काहीही विशेषाधिकार नसतात, मग तो पुरुष असो वा स्त्री. प्रत्येक अतिरेकी फक्त नेमून दिलेली कामे करीत असतो. त्यामुळेच पहाटे ४:३० वाजता जेव्हा देविकाचा फोन आला तेव्हाच हायसे वाटले.
देविका म्हणाली, “सर, त्या जवानावर ऑपरेशन झाले नि तो आता जगेल. ऑपरेशनमध्ये मीही सहभागी झाले होते. आज रविवार आहे. तर मला अर्ध्या दिवसाची सुटी मिळेल काय? तुम्हाला माहितच आहे की मी ६ महिन्यांची गरोदर आहे, नि इकडे नवर्याने दुसर्या तिमाहीच्या काही तपासण्या ठरवल्या आहेत.”
त्याच सकाळी मी कोअर कमांडरांशी बोललो. त्यांनी सेनादलप्रमुखांशी बातचीत केली. तीनच दिवसांनी देविकाला तिचे शौर्य व कर्तव्यनिष्ठा यांसाठी प्रशस्तिपत्र मिळाले. हा क्वचित मिळणारा बहुमान आहे. काही महिन्यांनंतर या वाघिणीने एका बछड्याला जन्म दिला. एक न एक दिवस या बाळाला नक्कीच माहित होईल की आपल्या लढाऊ आईने एका अतिकाळजीवाहू जनरलशी कसा पंगा घेतला नि ती कशी जिंकली!
“लष्करादि गणवेशधारी व्यवसायांसाठी स्त्रिया सक्षम नसतात” असे माझ्या काही सहकार्यांचे मत ऐकले की माझी प्रतिक्रिया ही स्त्रियांचा पक्ष घेणारी असते कारण माझा ज्या ज्या महिलांशी संबंध आला त्या सर्व अस्सल वाघिणी होत्या.
मूळ लेखक: मेजर जनरल (निवृत्त) राज मेहता (१ जुलै, २०१४) रूपांतरकार: डॉ. विश्वास मुंडले
इथे दिलेला फोटो व भाषांतरासाठी परवानगी दिल्याबद्दल जनरल साहेबांचे आभार
मूळ इंग्रजी लेखासाठी पाहा http://www.coloursofglory.org/lady-courageous-a-true-anecdote/
Hits: 32